देहदान चळवळीत सक्रियपणे सहभागी असणार्या आणि सामाजिक भान जपत विद्यार्थी घडवणार्या मधुमती कुलकर्णी यांचा जीवनप्रवास उलगडणारा हा लेख...
मधुमती कुलकर्णी यांचा जन्म पालघर जिल्ह्यातील चिंचणीचा. मधुमती यांचे वडील भारतीय नौदलात नोकरीवर रुजू झाले खरे. मात्र, कौटुंबिक अडचणींमुळे त्यांना ती नोकरी सोडावी लागली. त्यानंतर मधुमती यांच्या वडिलांनी अनेक भाषांवर प्रभुत्व असल्याने इंग्रजीची खासगी शिकवणी घ्यायला सुरूवात केली. म्हणूनच मधुमती यांना लहानपणापासून इंग्रजी या विषयात गोडी निर्माण झाली. त्यामुळेच मागील ३१ वर्षांपासून इंग्रजी विषयाच्या अभ्यासू शिक्षिका म्हणून राजगुरू हरेश्वर महादेव पंडित विद्यालयात त्या कार्यरत आहेत.
मधुमती यांचे प्राथमिक ते कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण के.डी.हायस्कूल येथे झाले. त्यानंतर मधुमती यांनी सोनोपंत दांडेकर महाविद्यालय कला शाखेतून पदवी प्राप्त केली. तसेच त्यांनी इंग्रजी आणि इतिहास या विषयात ‘बी.एड’ आणि अर्थशास्त्र-इतिहास तसेच इंग्रजी या विषयातून ‘एम.ए’ पूर्ण केले आहे. मुळात चिंचणीसारख्या खेड्यात उच्च शिक्षणाची फारशी सुविधा नसतानाही उच्च शिक्षण घेण्याची जिद्द मधुमती यांनी कधीच सोडली. त्यामुळेच खेड्यात राहून उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्या अनेकांसाठी मधुमती यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे.
मधुमती यांना अभिनय आणि नृत्याची विशेष आवड. त्याचबरोबर महाविद्यालयीन जीवनात मधुमती यांना अवांतर वाचनाची गोडी लागल्याने वैचारिक खाद्यही त्यांना आपसुकचं मिळत गेले. त्यामुळेच आज कथाकथन, अभिवाचन, अभिनय मार्गदर्शन, सूत्रसंचालनाचे अनेक कार्यक्रम त्या करतात. त्यांची ’लॉकडाऊन’मधील शालेय विद्यार्थ्यांच्या भावविश्वावर भाष्य करणारी ’ऑनलाईन शाळा’ ही कविता महाराष्ट्रभर व्हायरल झाली. मधुमती या ‘कथाकथन कसे करावे?’, ‘व्यक्तिमत्त्व विकास आणि कथा- एक साहित्यप्रकार’ या विषयांवर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करतात. त्यांनी आतापर्यंत जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. तसेच, जहांगीर आर्ट गॅलरी, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, रवींद्र नाट्य मंदिर, वरळी आर्ट गॅलरी तसेच अनेक महाविद्यालयांत कवितांच्या अभिवाचनाचे कार्यक्रमही प्रसिद्ध चित्रकार आशुतोष आपटे यांच्या सहकार्याने त्यांनी केले आहेत. त्याचबरोबर पाककला स्पर्धेसह अनेक स्पर्धांच्या परीक्षिका म्हणूनही मधुमती कुलकर्णी या काम करत असतात.
दरम्यान, मधुमती या फक्त कलाक्षेत्रातच सक्रिय नसून, सामाजिक बांधिलकी ही जपतात. महाविद्यालयीन जीवनात त्या राष्ट्रीय सेवा योजनेत सक्रिय होत्या. तसेच त्यांनी वसईचे पुरुषोत्तम पवार यांच्या प्रेरणेतून देहदान, अवयवदानाविषयी जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. प्रसिद्ध चित्रकार आशुतोष आपटे यांच्यासह २०२०मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील चित्रकारांचा आर्ट कॅम्प सफाळ्यात भरवून देहदान, अवयवदानाविषयी जनजागृती केली. तसेच, शालेय स्तरावर देहदान, अवयवदानाविषयी विद्यार्थ्यांच्या चित्रकला आणि निबंध स्पर्धाही त्यांनी स्वखर्चाने आयोजित केल्या होत्या. त्यामुळे या उपक्रमाला पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्याचबरोबर नाशिक येथे संपन्न झालेले राज्यस्तरीय ’देहदान- अवयवदान’ महाअभियानात सक्रिय सहभाग घेत निवेदनही मधुमती यांनी केले होते. “त्यामुळे दहा हजारांमध्ये एका माणसाने जरी देहदान आणि अवयवदानाचा संकल्प केला, तरी ते माझ्यासाठी या मोहिमेचे यश असेल,” असे मधुमती सांगतात. तसेच, मधुमती यांचे पती आणि दोन्ही मुलांनीदेखील देहदान, अवयवदानाचा संकल्प केला आहे. त्यामुळे ’बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ ही म्हण मधुमती यांच्याबाबतीत पूर्णपणे योग्य ठरते.
दरम्यान, मधुमती या एक संवेदनशील शिक्षिका म्हणून शाळेतील विद्यार्थी तसेच आजूबाजूच्या परिसरातील गरजूंना आणि रुग्णांना स्वखर्चाने मदत करतात. एकदा त्यांच्या शाळेतील एका मुलाला कर्करोग झाला होता. मात्र, खेडेगावात राहणार्या या मुलाच्या कुटुंबाला कर्करोग या रोगाच्या उपचाराची काही एक कल्पना नव्हती. त्यावेळी आपल्या काही सहकार्यांच्या मदतीने मधुमती यांनी त्या मुलाच्या उपचाराची जबाबदारी स्वीकारली आणि त्या मुलाच्या कुटुंबाला योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे त्या मुलांचे प्राण वाचले. म्हणूनच सामाजिक जबाबदारीचे भान असणारी विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून मधुमती यांचे नाव आदराने घेतले जाते.
त्यामुळेच ’लायन्स क्लब ऑफ सफाळे’ तर्फे ’गुणवंत शिक्षिका’ या पुरस्काराने मधुमती यांना सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, एकपात्री अभिनय स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा , स्वलिखित काव्यवाचन स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी भरघोस पारितोषिके मिळवली आहेत. त्यामुळे अनेक साहित्य मंडळांमध्ये मधुमती यांचा सक्रिय सहभाग असतो. त्याचबरोबर विद्यार्थी आणि तरुण पिढीशी संबंधित अनेक विषयांवर लिखाण त्या समाजमाध्यमांवर आणि स्वतःच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करत असतात. भविष्यात देहदान चळवळीतून जास्तीत जास्त लोकांना जीवदान मिळवण्याचा मधुमती कुलकर्णी यांचा मानस आहे. तरी त्यांच्या पुढील वाटचालीस दै. ’मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!