मुंबई : बंजारा समाजाला भाजपाच न्याय देऊ शकतो. बंजारा समाजाच्या हक्कांमध्ये कोणालाही वाटेकरी होऊ देणार नाही आणि महाराष्ट्र सरकार या समाजाच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहील. अशी जाहीर भुमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडली. बंजारा समाजाच्या पदाधिकार्यांनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले, "जे बजेट आमच्याकडून देण्यात आलं आहे, त्यात भटक्या विमुक्त समाजाकरता अनेक योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘मोदी आवास योजने’मध्ये जास्तीत जास्त बंजारा समाजातील लोकांना कसं समाविष्ट करता येईल, ज्यांना घर नाही त्यांना घर देण्याचं काम हे तुमच्या नेतृत्वाखाली तयार झालं पाहिजे, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी बंजारा समाजाच्या पदाधिकार्यांना केली. तसेच जेवढी घरं मागाल तेवढी घरं आम्ही देऊ." असं ते म्हणाले.
"महामंडळाच्या माध्यमातून नवीन योजना तयार करुन, निधी पुरवून बंजारा समाजाच्या तरुणाईच्या हाताला काम दिलं जाईल. कुठेही महामंडळाला पैसा कमी पडू दिला जाणार नाही. तसेच बंजारा समाजाशिवाय भारतीय संस्कृती अपूर्ण आहे. प्रत्येक तांड्यापर्यंत रस्ता, पिण्याचं पाणी, विकास पोहोचला पाहिजे, यासाठी संत सेवानंद महाराजांच्या नावाने अभियान सुरु केलं आहे. तसेच तांड्याला ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, या मागणीबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लवकरच तोडगा काढला जाईल." असं महत्त्वपूर्ण विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं.