नवी दिल्ली : 'अतिथी देवो भव' या तत्त्वावर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २१ जून रोजी G-20 प्रतिनिधींना २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान भारत भेटीसाठी आणि 'लोकशाहीचा उत्सव' पाहण्यासाठी आमंत्रित केले. गोव्यात दि. २१ जून रोजी झालेल्या G-20 पर्यटन मंत्रीस्तरीय बैठकीच्या उद्घाटन सत्रात मोदींचा रेकॉर्ड केलेला हा संदेश प्रसारित करण्यात आला. आपल्या संदेशात पंतप्रधानांनी 'दहशतवाद देशाला तोडते तर पर्यटन जोडते', असे अधोरेखित केले. पर्यटनाची परिवर्तनीय शक्ती विचारमंथनातून साकार होईल आणि ‘गोवा मॉडेल’ आणि सामूहिक प्रयत्न यात महत्त्वाचे योगदान देतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
२२ जून रोजी G-20 मंत्रिस्तरीय बैठकीच्या शेवटी 'गोवा फ्रेमवर्क आणि कृती आराखडा' वर मंत्रिस्तरीय संभाषण जारी केले जाईल. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "भारताच्या G-20 अध्यक्षांचे ब्रीदवाक्य 'वसुधैव कुटुंबकम' आणि 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' हे जागतिक पर्यटनाचे ब्रीदवाक्य असू शकते." त्यामुळे हे ब्रीदवाक्य लोकांना एकत्र आणू शकते,असे ही मोदी म्हणाले.तसचे 'दहशतवादामुळे फूट पडते, पण पर्यटनामुळे लोक एकत्र येतात. पर्यटनामध्ये जीवनाच्या सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणण्याची क्षमता आहे. ज्यामुळे एक सुसंवादी समाज निर्माण होईल." तसेच २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, लोकशाहीची जननी असणाऱ्या देशात लोकशाहीचा उत्सव साजरा होणार आहे. तरी आपण सर्वानी या काळात भारतात यावे. आणि या उत्सवाचे साक्षीदार व्हावे.
दरम्यान २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काही टूर ऑपरेटर्सनी भारतात 'इलेक्शन टुरिझम' सुरू केले होते. त्यावेळी निवडणूक प्रचारादरम्यान विदेशी पर्यटकांच्या विविध गटांना वाराणसी आणि इतर ठिकाणी नेण्यात आले. मोदी वाराणसीतून लोकसभेवर निवडून आले आणि नंतर ते भारताचे पंतप्रधान झाले. त्यामुळे त्यावेळी त्यांनी G-20 देशांचे मंत्री आणि इतर प्रतिनिधींचे आभार मानले होते.