सौंदर्यजतन, सौंदर्यवर्धन- आयुर्वेदासंगे...

    19-Jun-2023
Total Views | 73
Article On Ayurveda Helps Beauty

प्रकृतीनुरुप त्वचा असते व त्यानुसार त्वचेतील विकृती असते, हे आधीच्या लेखांमधून आपण वाचले. आज त्वचेची निगा राखण्यासंदर्भात अजून एक पैलू आपण बघूयात. साबण, फेसवॉश क्लिन्झर याविषयी सविस्तर जाणून घेऊया...

पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा अधिक तेलकट असते, तर वात प्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा स्वभावत: थोडी शुष्क, कोरडी असते, तर कफ प्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा संतुलित असते. विविध ऋतूंचाही परिणाम त्वचेवर होत साहजिकच असतो. थंडीत सगळ्यांचीच त्वचा कोरडी पडते. तेव्हा, काही स्निग्धांश असलेल्या लेपांचा - जसे की, कोल्डक्रीम, मॉश्च्युराईझर इत्यादीचा वापर प्रामुख्याने केला जातो. प्रकृतीनुरुप या कोरडेपणामध्ये शुष्क त्वचेत तरतमता बघायला मिळते. उदा. वात प्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा खूप कोरडी होते. कोरडी पडल्याने कण्ड येते, क्वचित प्रसंगी त्वचा निघू लागते किंवा कापते/चिर पडते. असे झाल्यास खूप दुखणे, झोंबणे इ. त्रास होतात. थंडीत गरम पाण्याने जर अंघोळ केली, तर थंडी कमी वाजते, पण खूप गरम पाण्याने बराच काळ अंग धुतले, अंघोळ केली, तर त्वचेतील नैसर्गिक स्निग्धांश ही निघून जातो व त्वचा अधिक कोरडी होते.

या उलट उन्हाळ्यामध्ये विशेषतः पित्त प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये खूप घाम येतो आणि त्वचाही खूप तेलकट, चिकट होते. हा घाम थोडा दुर्गंधित असतो आणि घाम जर शरीरात जिरला, तर त्वचेवर अत्याधिक खाज येऊ लागते. याउलट वात प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये त्वचा एवढी घामट व तेलकट होत नाही. थोडी चिकट होऊ शकते. कफ प्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा संतुलित असल्याने अत्यंत उन्हाच्या संपर्कात जर आले, तरच प्रचंड घाम येतो, सहजासहजी घाम सुटत नाही. घामामध्ये केवळ जलीयांश नसतो, तर थोडा नैसर्गिक स्निग्धांशही असतो. म्हणून घाम आल्यावर केवळ पाण्याने चेहरा धुतल्यास /अंघोळ केल्यास भागत नाही, पुरत नाही. चेहरा/शरीर थोडे चिकट राहतेच, म्हणून साबणासारखा क्लिन्झर अशा वेळेस गरजेचा वाटतो.

आपली सर्वांगीण त्वचा थोडी अम्लीय असते. संरक्षणार्थ असे असणे अत्यंत गरजेचेही आहे. या अम्लीय स्तरामुळे वातावरणातील विविध जीवाणू जरी त्वचेच्या सतत संपर्कात, सान्निध्यात असले तरी त्यांची अवाजवी वाढ होत नाही. त्यांना रोखणे, त्यांची अतिरिक्त वाढ न होऊ देणे, यासाठी असलेले साबण सगळे अल्कधर्मी (alkaline in nature) असतात. तीव्रतेमध्ये, तीक्ष्णतेमध्ये विविधता आढळते. त्यामुळे काही Mildly Alkaline असतात, तर काही Strongly Alkalineअसतात. सौम्य अल्कधर्मी क्लिन्झर्सचा त्वचेवर खूप अनिष्ट परिणाम होत नाही. त्वचा स्वच्छ करणे, त्यावरील साठलेला मळ काढणे, त्वचेतील रोमरंध्र स्वच्छ (Unblocked) ठेवणे व मृत त्वचेचा निचरा करणे हा साबणाचा, फेसवॉशचा, क्लिन्झर्सचा हेतू असतो. जेवढा घाम, त्वचेत उष्मा अधिक (ढोबळमानाने पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा असे म्हणता येईल.) तेवढे त्वचेतील ’PH’ अधिक अम्लीय होते आणि ते संतुलित करण्यासाठी अल्कधर्मी साबणाचा वापर करावा.

पण, ज्यांची त्वचा कोरडी, शुष्क, नाजूक असते, त्यांना खूप ‘strong’ (अति अल्कलीधर्मी) साबण चालत नाही, त्याचा वापर टाळावा. जर टाळला नाही, तर त्वचा खूप खेचल्यासारखी जाणवते. त्वचा कोरडी पडते, शुष्क होते. वारंवार किंवा अधिक वेळा अशा साबणाने जर चेहरा, शरीर धुतले, तर त्वचेवर कालांतराने बारीक पूरळ येते. त्वचा लालसर होते व काही वेळेस त्वचा निघू लागते. हे असे बरेच दिवस चालत राहिले, तर विविध चर्मरोग असे Dry Eczmua, psoriasisसारखे चिवट रोग होऊ शकतात. जेवढा अधिक अल्कलीधर्मी साबण, तेवढा तो त्वचेसाठी प्रशोभक (Irritant) चे काम करतो.

साबण कोणी व किती वापरावा? कोरड्या त्वचेवर साबण वापरणे टाळावे. सौम्य अल्कलीधर्मी किंवा उलटे लावावे. कोरडी त्वचा असल्यास गरम पाण्याने अंघोळ (विशेषतः अति थंडित) टाळावी. खूप घाम ज्यांना येतो. ज्यांची त्वचा तेलकट आहे. उन्ह्याळ्याचे दिवस आहे, त्वचा चिकट व अस्वच्छ असेल, तर साबणाचा वापर करावा, अन्यथा टाळावा. शरीराच्या त्वचेपेक्षा चेहर्‍याची त्वचा नाजूक असते. त्याला खूप तीव्र साबण strong/ क्लिनझर्सच्या संपर्कात (सवयी लावू नये) ठेवू नये. त्वचा खेचल्यासारखी होते. कोरडी भासते. म्हणून अनेकांनी अंघोळीनंतर मॉईश्च्युरायझिंग लोशन, क्रीम लावायची सवय असते. जर तीव्र (strong) साबणाचा वापर असेल, तर तो थांबवून सौम्य (Mild) साबणाचा वापर करायला सुरुवात करावी. त्वचेच्या विविध तक्रारी एवढ्याशा बदलानेच आटोक्यात येतात.

साबण, फेसवॉश, क्लिनझर्सचे काम त्वचा स्वच्छ करणे एवढेच आहे. गोरेपणा (उजळणे) anti-aging effect इ. ची अपेक्षा साबणाकडून करू नये. या क्लिनझर्समध्ये जो सुगंध व रंग घातला जातो, तो अनावश्यक रासायनिक घटक आहे. त्यामुळे खूप रंगीत, खूप सुवासिक असा साबण वापरणे टाळावा. तसेच नवनवीन प्रसाधने विशेषतः साबण वापरणे टाळावे. वर सांगितल्याप्रमाणे सौम्य ते तीव्र इतक्या विविधतेचे साबण असल्याने एका विशिष्ट ‘पीएच’ची गरज/सवय त्वचेला होते आणि सतत जर साबण बदलत गेलो, तर सगळेच त्वचेला सूट होतील असे नाही. तीव्र स्वरूपाचे (high in alkaline pH) साबण सगळ्यांनाच सूट होतात असे नाही. त्वचेबरोबर वारंवार प्रयोग करणे टाळावे. प्रत्येकाने लहानपणी अंगाला डाळीचे पीठ आणि दूध लावून अंघोळ केलेली असते. यामध्ये न कुठला रंग वा सुगंध घातला जातो. आहारीय द्रव्य असल्याने ते त्वचेला ही सात्म्य होते, सूट होते. ज्यांची नाजूक त्वचा असते, त्यांना क्वचित प्रसंगी डाळीचे पीठ सहन होत नाही. मग मसूरडाळीचे पीठ वापरून बघावे. त्यानेही उत्तम गुण येतो. मसूरडाळीचे लेप आयुर्वेदाच्या ग्रंथातून नमूद केला आहे.

दिवाळीपुरते अभ्यंग स्नान व उटणे सीमित ठेवू नये. या उटण्याने साबणाचे सगळे फायदे मिळतात व साबणाच्या तीव्र रसायनामुळे जो अपाय होतो, तो टाळता येतो. बाजारात विविध ‘स्क्रब’ उपलब्ध आहेत. उटण्याच्या धरतीवर हे ‘स्क्रब’ बनविले जातात. पण, आपल्या प्रकृतीचा, त्वचेच्या गुणवत्तेचा विचार करूनच हे ‘स्क्रब’ वापरावेत, अन्यथा तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच उटणे, स्क्रब वापरावे. उटण्यामध्ये त्रिफळा, कपूर काचरी, मंजिष्ठा इ. घटक सहसा असतात. त्वचेच्या पोतानुसार (texture) व घामाच्या प्रमाणावर उटण्याचे घटक ठरवून (customise) ते वापरावे. ते अधिक फायदेशीर व योग्य ठरेल. कोरड्या त्वचेसाठी उटणे दूधात कालवून लावावे. तेलकट त्वचा असल्यास पाण्यातून लेप करून अंगाला चोळावा व संतुलित त्वचा असेल, तर गुलाल पाण्यात उटणे भिजवून वापरावे.

उटणे कसे वापरावे? अंघोळीच्या वेळेस साबणाऐवजी भिजविलेले उटणे ओल्या शरीरावर सगळीकडे पसरावे व थोडे चोळून धुवून टाकावे. त्वचा ताजीतवानी व टवटवीत दिसते. (क्रमश:)


वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
9820286429
vaidyakirti.deo@gmail.com
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121