नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वनडे विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्याची सुरुवात ५ ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होईल. फायनल १९ नोव्हेंबरला होणार आहे. भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १५ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. यापूर्वी आयसीसीने विश्वचषक ट्रॉफी अवकाशात पाठवून लॉन्च केली होती. आता ही ट्रॉफी जगभरातील १८ देशांमध्ये पाठवली जाणार आहे.
भारताचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेत ४६ दिवसांत ४८ सामने होणार आहेत. विश्वचषक ट्रॉफीचेही लाँचिंग करण्यात आले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर नेत्रदीपक लँडिंग करण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १२०००० फूट उंचीवर ट्रॉफी लाँच करण्यात आली. आता ही ट्रॉफी जगभरातील १८ देशांमध्ये पाठवली जाणार आहे.
जागतिक क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अधिकृत ट्रॉफी अवकाशात पाठवून प्रक्षेपित करण्यात आली आहे. ट्रॉफी लॉन्चिंगचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे आयसीसी ट्रॉफीचा हा सर्वात लांब दौरा असेल.
ट्रॉफी लॉन्चिंगचा व्हिडिओ शेअर करताना बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी लिहिले, “क्रिकेट जगतासाठी हा एक अनोखा क्षण आहे. क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी अवकाशात पाठवण्यात आली आहे. अंतराळात पाठवलेली ही पहिली अधिकृत ट्रॉफी आहे. भारतातील आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी दौर्याची खरोखरच चांगली सुरुवात झालेली आहे”
टीम इंडियाचे वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे सामने भारतातील १० शहरांमध्ये खेळवले जातील. अहमदाबाद, हैदराबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता ही शहरे आहेत. टीम इंडिया ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियासोबत पहिला सामना खेळून विश्वचषक प्रवासाला सुरुवात करेल. यानंतर ११ ऑक्टोबरला दुसरा सामना अफगाणिस्तानशी होईल. त्याचवेळी, तिसरा आणि सर्वात मोठा सामना १५ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी होणार आहे. चौथ्या सामन्यात भारताचा सामना बांगलादेशशी होणार आहे. हा सामना १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
५वा सामना २२ ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध आणि ६वा सामना २९ ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध होणार आहे. याशिवाय २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ७व्या सामन्यात पात्रता फेरीतील दुसऱ्या संघाशी सामना होणार आहे. त्याच वेळी, ८वा सामना ५ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेसोबत होईल आणि ९वा आणि शेवटचा साखळी सामना ११ नोव्हेंबरला क्वालिफायर जिंकणाऱ्या पहिल्या संघासोबत होईल. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे आणि कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवले जातील. अंतिम सामना १९ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.