महाराष्ट्र : महापारेषण कंपनीच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे परिमंडळात दि.२१ जुन २०२३ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह पिंपरी चिंचवड येथे क्षेत्रीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. दरम्यान, या सोहळ्याला महापारेषण कंपनीचे संचालक (संचलन) संदीप कलंत्री प्रमुख अतिथी म्हणून तर मुख्य महाव्यवस्थापक (मास) सुधीर वानखेडे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील, महेश आंबेकर विशेष अतिथी म्हणून तसेच महापारेषण पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र गायकवाड अध्यक्ष म्हणून लाभले होते. तसेच महावितरण पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. यावेळी पुणे परिमंडळातील अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, प्रकाश कुरसंगे, सतीश गायकवाड, प्रमोद भोसले, राम शेळके तसेच सहाय्यक महाव्यवस्थापक (मास) प्रशांत चौधरी व मिलिंद घोलप , सहा मुख्य दक्षता अधिकारी सुभाष भिलारे यांचेसह पुणे परिमंडलातील अनेक अधिकारी, कर्मचारी, संघटना प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या स्वागतानंतर दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि नंतर पुणे परिमंडळातील अधिकारी, अभियंता व कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला. मंदार डांगे, सहा अभियंता या गुणी कलाकाराने सुरुवातीलाच माऊलीचा जयघोष करत संपूर्ण वातावरण विठ्ठलमय केले. तर नंतर मै हु डॉन म्हणत चिमुकल्यासह मोठ्या प्रेक्षकांना ही नाचवले. अमृता ,स्वाती आणि वैशाली यांच्या समुह नृत्याने कार्यक्रमात रंग भरला. दत्ता मालखरे यांनी आपल्या एकल नृत्याद्वारे गोविंदाची आठवण करून दिली. कार्यकारी अभियंता महेंद्र काटेंगे यांनीही एक गीत गायले. निवेदिता कुलकर्णी आणि त्यांच्या समूहाने जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सादर केलेल्या रिदमिक योगाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. मुख्य अभियंता राजेंद्र गायकवाड यांनीही या सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता करताना गीत गायले.
त्यानंतर हास्य सम्राट दीपक देशपांडे यांचा हास्यकल्लोळ हा एकपात्री प्रयोग सादर झाला आणि संपूर्ण सभागृह हास्य कल्लोळात बुडाले. या हास्य प्रयोगानंतर प्रत्यक्ष क्षेत्रीय पुरस्कारांचे वितरण झाले यामध्ये २२० केव्ही मगरपट्टा सब स्टेशन, २२० केव्ही थेऊर सबस्टेशन , १३२ केव्ही सांगोला सब स्टेशन, १३२ केव्ही सणसवाडी सब स्टेशन तसेच लाईन मेंटेनन्स सबडिव्हिजन पुणे, बारामती तसेच ईएचव्ही प्रोजेक्ट सब डिव्हीजन पुणे , ईएचव्ही लाईन प्रोजेक्ट सब डिव्हीजन पंढरपूर , ४०० केव्ही लाईन प्रोजेक्ट सब डिव्हीजन हिंजवडी, ईएचव्ही लाईन प्रोजेक्ट सब डिव्हीजन बारामती या विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यासोबतच टेस्टिंग टीम, सिव्हिल टीम, हॉटलाइन टीम , पीआयडी टीम व S&I युनिट यांचाही गौरव करण्यात आला. त्यानंतर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, अभियंता व कर्मचाऱ्यांचे ही ट्रॉफी, सर्टिफिकेट व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. हा क्षेत्रीय पुरस्कार वितरण सोहळा स्मरणात रहावा यासाठी मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तूचे प्रातिनिधिक स्वरूपात अनावरण करण्यात आले.
पुरस्कार वितरणाच्या अगोदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता श्री जयंत कुलकर्णी साहेबांनी केले. मुख्य महाव्यवस्थापक सुधीर वानखेडे यांनी क्षेत्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रम सर्वप्रथम पुण्यात संपन्न होत असल्याबद्दल मुख्य अभियंता राजेंद्र गायकवाड यांच्याबद्दल गौरव उदगार काढले. मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. संचालक (संचलन) सन्माननीय संदीप कलंत्री यांनी याप्रसंगी सर्वांना मार्गदर्शन केले. मुख्य अभियंता राजेंद्र गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषणाने समारोप केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा पांडे व कीर्ती सानप उप कार्यकारी अभियंता यांनी केले. कार्यकारी अभियंता वर्षा बोरकर आभार व्यक्त केले.
दरम्यान, राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली. नंतर उपस्थित सर्व अधिकारी अभियंता कर्मचारी यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. अतिशय रंगतदार झालेला १८ वा वर्धापन दिन व पुणे परिमंडळाचा पारितोषीक वितरण सोहळा उपस्थितांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. तसेच, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य अभियंता राजेंद्र गायकवाड यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.