स्वातंत्र्यसमरात सहभागी झाल्याबद्दल इंग्रजांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप केला. त्यांना पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यांची रवानगी हैदराबाद सिंध येथील तुरुंगात करण्यात आली. अशा या स्वातंत्र्यासाठी प्रचंड हालअपेष्टा भोगलेल्या दामोदर चंद्रात्रे यांची ही शौर्यगाथा...
दामोदर महादेव चंद्रात्रे यांचा जन्म दि. २२ फेब्रुवारी, १८८२ नाशिक येथे झाला. सातव्या वर्षी रितीप्रमाणे त्यांचा उपनयन संस्कार झाला आणि लागलीच दोन महिन्यांनी त्यांचे पितृछत्र हरवले. पण, त्यांच्या आई मोठ्या खंबीर स्वभावाच्या. त्यांनी आपले दुःख बाजूला सारून मुलांना योग्य संस्कार देऊन वाढवले. कठीण परिस्थिती कशाला म्हणतात हे दामोदर जाणून होते. मराठी शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी संध्या, पूजा नित्य ब्रह्मकर्माचा अभ्यासही पूर्ण केला. वयाच्या १४व्या वर्षी त्यांचा विवाह झाला आणि अवघ्या सहा वर्षांत ‘प्लेग’ची बाधा होऊन त्यांच्या पहिल्या पत्नीचे आणि नवजात मुलांचे निधन झाले. दुःखाची नजर परत एकदा चंद्रात्रे कुटुंबावर पडली.
दामोदरपंत हे व्यायामाचे तसेच कुस्तीचे चाहते होते. त्यांचे शरीर आखाड्यात तयार झाले होते. अनेक कुस्त्यांमधून त्यांनी पारितोषके संपादन केली होती. गोदावरीच्या पुरात अनेक जणांचे प्राण वाचविले होते. त्याकाळात दामोदरपंतांना वाचनाची आवड होती. त्यांनी अनेक क्रांतिकारकांच्या जीवनावरची पुस्तके वाचली. साधारण १९०४ साली त्यांचे मित्र विष्णुशास्त्री केळकर यांच्यामुळे ते ‘अभिनव भारत’ संस्थेच्या संपर्कात आले आणि त्याची अवघड अशी प्रतिज्ञा घेऊन ते संस्थेचे सक्रिय सभासद झाले. क्रांतीचे वारे आता चंद्रात्रे कुटुंबात वाहू लागले. तो काळच असा होता की स्वतःपेक्षा, कुटुंबापेक्षाही राष्ट्र महत्त्वाचे होते. अगदी प्रत्येक घर या विचारांनी प्रेरित होते. चंद्रत्रेंचे घर वेगळे नव्हते. दामोदरपंत ज्यांना दामुअण्णाही म्हणत तर दामुअण्णा कामाला लागले, संस्थेच्या गुप्त सभांना हजर राहणे, स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार, विदेशी वस्तूंची होळी, सभासदांचे संघटन करणे, क्रांतिकारक वाङ्मयाचा प्रचार प्रसार करणे, देशातील इतर भागातील क्रांतिकरकांशी संबंध जोडणे अशी सगळी कामे ते करू लागले.
याचकाळात कवी गोविंदांच्या कवितेचं पुस्तक छापले या क्षुल्लक कारणावरून बाबासाहेब सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली राजद्रोहाच्या आरोपाखाली. त्यानंतर सेनापती बापट यांनी पाठवलेल्या ‘बॉम्ब’ पुस्तिकेवरून ‘बॉम्ब’ बनविण्याचे काम नाशिकमध्ये सुरू करण्यात आले. दामुअण्णा यांनी स्वतः सगळी माहिती गोळा केली आणि चार भरवश्याच्या माणसांना ‘बॉम्ब’ची कृती शिकवली. नाशिकमध्ये ‘बॉम्ब’चा कारखाना सुरू झाला तो आसरीवरच्या शुक्लांच्या वाड्यात. दि. २१ डिसेंबर, १९०९ रोजी स्वातंत्र्यसेनानी अनंत कान्हेरेंनी जॅक्सनचा वध केला, त्याच रात्री १०-११ वाजण्याच्या सुमारास विनायक नारायण देशपांडे हे दामुअण्णांच्या वाड्यावर पोहोचले. देशपांडे यांनी ’आपले काम यशस्वी झाले’ ही बातमी दामुअण्णांना दिली. काम तर झाले पण पुढची तयारी करायची होती. त्यामुळे त्या बातमीनंतर दामुअण्णा पुढच्या कामाला लागले. आसरीवरील शुक्लांच्या वाड्यावर गेले. तिथे तिसर्या मजल्यावर ‘बॉम्ब’ बनवायचा कारखाना होता. ‘अभिनव भारत’ संस्थेचा. सगळी कागदपत्रे एकत्रित करून एका मोठ्या स्टीलच्या पातेल्यात तिथेच जाळून टाकली. ‘बॉम्ब’ला लागणारे सगळे साहित्य घेऊन ते आणि हरिभाऊ आंबेकर गोदावरी नदी जवळील स्मशानभूमीत गेले. ते सगळे विस्फोटक साहित्या त्यांनी गोदावरी नदीत टाक ‘बॉम्ब’च्या कारखान्याची सगळी विल्हेवाट लावून दामुअण्णा शांतपणे घरी येऊन झोपले.
मात्र, ही शांतता फार काळ टिकली नाही. दि. २४ डिसेंबर, १९०९ रोजी रात्री उशिरा दामुअण्णांना अटक झाली. अनन्वित शारीरिक छळ, अपमान, हाल, अमानुशरीतीने मारझोड करून झाल्यावर १५ दिवसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयापुढे उभे करण्यात आले. न्यायालयाचा निकाल राजद्रोह असा आला. त्यांना पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांची रवानगी हैदराबाद सिंध येथील तुरुंगात करण्यात आली. तुरुंगात शारीरिक छळातून सुटका नव्हतीच तरीपण दामु अण्णांनी तिथे तत्वचिंतन, धार्मिक ग्रंथ वाचन, वेद पठण सुरूच ठेवले. पाच वर्षांच्या प्रदीर्घ तुरुंगवासातून सुटून आल्यावर त्यांनी आपले सामाजिक कार्य तसेच सुरू ठेवले.
समाजोपयोगी आणि समाज जगृतीची कामे त्यांनी केली. तसेच राजकारणातसुद्धा त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यातून अंतिम उद्दिष्ट समाज संघटन, समाजप्रबोधन हेच ठेवले. त्यांच्या वैदिक धर्माच्या जाज्वल्य अभिमानाबद्दल व त्यांच्या प्रचारकार्याबद्दल श्री शंकराचार्यांनी त्यांना ’धर्मभूषण’ ही बहुमानाची पदवी त्यांना बहाल केली. अशा दामु अण्णांना स्वातंत्र्योत्तर काळात सरकारकडून स्वातंत्र्य सैनिकांसाठी योजनेविषयी माहिती पाठवली गेली आणि विचारणा केली गेली की, आपल्याला कुठल्या योजनेचे लाभार्थी व्हावयास आवडेल, त्यावेळी दामु अण्णांनी दिलेले उत्तर एका स्वातंत्र्य सैनिकाला शोभेसे होते, ते म्हणाले, ’आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, हीच आमच्या कामाची पावती, यापुढे आम्हाला दुसरे काही नको.’ सरकारी नोकरांनी तशा कागद पत्रावर त्यांची सही घेतली. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता केलेली ही निःस्वार्थ देशसेवाच आहे, अशा महान देशसेवकाला आमचे कोटी कोटी नमन..
सोनाली तेलंग
९८८११३२३९३