कुंडलिनीशक्ती - ज्ञान-विज्ञान

    21-Jun-2023
Total Views | 67
Article On Kundalini Shakti

योगाचे जीवनातील स्थान

योग म्हटला की, साधारणतः आसनांचीच कल्पना आपल्यासमोर उभी राहते. परंतु, आसने योगाचा एक अष्टमांश भाग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी ही योगाची अष्ट अंगे होत. आसनांमुळे शरीर निरोगी आणि दीर्घजीवी बनू शकते. शरीर अत्यंत प्राकृतिक असले म्हणजे त्याचे आधारे असणारे मनसुद्धा तितकेच प्राकृतिक म्हणजे शुद्ध अवस्थेत असू शकते. मन शुद्ध झाल्यास चित्त अवस्था आपोआप उदित होते आणि चित्त शुद्ध असल्यास ज्ञानप्राप्ती होऊन साधक आत्मज्ञानाच्या मार्गाला लागतो, असा हा मुक्तीचा सोपान आहे. म्हणून आसनांचे उद्दिष्ट केवळ शरीरस्वास्थ्यापुरतेच मर्यादित नसून, त्याही पलीकडील आत्मज्ञानाकडे असते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे आणि म्हणूनच आसनांना ’आसन’ हे अत्यंत सुयोग्य नाव दिले आहे. ‘आ’ म्हणजे प्राप्त झालेले सर्व घेऊन ’सन’ म्हणजे पलीकडे जाणे होय. पलीकडे कोठे? तर प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा व शेवटी समाधी अवस्था होय.

शरीराच्या माध्यमातून आपण वरील सर्व गोष्टी प्राप्त करू शकतो. म्हणून शास्त्र सांगते ‘शरीरं आद्य खलु धर्म साधनम।’ येथे धर्म म्हणजे हिंदू, मुसलमान अथवा ख्रिश्चन न समजता आपल्या शरीर, मन व बुद्धीच्या क्षमतेनुसार ज्ञानसाधना करणे होय. उच्च उच्चतर साधना करण्याकरिता प्रथम आपले शरीर तितक्या प्रमाणात उच्च उच्चतर क्षमतेचे असणे आवश्यक असते. आसने ही ज्ञानसाधनेची प्रथम पायरी होय, सर्वस्व नव्हे. भक्तियोग अथवा ज्ञानयोगमार्गात शरीर निकोप असणे अत्यावश्यक आहे. असल्या निकोप शरीरात निकोप मन राहून त्याद्वारे आपोआप मनाची एकाग्रता वाढते. मन एकाग्र झाले म्हणजे चिंतन अथवा ध्यान आपोआप साधते. आजचे युग ‘विज्ञान युग’ मानले जाते. संशोधन करणार्‍या वैज्ञानिकांना आपल्या मनाच्या एकाग्रतेमुळेच संशोधन करणे शक्य झाले आहे. सर्व थोर वैज्ञानिक आधुनिक ऋषीच होत. आपले मन ध्यानाद्वारे एकाग्र करून ऋषी अध्यात्मिक चिंतन करीत आणि त्याद्वारे ज्ञानविज्ञानांतील गहन तत्त्वे समाजासमोर ठेवीत असत. वेदातील सर्व ज्ञानविज्ञान ऋषींनी सखोल चिंतनाद्वारा प्राप्त केले.

आजचे थोर वैज्ञानिकसुद्धा तसल्या सखोल चिंतनाचा उपयोग करून नवनवे शोध लावतात आणि मानवी जीवन सुखी व समृद्ध करण्याचा अहोरात्र प्रयत्न करतात. वैज्ञानिकांच्या मनाची एकाग्रता अथवा चिंतनाची क्षमता सर्वांमधे जन्मतः असू शकत नाही. त्याकरिता आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा इत्यादी योग्य मार्गाने आपण आपल्या मनाची एकाग्रता व सखोल चिंतनाची क्षमता वाढवू शकतो. योगसाधना एक प्रकारचे प्रशिक्षण आहे. आजकाल जीवनाच्या प्रत्येक कक्षेत प्रशिक्षणाचे महत्त्व वाढत आहे. मनाच्या एकाग्रतेची व सखोल चिंतनाची गुरूकिल्ली ध्यान प्रक्रियेत आहे. ध्यानामुळे मन अतिशय एकाग्र बनत असते. असल्या एकाग्र मनाचा उपयोग आपण आपल्या जीवनातील कोणत्याही कामाकरिता करून त्यात लवकर उन्नती व पूर्णतः प्राप्त करू शकतो.

आसनानंतर थोडे आवश्यक असे प्राणायाम सिद्ध करणे शरीरारोग्य आणि मन संयमाकरिता आवश्यक असते. प्राणायामामुळे मनात विलक्षण संयम येतो. असले संयमित मन अध्यात्मात अतिशय आवश्यक असते. मन खंबीर नसेल, तर व्यवहारात निर्णय घेऊन त्यातून कुशलतेने मार्ग काढणे असंभव होते. स्थिर मन आपोआप सिद्ध होत नसते, तर त्याकरिता प्राणायाम आणि ध्यानासारख्या प्रक्रिया अतिशय लाभदायक ठरतात. जी व्यक्ती नेहमी प्राणायाम व ध्यानाचा अभ्यास करते, तिला प्रसंगी विलक्षण धैर्य प्राप्त होऊन ती त्या प्रसंगातूनही कुशलतेने पार निघून जाते. तेव्हा, व्यवहारात यश व धैर्य प्राप्त होण्याकरिता प्राणायाम व ध्यानाची अतिशय आवश्यकता आहे. प्राणायाम व ध्यान धीर मनाचे प्रशिक्षण होय. ध्यानाची सिद्धता तर आणखी वरचढ असते. ध्यानामुळे मनाची एकाग्रता विलक्षण वाढून ते मन ज्या विषयात एकाग्र केले जाईल तो विषय इतरांपेक्षा फारच कमी वेळात त्या व्यक्तीला साध्य होईल. बरेच विद्यार्थी सारखे वाचत असतात, पण वाचलेले विषय त्यांच्या लवकर ध्यानात राहत नाहीत.

असल्या विद्यार्थ्यांनी ध्यानाचा अभ्यास केल्यास, त्यांनी वाचलेला वा ऐकलेला विषय इतरांपेक्षा लवकर व नेहमी त्यांच्या ध्यानात राहील म्हणून शिक्षकांनी अपेक्षित प्रश्नपत्रिका धुंडाळून त्या विद्यार्थ्यांना सांगून त्यांना कसेतरी उत्तीर्ण करण्याचा आटापिटा न करता, विद्यार्थ्यांकरवी ध्यान करवून घेतल्यास विद्यार्थी अधिकाधिक गुण मिळवू शकतील, असा अनुभव आहे. विषय ध्यानात राहण्यास मनाची एकाग्रता आवश्यक असते. ज्यांचे मन लवकर एकाग्र होऊ शकत नाही, त्यांनी ध्यान केल्यास त्यांचे मन कोणत्याही विषयात एकाग्र बनून तो विषय ध्यानात अधिक लवकर राहील. पूर्वी गुरूकुलात विद्यार्थ्यांना ध्यानात अधिक प्रवीण करीत असत आणि त्याद्वारे विद्यार्थी कोणत्याही विषयात लवकर पारंगत होत असे. ध्यानाचा अभ्यास पुन्हा अधिक प्रमाणात होणे आवश्यक आहे. जबाबदारीच्या जागी असलेल्या व्यक्तींना तर अतिशय सावध राहून निर्णय घ्यावे लागतात. असला माणूस जर ध्यानसाधक असेल, तर त्याचेद्वारे सुयोग्य निर्णय घेतले जातील यात शंका नाही.

ध्यानाचा अभ्यास करणार्‍या डॉक्टर वैद्यांना अधिक यश मिळेल, हे निश्चित. राजकारण्यांचे मन व बुद्धी संयमित आणि सर्व समाजाच्या सुखाकरिता विचार करणारे नसेल, तर त्यांच्याद्वारे समाजावर विलक्षण आपत्ती ओढविण्याचा प्रसंग येत असतो. तेव्हा, राजकारणात रस घेणार्‍यांना सर्वप्रथम ध्यानसाधना सिद्ध करणे आवश्यक असते. ध्यानसिद्ध साधक राजकारणी व्यक्तीद्वारे समाजाचे कल्याणच होते. साध्या लेखणीपासून तो प्रवासापर्यंतच्या सर्व कामात वैज्ञानिक शोधाद्वारे प्राप्त झालेली सुलभ आणि आवश्यक उपकरणे वापरावी लागतात. एकाग्र चित्ताद्वारेच नवीन शोध लागत असतात. प्रशिक्षण म्हणजे आवश्यक तो उत्तम संस्कार व विषयात मन एकाग्र करण्याची किमया होय. ही किमया ध्यानाद्वारे सर्वांनाच सिद्ध होऊ शकते. ध्यानसिद्ध व्यक्ती जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात इतरांपेक्षा लवकर प्रगती करू शकते, हा अनुभव आहे. म्हणून जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात प्रगती करण्याकरिता सर्व क्षेत्रांना सामान्य असलेल्या ध्यानाचे प्रशिक्षण सर्वांना असणे आवश्यक आहे. ध्यान योगाचा गाभा होय. ध्यानामुळे कुंडलिनी जागृत होऊन साधक सर्वगुणसंपन्न होतो. साधकाला सर्व ज्ञान प्राप्त होऊ शकते गीता यावर स्पष्ट सांगते-

नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।
तत् स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विंदति।
योगाचा मानवी जीवनाशी इतका निगडीत संबंध आहे. योगामुळे जीवन अधिक संपन्न, समृद्ध व सुसंस्कृत बनेल हे निश्चित.
(सूचना : कुंडलिनी शक्ती ज्ञान-विज्ञान लेखमाला समाप्त.)


योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७
अग्रलेख
जरुर वाचा
दाऊदी बोहरा समुदायाचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला; वक्फ बोर्डावरून महत्त्वपूर्ण चर्चा; काय घडलं?

दाऊदी बोहरा समुदायाचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला; वक्फ बोर्डावरून महत्त्वपूर्ण चर्चा; काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी गुरुवारी दाऊदी बोहरा समुदायाच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला. त्यात व्यापारी नेते, व्यावसायिक, डॉक्टर, शिक्षक आणि दाऊदी बोहरा समाजातील अनेक प्रमुख प्रतिनिधींचा समावेश होता. उपस्थितांनी वक्फ बोर्डासोबत असलेल्या आपल्या संघर्षाबद्दल सांगितले. शिष्टमंडळाने त्यांच्या समाजातील सदस्यांच्या मालमत्तेवर वक्फने चुकीचा दावा कसा केला हे देखील स्पष्ट केले. वक्फ दुरुस्ती कायदा आणल्याबद्दल शिष्टमंडळाने पंतप्रधानांचे आभार मानल्याचे दिसून आले. PM talk ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121