मुंबई : भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाने मुंबईतील संभाव्य दरडी कोसळण्याच्या २४९ ठिकाणांचे शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाआधारे २४९ पैकी ७४ ठिकाणे अतिधोकादायक घोषित केली आहेत. या ७४ ठिकाणांच्या निकटच्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत संभाव्य धोका उद्भवल्यास काय करावे, काय करू नये; याचे प्रशिक्षण टप्पेनिहाय पद्धतीने देण्यात येत आहे. या अंतर्गत आतापर्यंत २५० नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण यापुढेही सुरू राहणार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन खात्यातर्फे देण्यात आली आहे. तसेच आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना तात्काळ आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.
पावसाळा सुरू झाला की मुंबईतील काही ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका असतो. संभाव्य धोका गृहीत धरून मुंबई महानगरातील पश्चिम उपनगरातील बांदिवली टेकडी, यादव नगर, जोगेश्वरी (पश्चिम), पूर्व उपनगरातील कुर्ला कसाईवाडा, वाशी नाका चेंबुर येथील भारत नगर, घाटकोपर येथील वर्षानगर आदी परिसरातील नागरिकांकरिता या कार्यशाळांद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या परिसरातील नागरिकांच्या रोजच्या कामात व्यत्यय नको म्हणून महानगरपालिकेने सुटीच्या दिवशी म्हणजे १७ आणि १८ जून २०२३ रोजी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले. यापुढे देखील अशा प्रशिक्षण कार्यशाळा सुरू राहणार आहेत. विभागस्तरीय सहायक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. १७ आणि १८ जून २०२३ रोजी आयोजित विविध ठिकाणच्या ६ प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये २५० पेक्षा जास्त स्थानिकांनी सहभाग नोंदविला.
दक्ष राहा, सुरक्षित राहा
सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपत्कालीन व्यवस्थापनाची आवश्यकता, आपत्ती म्हणजे काय, धोक्यांची ओळख, धोके म्हणजे काय, जोखिम कशी ओळखावी, जोखिम म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार, विविध प्रकारच्या आपत्तीमध्ये, अगोदर, नंतर काय करावे व काय करू नये, आपत्कालीन व्यवस्थापन चक्र (सज्जता, उपशमन, प्रतिरोध तसेच प्रतिसाद) लिकेतील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे कार्य, याबबत चर्चा करून त्याबाबतीत सज्जता, उपशमन, प्रतिबंध कसे करावे व घटना घडलीच तर प्रतिसाद कसा द्यावा? प्रथमोपचार म्हणजे काय, प्रथमोपचाराची मार्गदर्शक तत्वे, जखमांचे प्रकार, लक्षणे आणि उपचार, ट्रॉमा व्यवस्थापन तसेच सी.पी.आर. म्हणजे काय? तो कधी व केव्हा द्यावा, इत्यादी बाबत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले.