रविवारी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. परंतु, प्रस्थान सोहळ्याला गालबोट लावण्याचा अयशस्वी प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. यावर आता पोलिसांनी लाठीमार केल्याचे व्हिडिओ सगळीकडे पसरवले जात आहेत. परंतु, खरोखर लाठीमार झाला का की, वारीच्या माध्यमातून काही करामती लोकांनी आपली राजकारणाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला, हे जाणून घेणे आवश्यक आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या प्रतिक्रियेत लाठीमार झालाच नसल्याचे सांगत केवळ बाचाबाची झाल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी प्रस्थान सोहळ्यात मानाच्या ५६ दिंड्यांना प्रवेश देण्यात आला होता. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला वारकरीसुद्धा जखमी झाल्या होत्या. ती परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून यंदा बैठका घेऊन नियोजन करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक मानाच्या दिंडीतील प्रत्येकी ७५ जणांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. जो मानाच्या दिंडीप्रमुखांनीसुद्धा मान्य केला. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आले. मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंड्या प्रत्येकी ७५ जणांनाच पाठवत होत्या. मात्र, रविवारी अचानक काही युवा वारकर्यांनी हा नियम मान्य नसल्याचे सांगत बॅरिकेड तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तर काही वारकर्यांनी पोलिसांना पायाखाली तुडवल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ही सगळी बाचाबाची झाली. एकंदरीत सर्व प्रकार पाहता, आत प्रवेश करण्यासाठी पोलिसांना रेटणारे बहुतांश तरुण वारकरी आहेत. जर सर्व नियम आणि नियोजन ठरलेले असतानाही त्यांना आत का जायचे होते, हाही प्रश्नच आहे. प्रस्थान सोहळ्याच्या तीन दिवसांपूर्वी अर्थात गुरुवारी आळंदीतील एका कीर्तन सोहळ्यात सहभागी झालेल्या सुप्रिया सुळे यांनीही या प्रकाराचा निषेध केला. इकडे जेव्हा दुसरा व्हिडिओ समोर आला, ज्यात पोलिसालाच तुडवले जात आहे, तेव्हा या प्रकाराची दुसरी बाजू समोर आली. पण, तरीही राजकीय करामतकारांनी या प्रकाराला नको ते वळण देऊन आपली राजकीय पोळी भाजण्याचाच उद्योग केलेला दिसतो.
राजकीय पोळ्या कोणं लाटतंय?
काही विघ्नसंतोषी व्यक्तींकडून वारीला राजकीय हत्यार म्हणून वापरले जाण्याचे षड्यंत्र जेव्हा जेव्हा रचले गेले, तेव्हा तेव्हा ते देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी हाणून पाडले. आताही पोलिसांनी वारकर्यांवर लाठीमार केल्याच्या आवया उठवल्या गेल्या. परंतु, दुसरा व्हिडिओ पुढे आल्यानंतर जर पोलिसांनी सतर्कता दाखवली नसती, तर मोठा अनर्थ घडला असता. दरम्यान, फडणवीस यांना कोंडीत पकडण्याचा हा प्रयत्न होता की नाही, ते नंतर स्पष्ट होईलच. परंतु, याआधीही फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना पंढरपूरमध्ये आल्यास वारीमध्ये साप सोडण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. शासकीय महापूजा करण्यापासून त्यांना रोखण्याचा प्रयत्न काही संघटनांकडून करण्यात आला. परंतु, तेव्हा फडणवीसांनी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी व घातपात होऊ नये, यासाठी शासकीय महापूजेला जाण्याचे टाळले होते. देवेंद्र फडणवीस यांनी वारकर्यांच्या सोयीसाठी पंढरपुरात अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त असे भव्य भक्त निवास बांधले. वारकर्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी एका कंपनीच्या माध्यमातून तब्बल पाच लाख रेनकोट वाटप करण्यात आले. यंदा संत निवृत्तीनाथांच्या पालखीसोबत मोबाईल टॉयलेटसह अन्य सुविधाही देण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने विशेष पालखी मार्गाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. परंतु, २०१४च्या आधी वारीची काय परिस्थिती होती? वारीला किती सुविधा मिळत होत्या? हा संशोधनाचा विषय आहे. धक्कादायक बाब म्हणजे, वारी हा समतेचा आणि बंधुभावाचा संदेश तर आधीपासूनच देत आहे. मग वारीत ‘समतेची दिंडी’ काढण्याचे प्रकार सुरू करण्यामागे काही संघटनांचे काय प्रयोजन? समतेचा मार्ग दाखवणार्या वारीला अशा समतेच्या दिंडीची मुळी गरजच नाही. परंतु, तरीही असले प्रकार सुरू असून यात डझनभर संघटना सहभागी होत आहे. वारी ‘ग्लोबल’ झाली आणि घराघरापर्यंत जाऊन पोहोचली. परंतु, त्यांना भडकावणार्यांना आता वारकर्यांनीच उत्तर द्यायला हवे. वारीत मोठी ताकद आहे. जी सांगावी लागत नाही. आता हेच बघा एकवेळ वारकरी संप्रदायावर आरोपांच्या फैरी झाडणार्या आणि ‘आई बसली’ म्हणून देवी-देवतांची खिल्ली उडवणार्या ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी वारीत चक्क पोळ्या लाटल्या!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.