एकांकिका आणि दोन अंकी नाटकातून प्रायोगिक रंगभूमीशी नाळ जोडलेला, तसेच रंगभूमीवरील ‘अलबत्या गलबत्या’ या सुप्रसिद्ध व्यावसायिक नाटकात चिंची चेटकिणीची भूमिका साकारणार्या निलेश गोपनारायण यांच्याविषयी...
रत्नाकर मतकरी लिखित आणि राहुल भंडारे निर्मित ’अलबत्या गलबत्या’ या सुप्रसिद्ध नाटकातील चिंची चेटकीण आजही अनेक लहान मुलांची आवडती व्यक्तिरेखा. पण, काही दिवसांपूर्वी या चिंची चेटकिणीची भूमिका साकारणारे अभिनेते वैभव मांगले यांनी नाटकातून ‘एक्झिट’ घेतली आणि ही भूमिका आता एक नवीन कलाकार करणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली. ती चिंची चेटकीण नव्याने रंगभूमीवर साकारणारा अवलिया म्हणजे निलेश गोपनारायण.
निलेश गोपनारायण यांचा जन्म वसईत एका मध्यवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे आई-वडील पोस्ट ऑफिसमध्ये कामाला होते. निलेश यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आर. पी. वाघ हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर निलेश यांनी न्यू इंग्लिश स्कूल, वसई येथे विज्ञान शाखेत प्रवेश मिळवला. मात्र, त्यावेळी नाटकवेडापायी विज्ञान शाखेत मन न लागल्याने निलेश यांनी कला शाखेत सेंट गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळवला.
तसं पाहायला गेलं, तर निलेश यांच्या कुटुंबात कोणीही नाट्यक्षेत्रात नाही. मात्र, एकदा निलेश यांच्या शाळेत नाट्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुलांची निवड सुरू होती. त्यावेळी वडिलांना नाट्य स्पर्धेत भाग घेऊ का? असे निलेश यांनी विचारले. त्यावेळी वडिलांनी त्यांना परवानगीही दिली. त्यामुळे तिथेच निलेश यांना नाटकाचं बाळकडू मिळालं. मग पुढे शाळेतून बालनाट्य स्पर्धांमध्ये निलेश सहभागी होऊ लागले. त्यानंतर महाविद्यालयात असताना मुंबई विद्यापीठाचा ‘युवा महोत्सव’, ‘आयएनटी’, ‘ईप्टा’सारख्या अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये निलेश सहभागी होऊन अभिनयामुळे पारितोषिके मिळवू लागले. या काळात विश्वास सोहनी, विलास देसाई, संजय परब यांसारखे गुरूवर्य लाभल्याचे निलेश आवर्जून सांगतात.
यावेळी निलेश पुढे जाऊन नाट्य क्षेत्रातचं करिअर करतील, याची कुटुंबीयांना कल्पना नव्हती. परंतु, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे निलेश यांचे पाय घरी कमी आणि रंगभूमीवरील नाटकांच्या कामात जास्त वेळ दिसू लागले. मात्र, तरीही कुटुंबाने निलेश यांच्या नाटकवेडाला विरोध केला. त्यावेळी निलेश यांनी काही महिने पोस्ट ऑफिसमध्ये कामसुद्धा केलं; पण त्याच दिवसांमध्ये नाट्य स्पर्धांमध्ये निलेश यांना मिळणारी पारितोषिके आणि नाटकासाठीची धडपड पाहून कुटुंबाचा विरोधाचा सूर ओसरला. मग निलेश यांनी पूर्णवेळ नाटक करण्याचं ठरवलं. दरम्यान गुरूवर्य संजय परब यांनी दिलेला सल्ला निलेश सांगताना म्हणतात, “कोणीच कोणाला नाटक शिकवू शकतं नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या कुवतीप्रमाणे दिग्दर्शकांचे म्हणणं समजून घेत नाटक शिकलं पाहिजे.”
त्यामुळे दिग्दर्शकांचे विचार समजून घेत असताना निलेश यांना स्वतःचा विचार मांडण्यासाठी दिग्दर्शन आणि लेखन या गोष्टी महत्त्वाच्या वाटू लागल्या. मग निलेश स्वतः दिग्दर्शक म्हणून काम करू लागले. विवा महाविद्यालय, सेंट गोन्सालो गार्सिया महाविद्यालय, मिठीभाई महाविद्यालय, एन. एम. कॉलेज, खालसा कॉलेज अशा अनेक महाविद्यालयांत निलेश यांनी दिग्दर्शक म्हणून काम केले आणि स्वतःच्या भावविश्वातील गोष्टी ते नाट्यरसिकांपुढे मांडू लागले. त्यादरम्यान, निलेश यांना मुंबई विद्यापीठाच्या ‘नॅशनल युथ फेस्टिवल’साठी दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करत निलेश यांनी दहा वर्ष मुंबई विद्यापीठात दिग्दर्शक म्हणून काम केलं आणि अनेक पारितोषिके विद्यापीठाला मिळवून दिली. आतापर्यंत निलेश यांनी २००हून अधिक एकांकिकांमध्ये दिग्दर्शन, अभिनय, प्रकाशयोजना, संगीत, लेखन अशा नानाविध भूमिका निभावल्या. त्यामुळे निलेश सांगतात की, “एखादे ध्येय साध्य करण्यासाठी आपण मनापासून झटलो, तर एक ना एक दिवस यश नक्कीच मिळतं. त्यामुळे सहनशीलता, चिकाटी, प्रयत्न माणसांने कधीही सोडू नये.“
आता काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत निलेश यांनी ’नात्याची गोष्ट’ या दोन अंकी नाटकात दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून काम केले. त्या नाटकाला राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट दिग्दर्शन व उत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक निलेश यांना मिळाले. त्याच नाटकातील निलेश यांचा अभिनय पाहून त्यांना सुप्रसिद्ध ’अलबत्या गलबत्या’ या नाटकातील चिंची चेटकिणीची मुख्य भूमिका निर्माते राहुल भंडारे यांच्यामुळे मिळाली. आतापर्यंत निलेश यांनी ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचे दीडशेहून अधिक प्रयोग केले आहेत. त्यांच्या याच नाट्य क्षेत्रातील कामाची दखल घेत ठाण्यातील ‘गंधार संस्थे’तर्फे ‘गुणगौरव पुरस्कार’ निलेश यांना मिळाला. दरम्यान, निलेश यांनी ‘लॉकडाऊन’मध्ये अभिनयाचे प्रशिक्षण देणारी संस्था वसईमध्ये ’हिरा आर्ट अकॅडमी’च्या रुपाने सुरू केली आहे. तसेच, भविष्यात याच अकॅडमीच्या माध्यमातून चित्रपट, वेबसिरीज, नाटक या क्षेत्रात नवोदितांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटणार असल्याचे निलेश सांगतात. तरी त्यांच्या भावी आयुष्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!