डोंबिवली : दहावीच्या परिक्षेत 100 टक्के गुण मिळविलेल्या वैदेही शेटय़े हिचा ज्येष्ठ नागरिक साईबाबा कट्टा, चामुंडा गार्डन सोसायटी ए टु एच तर्फे सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे वैदेहीने स्व अध्ययानावर भर देत कोणतीही शिकवणी न लावता हे यश मिळविल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चामुंडा सोसायटीतर्फे शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या सोसायटीतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. पण वैदेहीने पैकीच्या पैकी गुण मिळविल्याने तिचे कौतुक करण्यासाठी नुकताच एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर तिरूपती बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दिलीप चौधरी, ज्येष्ठ नागरिक कट्टयाचे सभासद विजय पात्र, सोसायटीचे अध्यक्ष दिनेश चोडणेकर, समाजसेवक संतोष पवार, शुभदा शेटय़े उपस्थित होते.
वैदेही सिस्टर निवेदिता स्कूल मध्ये शिक्षण घेत होती. तिने अभ्यासात सुरूवातीपासून सातत्य ठेवले. दिवसातून कमीत कमी पाच तास अभ्यास केला. दिवसभरात तो अभ्यास पूर्ण केला की नाही यांची खात्री करून घेत असे. अभ्यास करताना इंटरनेटवरून अधिक माहिती मिळविण्याचा देखील प्रयत्न केला. स्व अध्ययनावर भर दयायाचा असल्याने शिकवणी लावली नव्हती. अभ्यासात काही समस्या असल्यास त्या सोडविण्याचे काम शिक्षकांनी केले आहे. वैदेहीचे वडील सुजित हे खाजगी कंपनीत नोकरी करीत आहे. आई शुभदा या गृहिणी आहेत. वैदेही आपल्या यशाचे श्रेय आईवडील आणि शिक्षकांना देते. वैदेहीला नृत्याची आवड असल्याने त्या गुणांचा दहावीच्या परिक्षेत फायदा झाला. त्यामुळे पैकीच्या पैकी गुण मिळविणे सोपे गेल्याचे वैदेही सांगते. वैदेहीला विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण करून इंजिनियरींगकडे जाण्याचा मानस आहे.
वैदेहीच्या या यशाचा चामुंडा गार्डन सोसायटीला ही अभिमान असल्याने त्यांनी तिचा विशेष सत्कार केला. तसेच वैदेहीच्या ज्ञानाचा, तिने कश्याप्रकारे अभ्यास केला यांच्या काही टिप्स इतर मुलांना मिळाल्या तर ते विद्यार्थी ही असेच यश मिळवितील असा विश्वास दिलीप चौधरी यांनी व्यक्त केला.
--------------------------------------------------------------