चिन्मय विश्वविद्यापीठात दि. १९ फेब्रुवारी, २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जयंतजींचे सुरेख अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. ‘आजादी का अमृत महोत्सव’ या घोषणेला अनुसरत जयंतजींनी विषय निवडला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्य’ संकल्पनेचा अनेकांगी उहापोह केला.
चिन्मय विश्वविद्यापीठात शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय मी २०२० मध्येच घेतला होता. पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांनी छत्रपतींच्या जीवनावर आधारित दृक्श्राव्य माध्यमातील एक लघुपट तयार केला, कवी भूषणच्या काव्यावर ‘इंद्र जिमि जंभपर’ नृत्य केले. २०२१ साली रविराज पराडकर यांचे रसाळ व्याख्यान ठेवले होते. २०२२ साली कुणाला बोलवावे अशी चर्चा सुरू होती. वैयक्तिक कारणांमुळे मी केरळऐवजी मुंबईला होते, म्हणून मी आसावरी बापट (पद्मा केळकर) ला विचारले. परंतु, ती तेव्हा म्यानमारला होती आणि कार्यव्यग्र होती. तिने जयंत सहस्रबुद्धे यांचे नाव सूचविले.
माझा त्यांच्याशी परिचय नव्हता, कधी भेटही झाली नव्हती. शिवाय आंतरजालावर त्यांची माहिती वाचून मला थोडे दडपणही आले होते. तरीही मी त्यांना दूरध्वनी केला आणि विद्यापीठाच्या कार्यक्रमात व्याख्यान देण्याची विनंतीही केली. त्यांनी खूप आस्थेने विद्यापीठाविषयी माहिती विचारली. केरळ राज्यात असा उपक्रम सुरू केला, यासाठी अभिनंदन केले आणि काहीही आढेवेढे न घेता विनंती मान्य केली. मला आकाश ठेंगणं झालं.
आपल्या शिक्षणाचा, पदव्यांचा अवास्तव अभिमान न बाळगता, कार्यबाहुल्याचे अवडंबर न माजवता, ओळख नसतानाही, ज्या ऋजुतेने आणि आत्मियतेने जयंतजी बोलले, वागले, ते सर्वच अनुकरणीय आहे, नाहीतर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे महाभाग आपण अवतीभोवती पाहत असतोच! ‘वदनं प्रसादसदनं सदयं हृदयं सुधामुचो वचः। करणं परोपकरणं येषां केषां न ते वन्द्याः।’ हे सुभाषित ज्यांना चपखल बसतं, अशा खूप कमी व्यक्तिमत्त्वांपैकी होते जयंतजी! कर्तृत्वशाली नेतृत्व अंगी असूनही सामान्य कार्यकर्त्याच्या निष्ठेने आणि महारांवरील डोळस भक्तीने चिन्मय विश्वविद्यापीठाच्या कार्यक्रमात ते दाखल झाले. हा आदरभाव प्रत्यक्षभेटीतून वृद्धिंगत व्हावा, हे काही नियतीला मान्य नव्हते, असे खेदाने म्हणावे लागते आहे.
चिन्मय विश्वविद्यापीठात दि. १९ फेब्रुवारी, २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जयंतजींचे सुरेख अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. ‘आजादी का अमृत महोत्सव’ या घोषणेला अनुसरत जयंतजींनी विषय निवडला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्य’ संकल्पनेचा अनेकांगी उहापोह केला. सततच्या परकीय आक्रमणांमुळे भारतीयांच्या अस्मितेला मुळापासून धक्का बसला, पूर्वसूरींनी वारसा म्हणून दिलेले ज्ञान धोक्यात आले, आक्रमकांच्या धोरणामुळे न्यूनगंड निर्माण झाला, इंग्रजांच्या अतिरेकामुळे आपल्याला आपल्या धर्माची लाज वाटू लागली, आपली ओळख मिटू लागली, त्यावेळी शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प बालवयातील धाडसच वाटले होते.
आपली विस्मृत ओळख आणि गतवैभव मिळवून देणे हा उद्देश असलेले स्वातंत्र्य म्हणजे, स्वत्वाची ओळख, प्रखर राष्ट्रनिष्ठाच! केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर अखंड भारतासाठी स्वत्वाची ओळख करून देणारा राजा एकच! आसाममधील लचित बडफुकन, दक्षिणेत सुब्रह्मण्य भारती, बंगालमध्ये रविंद्रनाथ टागोर, पंजाबात लाला लजपतराय अशा अनेकांना प्रेरणा देणारा श्रीमंत योगी म्हणजे महाराज! औरंगजेबाला अखेरपर्यंत आसाम पादाक्रांत करता आला नाही. याव्यतिरिक्तही अनेक स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा देणारे महाराज! केवळ शूरयोद्धाच नव्हे, तर स्वत्वाची ओळख करून देणारा प्रजापालनतत्पर ‘छत्रपती‘ या शब्दांत काशी वीथिकेचे उद्घाटन करतेवेळी पंतप्रधानांनी महाराजांचे पुण्यस्मरण केले.
अनेकविध सामरिक प्रसंग, समाजातील भेद, धार्मिक तेढ, संघर्ष आपल्या सीमांची यथार्थ जाणीव तरीही महाराजांनी सागरी किनारे संरक्षित ठेवून आरमार बांधले. आज तर त्या ध्वजाचाही मान आपल्या नौदलाने राखला आहे. महाराजांचे द्रष्टेपण वाखाणण्याजोगे! आक्रमणांमुळे आपले स्वशासन मोडकळीला आले आणि परकीयांचे आक्रमकांचे धोरण लादले गेले. आक्रमकांची भाषा, त्यांचे शासन, या स्थितीत महाराजांनी संस्कृत भाषेत राज्यव्यवहारकोश तयार करवून घेतला आणि भारतीयत्वाची जपणूक आजही स्वतंत्रता अनेकविध क्षेत्रात आवश्यक आहे.
या मातीची बांधिलकी, भारतीयत्वाचा सार्थ अभिमान, हिंदवी स्वराज्याविषयी आस्था आणि या सगळ्यांसाठी छत्रपतींच्या आयुष्याचा आदर्श ठेवायला हवा. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, सर्वार्थाने! वसाहतीकरणातून बाहेर पडायला हवे, मानसिक गुलामगिरीतून बाहेर यायला हवे, स्वत्वाचे खच्चीकरण ही आक्रमकांची वृत्ती, ती दूर सारून युगपुरुषाकडून प्रेरणा घ्यायला हवी. मार्गक्रमण खडतर खरेच, तरीही त्यांच्या जीवनाचा सूक्ष्म अभ्यास करून हे साधायला हवे.
थोड्यावेळात सर्व पैलूंवर विवेचन करणे अशक्य असतानाही, सोप्या पण ठाशीव भाषेत जयंतजींनी स्वातंत्र्य आणि स्वाधीनता यावर मार्मिक भाष्य केले आणि युवापिढीने महाराजांचा आदर्श ठेवायला हवा, असे आवाहन केले. व्याख्यान मुद्देसूद, तर्कसंगत आणि धाराप्रवाहवत् झाले. भारतीयांना भारतीयत्वाची, स्वत्वाची ओळख करून देणे, स्वाभिमान जागृत करणे आणि राष्ट्रनिष्ठा प्रखर करणे, या गोष्टी जयंतजींच्या व्याख्यानाने साध्य झाल्या. त्यांच्या स्मृतीस सविनय अभिवादन!
गौरी माहुलीकर