आपल्या मधुर वाणीने, नम्र व प्रेमळ स्वभावाने, व्यवहाराने व त्या-त्या क्षेत्रातील अध्ययनाने जयंतराव सहस्रबुद्धे यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविला. श्रेष्ठ गुणवत्ता, सात्त्विकता व समर्पण ही त्यांच्या जीवनाची त्रिसूत्री होती.
जयंतराव सहस्रबुद्धे यांचा तसा परिचय ते प्रचारक म्हणून निघाल्यापासून - १९८९ पासून. १९९१ मध्ये माझ्याकडे प्रांताची जबाबदारी आली. त्यामुळे महाराष्ट्रात प्रवास सुरू झाला. त्यावेळी जयंतराव मुंबई महानगरात शांतीनगर भाग (सांताक्रुझ पूर्व व पश्चिम आणि वांद्रे पूर्व आणि पश्चिम) प्रचारक होते. त्यामुळे मी जेव्हा या भागात प्रवासासाठी गेलो, तेव्हा माझ्याबरोबर ते असायचे. सर्व विषय समजून घेऊन, कामातील अपेक्षा समजून घेऊन, त्या भागातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व सहकार्य करत. त्या विषयाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी ते प्रयत्न करत असत.
ते वृत्तीने अतिशय शांत व सात्त्विक होते. चेहरा नेहमी प्रसन्न व हसरा असायचा. मी त्यांना कधीही निराश झालेले, उत्तेजित झालेले व रागावलेले पाहिले नाही. त्यामुळे त्यांच्या सहवासात येणारा कार्यकर्ताही मनाने प्रसन्न होत असे. ते जेव्हा गोमंतक विभाग प्रचारक होते, त्यावेळी मी सह प्रांत प्रचारक होतो. सर्व स्तरांवरील कार्यकर्त्यांचे आपापल्या कार्यक्षेत्रात प्रवास चालू असतात. संघात अनेक कार्य विभाग आहेत.
अशा प्रांत स्तराच्या कार्यकर्त्यांचे प्रवास चालू असतात. त्यातही जे प्रचारक असतात, ते अधिक प्रवास करतात. गोव्याच्या बाबतीत असे व्हायचे की, एकाच महिन्यात चार-पाच जणांची गोव्यात प्रवास करावयाची इच्छा होत असे. त्या सर्वांना/परस्परांना ते माहीत नसायचे. प्रत्येक जण जयंतरावांशी स्वतंत्र बोलायचा. पण, आश्चर्य म्हणजे जयंतराव सर्वांना ‘या‘ म्हणायचे. एकाच वेळी चार जण येणार आहेत म्हणून ‘तुम्ही नंतर कधीतरी या‘ असे त्यांनी कधीच म्हटले नाही.
सर्वांचे प्रवास निश्चित झाल्यानंतर जयंतराव त्या त्या विषयाच्या जिल्हास्तराच्या प्रमुखांची भेट घेत असत. प्रत्येकाशी त्या प्रांत कार्यकर्त्याच्या अपेक्षांविषयी बोलायचे, योजना कशी करणार, अशी चर्चा करायचे आणि प्रत्येक प्रांत कार्यकर्त्याच्या प्रवासात एका ठिकाणी उपस्थित राहत, त्यांच्या बैठकीत बसत असत, विषय समजून घेत असत व नंतर त्याची अंमलबजावणी व्हावी, यादृष्टीने जिल्हा कार्यकर्त्यांशी संवाद करत असत. आजही ते आठवून मला त्यांच्या क्षमतेचे, नियोजन कौशल्याचे आश्चर्य वाटते. त्यावेळी तरी ते एकमेव असे विभाग प्रचारक होते.
जयंतराव काही वर्षे तत्कालीन सरकार्यवाह शेषाद्रीजी यांचे स्वीय साहाय्यक होते. कोणतेही काम अतिशय विचारपूर्वक करणे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांची नम्र सेवाभावी वृत्ती, उत्तम आकलनशक्ती, विषय समजून घेण्याची उत्तम क्षमता इत्यादी गुणांमुळे शेषाद्रीजी त्यांच्यावर प्रसन्न असत. त्यांच्या प्रवासात विविध बैठकीत गेल्यानंतर ते जयंतरावांचा कार्यकर्त्यांना परिचय करून देताना जयंतरावांच्या वडिलांचे जयंतरावांबद्दलचे एक मत सांगत, ते म्हणजे ‘आमचा जयंत आदर्श विद्यार्थी, आदर्श स्वयंसेवक व आदर्श प्रचारक आहे.’
बहुधा ते तीन-चार वर्षे शेषाद्रीजींसमवेत होते. त्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर शेषाद्रीजींनी बंगळुरु येथील कार्यालयात तेथील सर्व प्रचारक व कार्यकर्ते यांच्यासह मिष्टान्न (पुरणपोळी) खाऊ घालून जयंतरावांना सन्मानपूर्वक निरोप दिला व शुभाशीर्वाद दिले. त्यानंतर शेषाद्रीजी जीवंत असेपर्यंत त्यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणेच राहिले.
त्यानंतर जयंतराव नाशिक विभागाचे (नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव) विभाग प्रचारक होते. त्यानंतर गोमंतक विभाग (गोवा राज्य) प्रचार होते. त्यांचे कार्यकर्त्यांशी व त्यांच्या कुटुंबीयांशी अत्यंत प्रेमाचे व आपुलकीचे संबंध होते. गोव्यातील अनेक कुटुंबांत तर तीन पिढ्यांशी त्यांचे संबंध होते. अर्थात, ते त्यापूर्वीदेखील ज्या ज्या क्षेत्रात ते प्रचारक होते, तेथील अनेक कुटुंबांशी त्यांचे असेच संबंध होते. आज त्या सर्व कुटुंबांत आपल्या कुटुंबातील एक जीवश्चकंठश्च सदस्य गेल्याचे दु:ख होत असेल.
प्रेमाने बोलणे, तसा व्यवहार करणे व मोकळेपणे संवाद करणे ही त्यांची शैली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनातील अनेक दु:ख, अडचणी, एखाद्या विषयीची कटुता इत्यादी सर्व संपत असत. कधीकधी परस्परात निर्माण होणारे मतभेददेखील त्यांच्या शैलीमुळे समाप्त होत असत. त्यानंतर तत्कालीन महाराष्ट्र प्रांताचे तीन प्रांत झाले. जयंतराव कोकण प्रांत प्रचारक झाले. मी पश्चिम महाराष्ट्राचा झालो. त्यामुळे फक्त अखिल भारतीय बैठकीत आमची भेट होत असे.
त्यानंतर त्यांच्याकडे ‘विज्ञान भारती‘ची अखिल भारतीय संघटन मंत्री अशी जबाबदारी आली आणि त्यांचा झंझावाती प्रवास सुरू झाला. ते नेमके काय काम करतात, हे मला फार समजत नव्हते. संघाच्या अखिल भारतीय बैठकीत ते जे निवेदन करत असत, ते ऐकून देशातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या दिग्गज शास्त्रज्ञांना आपल्या कार्याला जोडण्याचे अद्भुत व आश्चर्यकारक काम त्यांनी केल्याचे पाहायला व ऐकायला मिळायचे.
हे त्यांनी आपल्या मधुर वाणीने, नम्र व प्रेमळ स्वभावाने, व्यवहाराने व त्या क्षेत्रातील अध्ययनाने केले आहे. समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे ‘जगामाजी जगनमित्र। जिंव्हेपाशी असे सूत्र।’ याचे प्रत्यक्ष उदाहरण जयंतराव यांनी प्रस्तुत केले. हे एवढे दिग्गज शास्त्रज्ञ, यांचे ज्ञान, अध्ययन व कार्य प्रचंड आहे. अशांनी त्यांच्या जीवनात हा असा ‘जगन्मित्र‘ अन्य कोणी पाहिला असेल का, असा प्रश्न माझ्या मनात येतो.
जयंतरावांचे जीवन संयमित होते. आहारावर पूर्ण नियंत्रण व नियमित व्यायाम, यामुळे त्यांची प्रकृती अतिशय सुदृढ होती. यामुळे त्यांच्या शरीराला कोणत्याही आजाराचा स्पर्श झाला नाही. जर हा अपघात झाला नसता, तर ते आणखी किमान २० वर्षे तरी उत्कृष्ट कार्य करू शकले असते. जयंतरावांचे जीवन अखंड परिश्रमी होते. 'Saint in hurry' असे त्यांचे वर्णन करावे लागेल. संघाच्या एका गीतात म्हटल्याप्रमाणे ‘कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती’ हे त्यांनी प्रत्यक्ष साकार करून दाखविले.
त्यांची श्रेष्ठ गुणवत्ता, सात्त्विकता व समर्पण या गुणांमुळे परमेश्वरालासुद्धा ते हवेसे वाटले असणार आणि त्यांची निरामय व सुदृढ प्रकृती पाहता त्यांना लवकर मृत्यू येणे अशक्य आहे, यासाठी आपल्याजवळ त्यांना घेण्यासाठी बहुधा परमेश्वरानेच हा अपघात घडविला असेल, अशी शंका मनात येते. काहीही असो, वयाने माझ्यापेक्षा लहान असलेल्या, पण कर्तृत्वाने, गुणवत्तेने व समर्पण भावनेने माझ्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असणार्या या लहान भावाला आज दु:खद अंत:करणाने व विनम्र भावनेने मी श्रद्धांजली अर्पण करतो.
सुहास हिरेमठ
(लेखक रा. स्व. संघ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य आहेत.)