नवी दिल्ली : लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला करणाऱ्या अवतारसिंग खांडा या खलिस्तान्याचा ब्रिटनमध्ये मृत्यू झाला आहे. त्याच्या शरीरात विषाचे अंश सापडल्याची चर्चा आहे, मात्र त्याला रक्ताचा कर्करोग असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरनी सांगितले आहे.
अवतार सिंग खांडा हा लंडनमधील भारतीय दूतावासावरील हल्ल्याचा मुख्य आरोपी होता. यानंतर एनआयए त्याला भारतात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. खांडाचा एनआयएच्या वाँटेड यादीत समावेश होता. अमृतपालच्या आधी 'वारीस पंजाब दे' संस्था चालवणार्या दीप सिद्धूशी खांडा याचे संबंध होते.
खांडा याने अमृतपालच्या अटकेनंतर लंडनमध्ये निदर्शने केली आणि त्याचे नेतृत्व केले होते. अवतार सिंग याचे संपूर्ण कुटुंब खलिस्तान चळवळीशी संबंधित आहे. अमृतपालला पंजाबमध्ये पाठवून तेथे मोहीम चालवण्यामागे या व्यक्तीचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार खांडा यास बॉम्ब बनवण्यात निपुणता होती.