विधानभवनाच्या प्रांगणात साजरा होणार आंतरराष्ट्रीय योग दिन

राज्यपालांसह मान्यवर राहणार उपस्थित

    19-Jun-2023
Total Views | 60
International Yoga Day At Vidhanbhavan

मुंबई
: बुधवार, दिनांक २१ जून, २०२३ रोजी प्रात:काली विधान भवनाच्या प्रांगणात योग प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम माननीय विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला आहे. सन्माननीय विधिमंडळ सदस्यांसह सुमारे २००० योगप्रेमी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ७ ते ९.०० यावेळेत II योगप्रभात @ विधान भवन II हा कार्यक्रम होईल. यावेळी विशेष अतिथी म्हणून राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभेल तसेच विशेष निमंत्रित म्हणून सर्व मंत्रीगण, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे उपस्थित राहतील.

योगविद्या आणि ध्यानधारणा ही आपल्या भारतीय संस्कृतीकडून अखिल विश्वाला लाभलेली अनमोल देणगी आहे. २१ जून हा दिवस "आंतरराष्ट्रीय योग दिवस" म्हणून साजरा करण्यात येणे ही सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद अशी घटना आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार जगातील सर्वच देशांमध्ये या दिवशी सामूहिक योगासनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि आरोग्यसंपन्न जीवनशैलीसाठी योगाचे महत्व अधोरेखित केले जाते. याच पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम यंदा विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. अधिकाधिक सन्माननीय सदस्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. योग प्रसार कार्यात उल्लेखनीय योगदान देत असलेल्या शतकमहोत्सवी कैवल्यधाम, मुंबई या संस्थेचा विशेष सहभाग या उपक्रमासाठी लाभला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121