न्यूयॉर्क/मुंबई : जागतिक योग दिनानिमित्त दि. २१ जून रोजी जगभरातील बहुतांश देशात योग दिन साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयालयाबाहेर योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. या कार्यक्रमाला 190 देशांचे प्रतिनिधी, तसेच योग अभ्यासक आणि अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून उपक्रमाचे महत्त्व विषद केले. यावेळी पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्र संघाचे आभार मानले.
यावेळी योगासनांची काही प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. त्यात पंतप्रधान मोदीही सहभागी झाले होते. अमेरिकेत दररोज सुमारे तीन कोटी लोक योगासने नियमितपणे करीत असल्याची माहिती देण्यात आली. नऊ वर्षांपूर्वी दि. २१ जून रोजीच ‘योगा डे’ सुरू केल्यापासून जगभरात दररोज ३० कोटी लोक योगसाधना करतात. दहा कोटी लोक भारतात योगसाधना करत असून दिवसेंदिवस योग करण्याची प्रथा वाढत असल्याचे दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रांगणात योगसाधनेचा भव्य कार्यक्रम झाला. एखाद्या कार्यक्रमात सर्वाधिक देशांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमाची ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे.
योग म्हणजे एकजूट होणे. योगासनांमुळे शरीर, मन निरोगी राहण्यास मदत होते. हे एक मोठं शास्त्र जगाला मिळालेलं आहे. योगसाधना ही भारताची अत्यंत जुनी परंपरा आहे. त्यामुळे नऊ वर्षांपूर्वी आम्ही योग दिन साजरा करण्यास सुरुवात केली. योगा हा जीवन जगण्याचा समृद्ध मार्ग आहे.