स्वयंसेवकांचे प्रेरणास्थान, मृदू स्वभाव, कुशल संघटक, विचारक, कोकण प्रांत प्रचारक असताना अथक प्रवास करणारे जयंतराव सहस्रबुद्धे. दि. २ जून रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी विज्ञान क्षेत्रात उभे केलेले कार्य सर्वस्वी अद्भुतच. वैज्ञानिकांच्या सहज संवादातून हृदयस्थ संबंधांचे रुपांतर त्यांनी ‘विज्ञान भारती’शी जोडण्यात केले. जयंतरावांचा स्वभाव धीरगंभीर. मोजकेच पण परिणामकारक बोलणारे. असा हा भारतमातेचा नररत्न गमावल्याची खंत आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात असेल.
जयंतरावांचा जन्म गिरगावचा. आर्यन शाळा, गोरेगावकर लेन, गिरगाव येथे वास्तव्य. आर्यन शाळा (महादेव गोविंद रानडे स्थापित) येथेच त्यांचे शिक्षण झाले. गिरगाव ही अनेक नामांकित राजकारणी, समाजकारणी, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज तसेच गायक, वादक, इतिहासकरांची कर्मभूमी. राष्ट्रउभारणीच्या कामात अग्रेसर असलेले, रा. स्व. संघाचे प्रचारक जयंत सहस्रबुद्धे याच गिरगावातले; म्हणून आम्हा गिरगावकरांना त्यांचा सार्थ अभिमान वाटतो.
त्यांची आई राष्ट्र सेविका समितीची सक्रिय कार्यकर्ती. गिरगावात तरुण मुलींना लिलया त्या समितीमध्ये आणत असत. जयंतरावांसारखे मध्यमवर्गातील तरुण युवक प्रचारक मागे वळून न पाहता, राष्ट्रउभारणीच्या कामात स्वतःला झोकून देतात. म्हणूनच त्यांच्यासारख्या प्रचारकांमुळेच हा देश टिकून आहे. असा हा जयंतरावांसरखा समर्पित भावनेने काम करणारा स्वयंसेवक, प्रचारक अपघातात जखमी होतो आणि अथक प्रयत्नांनंतर त्यांच्यावरील उपचारांना यश येत नाही, ही समस्त हिंदू समाजाची हानीच म्हणावी लागेल.
यशवंत भवनमध्ये जमलेले स्वयंसेवक, इतर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, प्रत्येकाच्या चेहर्यावरही पोकळी नव्हे, तर अशा तोलामोलाचा स्वयंसेवक आपल्यातून जात आहे, असा जयंत सहस्रबुद्धे पुन्हा होणे नाही, अशाच प्रकारचा भाव नव्हे, वातावरण दिसत होते. यावेळी मनात विचार आले, एखादा सैनिक राष्ट्रासाठी सेवा बजावताना जसा हुतात्मा होतो, त्याला तोफांची सलामी देऊन निरोप करतात. तसेच संघ शाखेपासून ‘विज्ञान भारती’च्या राष्ट्रीय सचिव पदापर्यंत पोहोचलेल्या जयंतरावांसारख्या स्वयंसेवकाला शेकडो स्वयंसेवकांनी साश्रू नयनांनी यशवंत भवन येथे कार्याची पूंजी ठेवून आणि साक्षी भावनेने सर्व समुदायाने मनोमन रचले असेल की, तुझ्यासारख्या ‘विज्ञान भारती’चे काम पुढे नेणारा यातूनच एक स्वयंसेवक पुढे निश्चित रुपाने आणण्याचा प्रयत्न करू.
काका सहस्रबुद्धे (वडील)आज त्यांनी वयाची 90 वर्षे पार केलीही असतील. पण, प्रमुख स्वयंसेवकांशी ते आवर्जून बोलत होते. विचारपूस करत होते. नावानिशी बोलत होते. यावेळी त्यांच्या दांडग्या स्मरणशक्तीचा परिचय आला. गिरगावातून असेच प्रचारक विधायक कामासाठी निर्माण होऊ देत, हीच परमेश्वराकडे प्रार्थना. जयंतरावांच्या स्वर्गलोकीचा प्रवास चिरशांतीचा होवो, अशी प्रार्थना.
शैला सामंत
(लेखिका कार्यसमिती सदस्य आहेत.)