भारतीय संस्कृतीने जगाला अमूल्य ठेवा म्हणून दिलेला योग हाच श्वास आणि ध्यास मानून जगत आलेल्या योगवेड्या मनोज पटवर्धन यांच्याविषयी...
लहानपणापासून संघाच्या शाखेत निर्माण झालेली सूर्यनमस्कार आणि योगासनांची असलेली आवड जोपासत, मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या तरुणाने ऐन तारुण्यात बड्या कंपनीमधील गलेलट्ट पगाराची नोकरी सोडली. देशभर फिरताना विविध योग संस्थांमध्ये प्रशिक्षण घेऊन स्वतःला तयार केले. योग प्रशिक्षक आणि योग थेरपिस्ट अशी नवी ओळख निर्माण केली. पाहता-पाहता आंतरराष्ट्रीय पातळीवर योगाचे प्रशिक्षण देण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. युरोपातील अनेक देश त्यांनी योग प्रशिक्षणासाठी पालथे घातले. पुण्यामध्ये राहणार्या आणि संघाच्या संस्कारांत वाढलेल्या या योगवेड्या व्यक्तीचे नाव आहे मनोज पटवर्धन.
ते किर्लोस्कर कंपनीमध्ये मार्केटिंग विभागात उच्च पदावर काम करीत होते. लहानपणापासून त्यांना सूर्यनमस्कार आणि योगसाधनेची आवड. ते सुरुवातीला पुण्यातील मुकुंद नगर भागात राहत असत. तेथे सुनील दळवी आणि सुबोध दळवी या दोन भावांनी त्यांना हाताला धरून संघाच्या शाखेत न्यायला सुरुवात केली. अवघ्या तीन-चार वर्षांचे असलेले मनोज शाखेत जाऊ लागले. शाखेमध्ये सूर्यनमस्कार आणि आसने करून घेतली जात. त्यांना सूर्यनमस्काराची विशेष आवड निर्माण झाली. सुनील दळवी सध्या ‘जनकल्याण समिती’चे काम करतात. त्यानंतर काही काळाने डॉ. पराग ठुसे यांच्या संपर्कातून योगविषयक अधिक माहिती त्यांना मिळू लागली.
दरम्यान, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून मनोज पटवर्धन हे एका कंपनीमध्ये मार्केटिंग विभागात उच्च पदावर नोकरीस लागले. पण, योगाभ्यासाची लागलेली आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. तरुणपणात त्यांची आवड अधिक वाढतच गेली. कामाच्या निमित्ताने त्यांचे देशभर फिरणे होत होते. देशभर फिरत असताना त्यांनी जोपासलेला योगाचा छंद मात्र त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. ते ज्या राज्यांमध्ये, ज्या शहरांमध्ये जात, तेथील स्थानिक योगशिक्षण संस्थांना आवर्जून भेट देत असत. तेथे प्रशिक्षण देखील घेत असत.
वयाच्या पस्तीशीमध्येच त्यांनी योग विषयाला वाहून घेण्याचे ठरवले. निवृत्तीनंतर काहीतरी करण्यापेक्षा उमेदीच्या काळामध्येच योगविषयक कार्य करावे, असा निग्रह त्यांनी केला. या संदर्भात त्यांनी अनेकदा वडिलांना नोकरी सोडून योगविषयक काम करण्याची इच्छादेखील बोलून दाखवली. परंतु, वडिलांनी ‘नोकरी करतच योग कर’ असा सल्ला दिला. वडील निवर्तल्यानंतर मात्र त्यांनी नोकरी सोडली. नोकरी सोडत असताना पत्नी माधुरी आणि आई शुभदा यांचीदेखील त्यांनी समजूत काढली. वयाच्या ४०व्या वर्षी नोकरीचा राजीनामा दिला. पूर्णवेळ योग शिक्षण आणि प्रशिक्षण असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. ‘योग थेरपिस्ट’ म्हणून सुद्धा ते काम करू लागले. शनिवार-रविवार ते काही ठिकाणी योग शिकवण्यासाठी जाऊ लागले. त्यासोबतच डॉक्टर, सेलिब्रिटींना योग प्रशिक्षण देऊ लागले. कर्करोग, पाठीच्या आजाराचे रुग्ण, मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या उपचारांमुळे फरक पडू लागला.
सध्या ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासह आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये योग शिकवतात. या सोबतच विविध संस्थांनादेखील ते योगाचे धडे देतात. केंद्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाद्वारे चालवल्या जाणार्या अभ्यासक्रमात ते योग हा विषय शिकवतात. या ठिकाणी तयार झालेली मुले पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतात. एवढेच नव्हे, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे योग विषयक प्रोजेक्टदेखील तपासण्याचे काम त्यांच्याकडे आहे. ‘राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळा’च्या ‘वर्ल्ड स्किल्स’ कार्यक्रमांतर्गत युरोपमध्ये घेतल्या जाणार्या स्पर्धांमध्ये बसणार्या विद्यार्थ्यांना योग शिकवण्यासाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. मनोज पटवर्धन यांनी आतापर्यंत अनेक स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. ‘क्रीडा भारती’च्या कामामध्येदेखील ते सक्रिय आहेत. युरोपातील सहा देश, जर्मनीमध्ये दोन वेळा, थायलंड, जपान, सिंगापूर आदी देशांमध्ये त्यांचा योग प्रशिक्षण विषयक प्रवास झालेला आहे. कोरोनाच्या आधी ऑस्ट्रेलियामध्ये त्यांचा दौरा ठरला होता. कोरोनामुळे हा दौरा होऊ शकला नाही.
प्राणायाम आणि योगावर त्यांचे विशेष कौशल्य आहे. आतापर्यंत जवळपास साडेतीन हजारांपेक्षा अधिक वैयक्तिक विद्यार्थ्यांना त्यांनी योग प्रशिक्षण दिले आहे, तर विविध संस्था, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्थांमधून १५ हजारांच्या आसपास विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून योग अभ्यासाचे धडे घेतले आहेत. त्यांनी अगदी सहज सोप्या शब्दांमध्ये समजेल आणि करता येतील, अशा योगासने आणि प्राणायाम संदर्भात ‘पॉपकॉर्न योग’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. तसेच, ध्यानासंबंधी असलेले गैरसमज-समज या विषयाचा उहापोह करणारे आणि ध्यानाचे अंतरंग उलगडून दाखवणारे ‘ध्यान एक आनंदयात्रा’ हे पुस्तकदेखील त्यांनी लिहिलेले आहे.
त्यांचा मुलगा स्वानंद हा वडिलांच्या मुशीत तयार झाला असून, तोदेखील उत्तम प्रकारे योग करतो. मनोज पटवर्धन यांच्या आई शुभदा यांचे वय ८० आहे. परंतु, त्यादेखील सर्व प्रकारची योगासने लीलया करतात. सर्व स्पर्धांमध्येदेखील हिरीरीने भाग घेतात. त्यांनी नुकतेच १०० सूर्यनमस्कार घालण्याचादेखील उपक्रम केला होता. मनोज यांच्या या कामामध्ये त्यांची पत्नी, आई आणि मुलगा खंबीरपणाने त्यांची साथ देत आहेत. योग हा भारतीय संस्कृतीने जगाला दिलेला अमूल्य ठेवा आहे आणि तो जपण्याचे काम मनोज पटवर्धनांसारखे संघ स्वयंसेवक करीत आहेत. त्यांना दै. ’मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
लक्ष्मण मोरे