नवी दिल्ली : दहशतवादावर चीनचा नवा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी साजिद मीर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्तावाला चीनने आडकाठी आणली आहे. भारत आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. चीनने यापूर्वी साजिद मीरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्तावही रोखला आहे.
भारत आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अल-कायदा प्रतिबंध समिती १२६७ समोर साजिद मीरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावात मीरची संपत्ती जप्त करणे, त्याच्या प्रवासावर बंदी घालणे आणि शस्त्रास्त्रांच्या वापरावर बंदी घालण्याची चर्चा होती. मात्र चीनने पुन्हा एकदा साजिद मीरला वीटो करून वाचवले आहे.
यापूर्वी सप्टेंबर २०२२ मध्ये साजिद मीरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव आणला होता. मात्र, त्यावेळी ही चीनने हा प्रस्ताव रोखला. साजिद मीर हा भारत आणि अमेरिकेचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात साजिदचा हात होता. या हल्ल्यात भारतीयांसह अमेरिकन नागरिकही इस्लामिक दहशतवादाचे बळी ठरले. अशा परिस्थितीत अमेरिकेने त्याच्यावर ५ लाख डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे.
विशेष म्हणजे, जून २०२२ मध्ये पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने साजिद मीरला टेरर फंडिंग प्रकरणात १५ वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा सुनावली होती. दरम्यान साजिद मीर मृत झाल्याचा दावा यापूर्वी पाकिस्तानने केला होता. मात्र भारत, अमेरिकेसह इतर अनेक देश त्यांच्या मृत्यूचे पुरावे मागत होते. मात्र, त्यानंतर FATF (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) च्या दबावानंतर पाकिस्तानने साजिद मीरवर कारवाई केल्याचा आरोप आहे.
चीनने मसूद अजहरलाही संरक्षण दिले होते
याआधी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव चीनने रखडवला आहे. मात्र, जगभरातील देशांसमोर वारंवार उघड झाल्यानंतर अखेर मे २०१९ मध्ये चीनने मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचे मान्य केले. आता मसूद अजहर हा जागतिक दहशतवादी आहे.