भोपाळ : ‘’इस्लामचा ‘तिहेरी तलाक’शी काहीही संबंध नाही. त्याला पाठिंबा देणारे मतांसाठी राजकारण करत आहेत. एक घर दोन कायद्यांवर चालू शकत नाही. समान नागरी कायद्याबाबत विरोधकांनी संभ्रम निर्माण केला असून भाजप तो दूर करेल,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवार, दि. २७ जून रोजी पाच ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसना हिरवा कंदील दाखवला. यानंतर त्यांनी ‘मेरा बूथ-सबसे मजबूत’ या कार्यक्रमात लोकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी समान नागरी कायद्याबद्दल भाष्य करताना देशातील मुस्लीम राजकारणाचे शिकार होत असल्याचे सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी समान नागरी कायद्याबाबत देश-विदेशातील उदाहरणे दिली. ते म्हणाले, “समान नागरी कायद्याबाबत विरोधक चुकीच्या अफवा पसरवत आहेत. एका कुटुंबामध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळे नियम असतील, तर ते कुटुंब पुढे कसे जाईल?” असा सवाल उपस्थित करून मोदी म्हणाले, “देशात समान नागरी कायदा लागू व्हावा, यासाठी सर्वोच्च न्यायालय प्रयत्न करत आहे. मात्र, ‘व्होट बँक’साठी काही लोक या कायद्याला विरोध करत आहेत.” यावेळी मोदी यांनी विरोधकांच्या तुष्टीकरणाचा खरपूस समाचार घेतला.
मुस्लीम देशांत ‘ट्रीपल तलाक’ बंदी
पंतप्रधान मोदी यांनी इजिप्तचे उदाहरण देत सांगितले की, “मी नुकताच इजिप्तचा दौरा केला. त्या देशाने ८०-९० वर्षांपूर्वीच तीन तलाक रद्द केला आहे. कतार, इंडोनेशिया, बांगलादेश अशा मुस्लीम बहुल देशांतही तीन तलाक बंद आहे. तीन तलाक हा नियम मुस्लीम मुलींसाठी अन्यायकारक आहे. जे लोक याचं समर्थन करतात, ते केवळ मतांचे भुकेले आहेत. तीन तलाक संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करत आहे,” असेही मोदी म्हणाले.
’माझे बूथ, सर्वात मजबूत’ मोहीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील दौर्यात आगामी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ विधानसभेच्या निवडणुका आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये ’माझे बूथ, सर्वात मजबूत’ या मोहिमेत ५४३ लोकसभा आणि मध्य प्रदेशातील ६४ हजार, १०० बूथच्या दहा लाख कार्यकर्त्यांना ‘डिजिटल’ पद्धतीने मार्गदर्शन केले.
देशातील मुस्लीम बांधवांचा काही लोक राजकारणासाठी वापर करवून घेत आहेत. राजकीय पक्ष तुम्हाला भडकवून, आपला फायदा करून घेत आहेत हे देशातील मुस्लिमांनी लक्षात घ्यायला हवं. या राजकारणामुळेच तुमचं मोठं नुकसान होत आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
विरोधकांच्या घोटाळा २० लाख कोटींच्या घरात
पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांच्या घोटाळ्याची एकत्रित आकडेवारीच जाहीर केली. सर्व विरोधकांच्या एकूण घोटाळ्याची रक्कम तब्बल २० लाख कोटींच्या घरात आहे. यात राष्ट्रवादीचा उल्लेख करताना त्यांनी सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा आरोप आहे. यात ‘महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक’ घोटाळा, महाराष्ट्र सिंचन घोटाळा आदी घोटाळ्यांची मोठी यादीच असल्याचे सांगत मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला.