ठाणे : ऑनलाईन मोबाईल गेमच्या माध्यमातून अल्पवयीन हिंदू मुलांचे धर्मांतर करून "मोबाईल जिहाद' पुकारणारा मुख्य आरोपी शाहनवाज मकसूद खान हा मुंब्य्रातील असुनही मुंब्य्राची नाहक बदनामी होत असल्याचे सांगुन राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड येनकेन प्रकारे त्याची पाठराखण करीत आहेत.तर, गेल्या काही दिवसात वारंवार पत्रकार परिषदा तसेच ट्वीटर व सोशल मिडीयात ४०० जणांच्या धर्मांतरण मुद्यावरून आकांडतांडव करून एकप्रकारे आव्हाडच मुंब्य्राची बदनामी करीत असल्याची चर्चा रंगली आहे.
ऑनलाईन मोबाईल गेम खेळण्याच्या बहाण्याने ४०० मुलांचे धर्मांतर करण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी २३ वर्षीय शाहनवाज खान उर्फ बद्दो हा मुंब्य्रातील असल्याचे समोर आले असतानाही आ. आव्हाडांनी मुंब्य्राची बदनामी होत असल्याच्या उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली आहे. मोबाईल जिहाद प्रकरणातील मुंब्रा कनेक्शन सर्वप्रथम गाझियाबाद पोलिसांनी उघड केले. दरम्यान गाझियाबाद पोलीस दलातील कुणा अधिकाऱ्याने ४०० मुलांचे धर्मांतर झाल्याचे सांगितल्याने प्रसारमाध्यमांनी या गंभीर बाबीकडे लक्ष वेधले. तेव्हापासुन आव्हाड यांनी मुंब्य्राला बदनाम केले जात असल्याचा दिंडोरा पिटण्यास सुरुवात केली. वास्तविक या प्रकरणाचा तपास गाझियाबाद पोलीस करीत आहेत. तरीही ठाणे पोलिसांनी सध्यातरी मुंब्य्रामध्ये धर्मातर झाल्याची तक्रार नसल्याचे सांगताच आव्हाडांनी गाझियाबाद पोलिसांच्या तपासकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तसेच वारंवार प्रसारमाध्यमांसमोर येत एकप्रकारे तपासालाच आव्हान देऊन मुंब्य्राची बदनामी स्वतःच सुरु केल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, आपल्या नाद बंगल्यावर पत्रकार परिषद घेऊन हा एका समाजाला बदनाम करण्याचा मोठा कट असल्याचा आरोप आ. जितेंद्र आव्हाड यांनी केला. या धर्मातर प्रकरणावरून आपल्याला देश विदेशातुन फोन आल्याचे सांगितले.तेव्हा, राज्य सरकारने गंभीरपणे यावर विचार करून ठाणे पोलीसांनी नाराजीचे पत्र पाठवले पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त करून आव्हाड यांनी नाहक मुंब्य्राला बदनाम केले जात असल्याची बोंब उठवली. तसेच या संदर्भात गाझियाबाद पोलिसांनी माफी मागण्याची मागणी केल्याने स्वतःच मुंब्य्राची बदनामी सुरु केल्याचे बोलले जात आहे.
खाई त्याला खवखवे - नरेश म्हस्के
मुंब्य्रात अशी काही परिस्थिती आहे का, जितेंद्र आव्हाड ? असा सवाल करून शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आव्हाडांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. धर्मांतर आव्हाड करतायत, आव्हाड धर्मातर करायला मदत करतायत, असे विधान कुणी केलेय का ? कुणाचेही असे स्टेटमेट आलेले नाही, ना कुठल्याही वर्तमानपत्रात असे आलेय.मग ते असे का वागत आहेत, त्याच्या मनात ही शंका का आहे ? त्यांना हे प्रकरण एवढे लागायचे काय कारण ? मराठीत एक म्हण आहे, "खाई त्याला खवखवे..अशी काही परिस्थिती आहे का ? आव्हाडांना एवढी भीती का वाटत आहे ? असे स्पष्ट करून आव्हाडांची बोलती बंद केली.