नवी दिल्ली : भारतातील २६/११ च्या हल्ल्यात सामील असलेल्या लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी साजिद मीर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात चीनने पुन्हा एकदा अडथळा आणला आहे. चीनने संयुक्त राष्ट्रात भारत आणि अमेरिकेचा प्रस्ताव रोखला असून भारताने त्यावर जोरदार टिका करून संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी लढ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
पाकिस्तानच्या लष्कर ए तोयबाचा दहशतावादी साजिद मीर यास जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव अमेरिकेने भारताच्या पाठिंब्याने मांडला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नियम १२६७ नुसार, अल-कायदाच्या या दहशतवाद्यावर जागतिक स्तरावर बंदी घातली जाईल आणि त्याला कायदेशीर प्रवास, व्यवहार आणि कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर मदतीपासून वंचित ठेवले जाईल. मात्र, चीनने पुन्हा एकदा आपला नकाराधिकार वापरून या दहशतवाद्यास अभय दिले आहे.
यावर भारताने आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारताने म्हटले की, काही वैयक्तिक स्वार्थामुळे हे प्रयत्न रखडले आहेत. दहशतवादाच्या आव्हानाचा प्रामाणिकपणे सामना करण्याची राजकीय इच्छाशक्ती आपल्याकडे नाही, हे यावरून स्पष्ट होते. जगात चांगला किंवा वाईट दहशतवाद असे काही नाही. त्यामुळे दुतोंडी भूमिका घेणे प्रत्येक देशाने टाळणे गरजेचे आहे.
प्रस्थापित दहशतवाद्यांशी केवळ आपले छोटे हितसंबंध जोडलेले असल्यामुळे त्यांच्यावर बंदी घालू शकत नसू, तर दहशतवादाशी लढण्याची इच्छाशक्ती नाही, हे स्पष्ट होत असल्याचेही भारताने सुनावले आहे. यावेळी भारताने दहशतवादी मीर याची २६/११ च्या हल्ल्याची ध्वनीफितदेखील संयुक्त राष्ट्रामध्ये सादर केली आहे.