पुण्यातील मोशीत आढळला दुर्मिळ ‘दहीपळस’

    23-Jun-2023
Total Views |
Dahipalas



मुंबई (प्रतिनिधी):
पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात मोशी येथे दहीपळस हा दुर्मिळ वृक्ष आढळला आहे. या संकटग्रस्त वनस्पतीची खासियत म्हणजे या झाडाच्या पानांवर एखाद्या टोकदार वस्तुने काही लिहिले तर, ते कधीही लुप्त होत नाही. कायमस्वरुपी उमटणाऱ्या अक्षरांच्या पानांचा पुर्वी गुप्त संदेशवाहक म्हणुन वापर केला जात असे. पिंपरी चिंचवड परिसरातील पर्यावरण अभ्यासक प्रा. किशोर सस्ते यांना हा वृक्ष आढळला असुन त्यांनी त्याची नोंद ही केली आहे.


मोशी येथील खाणकाम परिसरातील टेकड्यांवर हा वृक्ष आढळला असुन या आधी याच परिसरातून दहिपळसाचे मोठे झाड नामशेष झाले आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील हा एकमेव दुर्मिळ असा वृक्ष आहे. २०१९ साली एका खासगी कंपनीने पिंपरी चिंचवड परिसरातील जैवविविधतता अंतर्गत विविध वृक्षांची नोंद केली होती, मात्र या यादीमध्ये येथील अनेक दुर्मिळ वनस्पतींची नोंद केली गेलेली नाही.

ही आहेत दहीपळसाची वैशिष्ट्ये...


१. या झाडाच्या पाने किंवा खोडामध्ये दुध ठेवले असता, त्याचे दही बनते. तसेच, याची पाने
    पळसासारखी असल्याने त्याला दहीपळस असे म्हणतात.
२. या वृक्षास दधीपर्ण, दहीमन, दहीपळस किंवा दहीपलाश अशी याची इतर नावे आहेत.
३. याचे शास्त्रीय नाव कॉर्डिया मक्लिओडी असून तो भोकरवर्गीय बोरॅजीनेसी कुळातील आहे.
४. हा वृक्ष कर्करोग, पॅरालिसीस(पक्षाघात), काविळ आणि उच्च रक्तदाब या आजारांवर उपयुक्त आहे.


स्वातंत्र्य पूर्व काळात या पानांचा उपयोग भुमिगत क्रांतिकारक गुप्त संदेश पाठवण्यासाठी करत असत. या झाडांच्या पानांमार्फत संदेशवहन केले जाते, असा सुगावा इंग्रजांना लागताच त्यांनी हे वृक्ष मोठ्या प्रमाणात तोडले असे सांगितले जाते. या वृक्षाच्या पानांवर सीता रामाला संदेश लिहीत असे अशीही आख्यायिका सांगितली जाते, म्हणून यास सीतापत्र असे देखील म्हणतात.

“भारतात हा वृक्ष राजस्थान, मध्यप्रदेश, झारखंड येथे आढळतो. पुणे जिल्ह्यातील भामचंद्र, घोराडेश्वर आणि भंडारा डोंगररांगामधून देखील या वृक्षाची मी नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ म्हणजेच आय.यु.सी.एन.च्या लाल यादीत (रेड लिस्ट) हा वृक्ष संकटग्रस्त म्हणुन घोषित केला असुन त्याचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे.”
- प्रा. किशोर सस्ते,
पर्यावरण अभ्यासक



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.