देशात १९८०च्या दशकात दलितांची जशी परिस्थिती होती, तशीच आता मुस्लिमांची आहे; हे अमेरिकेत जाऊन सांगणारे राहुल गांधी आपल्या आजी आणि वडिलांच्या कारकिर्दीचे सत्य सांगत आहेत. कारण, या कालखंडात अनुक्रमे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी सत्तेत होते. त्यामुळे त्याचे स्वागत करावयास हवे. गांधी कुटुंबातील कोणीतरी आपल्या पक्षाचे सत्य खुलेपणाने सांगत असेल, तर ते देशासाठी अतिशय महत्त्वाचेच!
मोदी आडनाव मानहानी प्रकरणात खासदारकी गमाविलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या अमेरिका दौर्यावर आहेत. या दौर्यामध्ये नेहमीप्रमाणे विविध विद्यापीठांमध्ये भाषणांचे कार्यक्रम आयोजित करवून ‘कित्ती गं बाई मी हुशार’ असा त्यांचा कार्यक्रम सादर केला जाईल. त्यानंतर मग भारतातील त्यांचे समर्थक बघा बघा, राहुल गांधी हे कसे जागतिक नेते आहेत, अशी डायलॉगबाजी करतील. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्याची तुलना राहुल गांधींच्या अमेरिका दौर्याशी करण्याचा बिनडोकपणाही अनेकांना करावासा वाटणार, यात तीळमात्रही शंका नाही. साधारणपणे राहुल गांधी यांच्या प्रत्येक परदेश दौर्याविषयी अशाचप्रकारची वातावरणनिर्मिती केली जाते आणि राहुल गांधी दरवेळी परदेश दौर्यामध्ये पक्षाच्या भूमिकेविषयी संशय निर्माण करणारे वक्तव्य करतात. अर्थात, राहुल गांधींकडून हे अजाणतेपणी होते, असे मानण्याचे काही कारण नाही. कारण, ते एका विशिष्ट ‘इकोसिस्टीम’ला साजेसे बोलतात, असा आरोप सत्ताधारी भाजपकडून नेहमीच केला जात असतो. जागतिक अराजकतावादी जॉर्ज सोरोस आणि काँग्रेस पक्ष यांच्या भूमिकांमध्ये साम्य आढळते, असाही आरोप करण्यात येत असतो.
राहुल गांधी यांनी त्यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये कथितरित्या सर्वसमावेशक भूमिका घेतल्याचा दावा केला होता. यामध्ये काँग्रेसची प्रमुख भूमिका म्हणजे मुस्लीम लांगूलचालनास थोडे लांब ठेवल्याचे भासविण्यात आले होते. त्याचप्रमाणे ‘द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडण्यास निघालो आहोत,’ असाही दावा त्यांच्याकडून करण्यात येत होता. अर्थात, त्यांचा हा दावा ‘भारत जोडो’ यात्रेसोबतच निकाली निघाला होता. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने मुस्लीम लांगूलचालनास पुन्हा स्वीकारून ‘बजरंग दल’ या हिंदुत्ववादी संघटनेवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. त्यानंतर नेहमीप्रमाणे सारवासारव करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, आपल्या मूळ लांगूलचालनवादी भूमिकेपासून काँग्रेस फार काळ दूर राहू शकत नाही, हेच त्यामुळे अधोरेखित झाले होते. निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशामुळे काँग्रेसलाही आपल्या मूळ भूमिकेस पुन्हा मिठी मारण्याची अतीव इच्छा निर्माण झाली होतीच. त्यामुळे सर्वसमावेशकतेचे सोंग झटकून टाकण्यासाठी काँग्रेसने मुहूर्त निवडला, तो माजी खासदार राहुल गांधी यांच्या अमेरिका दौर्याचा!
अमेरिका दौर्यामध्ये राहुल गांधी यांनी सॅन फ्रान्सिस्को येथे भारतीय समुदायासमोर भाषण दिले. यामध्ये त्यांनी देशातील मुस्लीम समाज हा भयभीत असल्याचा जुनाच आरोप नव्याने केला. ते म्हणाले, “आज देशातील मुस्लिमांची स्थिती अतिशय गंभीर आहे. देशात १९८०च्या दशकात प्रामुख्याने उत्तर प्रदेशात दलितांसोबत जे घडत होते, तेच आज मुस्लिमांसोबत घडते आहे. केवळ मुस्लीमच नव्हे, तर आज देशातील शीख, ख्रिश्चन, दलित आणि आदिवासी यांनादेखील तेच वाटते.” आता हा दावा करून राहुल गांधी हे नेमके कोणास लक्ष्य करत आहेत, ते त्यांच्या सल्लागारांनी स्पष्ट करून सांगण्याची गरज आहे.
कारण, राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे १९८०च्या दशकात देशात काँग्रेस पक्षाचे राज्य होते आणि त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांची राजवट सुरू होती. त्याचवेळी वडील राजीव गांधी हे सक्रिय राजकारणात प्रवेश करते झाले होते. पुढे इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये शीखविरोधी दंगली उसळल्या होत्या. या दंगलीमध्ये तर दिल्लीच्या रस्त्यांवर शब्दश: रक्ताचे पाट वाहिले होते. त्या दंगलींचे ‘मोठा वृक्ष कोसळतो तेव्हा धरणी हादरतेच’ असे निर्लज्ज समर्थन राहुल यांच्या वडिलांनीच केले होते. उत्तर प्रदेशविषयी बोलायचे, तर राहुल गांधी सांगतात त्या कालखंडात १९८० ते १९८५ आणि १९८५ ते १९९० अशी दशकभर काँग्रेसचीच सत्ता होती.
याच कालखंडात उत्तर प्रदेशात दि. २२ मे, १९८७ रोजी हाशिमपुरा गावात झालेल्या हत्याकांडात ४२ मुस्लीम, दुसर्याच दिवशी म्हणजे दि. २३ मे, १९८७ रोजी मलियाना गावात झालेल्या हत्यांकाडात ६८ मुस्लीम, तर दि. २४ ऑक्टोबर, १९८९ पासून पुढील दोन महिने चाललेल्या भागलपूर हत्याकांडात एक हजार जणांचा बळी गेला होता आणि त्यामध्ये जवळपास ९०० मुस्लिमांचा समावेश होता. केवळ उत्तर प्रदेशच नव्हे, तर राहुल गांधी यांची आजी आणि वडील सत्तेत असताना १९८० आणि ९०च्या दशकात देशात असंख्य दंगली, हत्याकांडे घडली आहेत. त्यामुळे राहुल गांधी हे सांगून आपल्या आजी आणि वडिलांच्या कारकिर्दीचे सत्य सांगत असतील, तर त्याचे स्वागत करावयास हवे. कारण, गांधी कुटुंबातील कोणीतरी आपल्या पक्षाचे सत्य खुलेपणाने सांगत असेल, तर ते देशासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर यावरून टीका करण्याचे कोणतेही कारण नाही.
याच दौर्यात राहुल गांधी यांनी त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची असुयादेखील पुन्हा व्यक्त केली आहे. एखाद्या व्यक्तीसोबत आपण बरोबरी करू शकत नाही, तेवढा आपला वकूब नाही; हे ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला माहिती असते, तेव्हा तो उगाच कुजकट टिप्पण्या करून स्वत:चे समाधान करून घेत असतो. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. ते म्हणाले, “काही लोकांना असे वाटते की, ते देवापेक्षा जास्त जाणतात. लोकांना वाटते की, पंतप्रधान मोदींना सर्व काही माहीत आहे. तुम्ही मोदींना देवाजवळ बसवले, तर ते देवालाही समजावून सांगू शकतील.” या टिप्पणीतून राहुल गांधी यांचे नैराश्य ओसंडून वाहताना दिसते. पंतप्रधान मोदी यांना भारतीय नागरिकांचा अद्याप पाठिंबा आहे. भारतीय नागरिक पंतप्रधानांच्या आवाहनांना प्रतिसाद देतात, अनेकांना भाजपविषयी राग असला तरीही पंतप्रधान मोदींबद्दल विश्वास वाटतो ही बाब राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षास अद्याप पचविता आलेली नाही.
सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद साधण्याच्या पंतप्रधानांच्या सवयीची नक्कल करण्याचाही काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी अनेकदा प्रयत्न केला आहे. मात्र, दरवेळी त्यात त्यांना अपयश आले आहे. त्यामुळे अशा बालिश टिप्पण्या करून राहुल गांधी स्वत:चे समाधान करून घेत असतात. खरे तर परदेश दौर्यांमध्ये भारतविरोधी भूमिका घेण्यापेक्षा राहुल गांधी यांनी सकारात्मक मुद्दे मांडले, तर कदाचित काँग्रेसला लाभ होऊ शकतो. मात्र, ‘आडातच नसेल तर पोहर्यात कुठून येणार’ अशी काँग्रेसची अवस्था असल्याने तेही त्यांना जमण्यासारखे नाही. परिणामी, परदेशात जाऊनही नकारात्मक राजकारण करण्याची सवय काँग्रेसला सोडता येणे शक्य आहे, याची शक्यता तशी धुसरच आहे.
संसदेच्या नव्या वास्तूचे राष्ट्रार्पण झाले आहे. राष्ट्रार्पण कार्यक्रमावर बहिष्कार टाकणारे विरोधी पक्ष आता जुलै महिन्यापासून सुरू होणार्या पावसाळी अधिवेशनात याच नव्या, भव्य आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त संसद भवनात बसणार आहेत. त्यामुळे राष्ट्रार्पणास विरोध करून नेमके काय साध्य केले, हे विरोधकांनाही सांगता येणार नाही. याच नव्या संसदेमध्ये पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक दिल्लीच्या प्रशासकीय नियंत्रणाच्या मुद्द्यावरून एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्र सरकारने अध्यादेश आणला आहे. आता पावसाळी अधिवेशनामध्ये किमान राज्यसभेत तरी विधेयक संमत होऊ नये, यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे विरोधी पक्षांच्या भेटीगाठी घेत आहेत. एरवी काँग्रेससह अन्य प्रादेशिक पक्षांना फाट्यावर मारणारे केजरीवाल जातीने सर्वांच्या भेटीगाठी घेत आहेत. मात्र, राज्यसभेमध्येही बहुमत नसले तरी उत्तम ‘फ्लोअर मॅनेजमेंट’ करणार्या भाजपसमोर केजरीवाल आणि मंडळींचा निभाव लागतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.