वारकरी संप्रदाय आणि समर्थ रामदास...

    28-Jun-2023   
Total Views | 203
Article On Warkari Sampraday And Samarth Ramdas

स्वामींनी राम आणि विठ्ठल यांना कधीच वेगळे मानले नाही. स्वामींनी पंढरपूरला भेट दिली. तेव्हा, पांडुरंगाने दासांना रामरूपात दर्शन दिले होते. तो अद्वैत साक्षात्कार पाहून स्वामींच्या तोंडून उद्गार निघाले - ‘येथे का तू उभा श्रीरामा। मनमोहन मेघश्यामा।’

आज आषाढी एकादशी. वारकरी संप्रदायातील वैष्णवांचा मेळावा आज मोठ्या भक्तिभावाने पंढरपूरला चंद्रभागेच्या तटी आपल्या परमप्रिय विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमला आहे. अनेक वारकरी वेगवेगळ्या संतांच्या दिंड्या घेऊन अवघड वाटा, घाट पायी तुडवत, दर्शनाची आस ठेवून आनंदाने नामाचा गजर करीत पंढरपूरच्या वाळवंटात जमले आहेत. या भागवत संप्रदायाने सर्वजाती-जमातीतून संतांची मांदियाळी उभी केली. या अठरापगड जातीतील संतांनी, भक्तांनी भक्ती, शांती, प्रेम सदाचरणाचे धडे आपल्या कृतीतून, साहित्यातून दिले. जनसामान्यांना त्यांनी उद्धाराचा मार्ग दाखवला. त्यांनी प्रतिपादिले की, प्रत्येक माणसाला परमेश्वरभक्तीचा आणि आपल्या उद्धाराचा अधिकार आहे. ही बहुमोल जाणीव संतांनी करून दिली. या जाणिवेतून महाराष्ट्रात अनेक भक्तिपंथ, संप्रदाय उदयाला आले. तथापि कुणावरही बळजबरी न करता प्रत्येक भक्ताला त्याच्या निवडीचे स्वातंत्र्य दिले गेले. सर्व संप्रदायांनी समन्वयाची भूमिका अंगीकारल्याने पंथनिविष्ट श्रेष्ठकनिष्ठता, कडवेपणा येथे आला नाही.

महाराष्ट्रात सर्वात मोठा स्थिरावलेला आणि वाढलेला भक्तिपंथ म्हणजे विठ्ठलभक्तीचा वारकरी संप्रदाय. याला ‘भागवत संप्रदाय’ असेही म्हणतात. सर्वसामान्यांच्या अंतःकरणाला भिडणार्‍या भाषेतील उपदेशामुळे, तसेच शुद्ध आचरण चारित्र्य, समानता यांच्या पुरस्काराने हा पंथ लोकप्रिय झाला. अध्यात्मातील परब्रह्म विठ्ठलाच्या रूपाने उभे आहे, ही वारकर्‍यांची दृढश्रद्धा, विठ्ठलभक्तीचा मूळ प्रवर्तक पुंडलिक मानला गेला असला तरी वारकर्‍यांच्या या भक्तिसंप्रदायाला ज्ञानेश्वरांनी सामाजिकदृष्ट्या कार्यप्रवण केले. ज्ञानेश्वरांचे आयुष्य अवघे २४-२५ वर्षांचे, पण या अल्पायुष्यात ज्ञानेश्वरांनी वारकर्‍यांतील हिंदू संस्कृतीचा, पंथाचा पाया मजबूत केला. अठरापगड जातीच्या विठ्ठलभक्तांना उच्च विचारांची बैठक देऊन, समान दर्जा देऊन भागवत धर्माच्या झेंड्याखाली उद्धाराच्या भक्तिमार्गात ज्ञानेश्वरांनी सामावून घेतले. त्यामुळे वारकरी पंथाला नवचैतन्य प्राप्त होऊन नामदेव, तुकाराम इत्यादी अनेक संत त्या पंथात निर्माण झाले.

’ग्यानबा तुकाराम’ या त्यांच्या भजनात वारकरी, ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत सर्व संतांना कृतज्ञतेने वंदन करतात. वारकरी संप्रदाय सर्वसमावेशक असल्याने ’भेदाभेद भ्रम अमंगळ’ ही समानतेची उच्चावस्था त्यांनी गाठली. त्यामुळे वारकरी संप्रदायात जोतिबा-खंडोबाचे उपासक, जैन, लिंगायत हेही सामील होऊन विठ्ठल उपासक झाले. सर्वसमावेशक ही गुणवत्ता वारकरी संप्रदायाला लाभली. एकनाथ गुरूपरंपरेने दत्तसंप्रदायी असूनही त्यांनी वारकरी संप्रदायासाठी मोलाचे कार्य केले आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीला सर्व विठ्ठलभक्त वारकरी आपल्या प्रिय विठ्ठलाला भेटण्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने पायी पंढरपूरला जातात. वारीत स्नेहपूर्ण वातावरण असून तेथे कसलाही भेदभाव नसतो. एकमेकांचा आदर करीत, ‘माऊली’ म्हणत परस्परांच्या पाया पडतात, पायी चालण्याचे, घाट ओलांडून जाण्याचे त्यांना श्रम वाटत नाहीत.

वारीची ही परंपरा ज्ञानेश्वर, नामदेव यांच्या अगोदरपासूनची आहे. समर्थ रामदासांच्या काळीही वारीची लोकप्रियता कमी झालेली नव्हती. रामदास मूलत: भक्तिपंथाचे होते. त्यांनी अध्यात्म विवेचनात भक्तीचे महत्त्व सांगितले आहे. दासबोधात ते म्हणतात, ’भक्तिचेनि योगें देव। निश्चयें पावती मानव। ऐसा आहे अभिप्राव। इथे ग्रंथीं॥’ तेव्हा विठ्ठलभक्तीचा लोकमान्य वारकरी संप्रदाय समोर असताना दासांना वेगळा भक्तिपंथ का काढावा लागला, या प्रश्नाचे उत्तर तत्कालीन, अन्यायाने पिचलेल्या सामाजिक अवस्थेत आहे. दासांनी १२ वर्षांच्या तीर्थाटन काळात हिंदू समाजाची, संस्कृतीची अवकळा पाहिली होती. राज्य म्लेंच्छांचे, मूर्तिभंजन करणार्‍यांचे, नीतिन्यायाची चाड नसलेले मुसलमानी राज्यकर्ते, त्यांची दुष्कृत्ये, बाटवाबाटवी, स्त्रियांना पळवणे, अनन्वित अत्याचार हाल, हे सारे पाहून दासांचे हृदय पिळवटून गेले. मुसलमानी राजवटीच्या अराजकता, विध्वंसक, सांस्कृतिक व राजकीय आक्रमण यांच्या वावटळीचा जोर इतका होता की आपला सहिष्णू धर्म, आपली संस्कृती टिकते की नाही, याची शंका होती. त्यातून आपला धर्म, समाज वाचला तरी आपली पूजाअर्चा, भक्ती याला अर्थ राहील, या विचारांनी दासांच्या मनात विलक्षण क्रांती घडून आली.

दासांनी कोदंडधारी राम आणि शक्तीबुद्धीने संपन्न स्वामिनिष्ठ हनुमान यांची उपासना सांगून समाजाला धीर दिला आणि विध्वंसक म्लेंच्छ राजवटीच्या नाशाची प्रेरणा दिली. तरीही त्यांचा ’समर्थ संप्रदाय’ हा भक्तिपंथच होता. दासांनी सांगितलेल्या संप्रदायाच्या प्रेरणा काळानुसार दुष्ट- दुर्जनांच्या नाशाच्या आणि आपल्या संस्कृतीरक्षणाच्या होत्या. रामदास विलक्षण बुद्धिमान व विवेकनिष्ठ होते. तत्कालीन भक्तिपरंपरेतील कालसापेक्ष उणिवा त्यांना जाणवल्या. भगवद्गीतेत भगवंतांनी अवताराचे प्रयोजन सांगताना, ’परित्राणाय साधूनां। विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय। सम्भवामि युगे युगे।’ असे सांगितले आहे. वारकरी संप्रदायात विठ्ठलभक्तीने ’साधूसज्जनांचे रक्षण’ हे प्रयोजन सांभाळले होते. विठूरायाने आपल्या भक्तांना प्राणघातक संकटातून स्वतः मनुष्यरूपात प्रगट होऊन वाचवल्याच्या अनेक कथा आहेत. सेनान्हावी, मंगळवेढ्याचा दामाजीपंत, दासोपंत, कान्होपात्रा इ. भक्तांना विठ्ठलाने संकटांतून वाचवले होते. तथापि ही संकटे निर्माण करणार्‍या दुष्टांचा विनाश होत नव्हता. ही उणीव भरून काढून दुष्टांच्या नाशाच्या योजना करणे व त्यासाठी परमेश्वराचे साहाय्य मागावे, असे दासांना वाटत होते.

त्यासाठी रामाची, हनुमानाची भक्ती ही निवड दासांनी केली. स्वामींनी राम आणि विठ्ठल यांना कधीच वेगळे मानले नाही. स्वामींनी पंढरपूरला भेट दिली. तेव्हा, पांडुरंगाने दासांना रामरूपात दर्शन दिले होते. तो अद्वैत साक्षात्कार पाहून स्वामींच्या तोंडून उद्गार निघाले - ‘येथे का तू उभा श्रीरामा। मनमोहन मेघश्यामा।’ त्या काव्यात समर्थ पुढे म्हणतात, “इथे सीतामाई दिसत नाही, इथे तर रखूमाई उभी आहे. तू वानरसैन्य काय केले, इथे गोपाळांना जमवले. तुझे धनुष्यबाण दिसत नाहीत. हात कटीवर ठेवून तू उभा आहेस.” येथे उपासना भक्ती तीच होती, फक्त काळाला अनुकूल अशा तत्वज्ञानाचा फरक होता. येथे दासांना वारकर्‍यांच्या भक्तिभावाला उणे ठरवायचे नव्हते. फक्त भगवंताच्या अवताराचे प्रयोजन काळानुरूप वेगळे असते, हे सांगायचे होते. काळानुरूप केलेली उपासना जास्त फलदायी ठरते. वारकर्‍यांच्या ’राम कृष्ण हरि’ या भजनात रामाचे शौर्य, कृष्णाची मुत्सद्देगिरी अंतर्भूत आहेच. त्यामुळे वरील कवितेत दास म्हणतात, ‘रामदासी जैसा भाव। तैसा होई पंढरीराव॥’ रामदासांनी कोदंडधारी रामाची उपासना सांगितली म्हणून त्यांना भक्तिसंप्रदायापासून वेगळे काढता येत नाही. वारकर्‍यांची भजने ’ज्ञानदेव ते तुकाराम,’ असतील तरी रामदास भक्तिसंप्रदायीच राहतात.

७७३८७७८३२२

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121