नगर येथील संदलच्या मिरवणुकीचे निमित्त साधून छत्रपती शिवाजी महाराजांचा व हिंदवी स्वराज्याचा तीव्र द्वेष तिरस्कार करणार्या औरंगजेबाचे पोस्टर्स मुद्दाम नाचवण्यात आले. त्यातून महाराष्ट्राच्या दैवतांना खिजवण्याचा व सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला. कोल्हापूरमध्येही यावरून दंगली झाल्या. हे सारे शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे झाली, तो मुहूर्त साधून करण्यात आले. अशावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंग्याचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही,’ असा निर्वाणीचा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला, हे फार बरे झाले. या दुष्प्रवृत्तींचा योग्य तो पाहुणचार सरकार करेलच. तथापि, कट्टर, धर्मांध, हिंदू धर्म, संस्कृतीद्वेष्ट्या, विध्वंस्क, महाराष्ट्रद्वेष्ट्या, क्रूर कारवाया करणार्या औरंगजेबाची ओळख उभ्या महाराष्ट्राला झाली पाहिजे, त्यानिमित्त हा विशेष लेखप्रपंच...
औरंगजेबाचे नव्हे, सर्व सुलतानी राजवटीचे उदात्तीकरण करण्याची ‘फॅशन’ स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवात झाली. ‘औरंगजेब बादशहा असूनही स्वतः तयार केलेल्या टोप्या विकून त्यावर गुजराण करीत असे. तो अल्लाचा जप करणारा कनवाळू होता,’ अशा भाकडकथा पसरवण्यात आल्या. पण, इतिहास काही वेगळेच सांगतो. बाबरांपासून आलेल्या या मुघल बादशहांनी अफाट संपत्ती जमा केली. इस्लामधर्माचा प्रसार करणार्या सुफींना आश्रय देऊन हिंदूंवर जिजिया कर लावण्याचे पाप केले. हे बादशहा लहरी, हिंदू धर्म द्वेष्टे व विध्वंसक होेते. शहाजहानने एका हुकूमाने काशी क्षेत्रातील ७५ मंदिरे उद्ध्वस्त केल्याचा उल्लेख आढळतो. शहाजहानच्या काळात औरंगजेब दख्खनचा सुभेदार होता. इटलीचा प्रवासी मनुची याने त्याच्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. मनुची हिंदुस्थानात आल्यावर त्याने काही वर्षे शहाजहान व औरंगजेब यांच्याकडे नोकरी केली होती. त्याने औरंगजेबला अगदी जवळून पाहिले होते.
आपल्या प्रवासवर्णनाच्या पुस्तकात मनुचीने एक प्रसंग लिहून ठेवला आहे. त्यावरून औरंगजेब किती क्रूर होता याचे प्रत्यंतर येते. मनुची लिहितो, ‘.....औरंगजेबाला कूच करण्यासाठी ज्या मार्गाने जायचे होते, त्या मार्गावर ८० काफरांना बळी द्यावे, असा त्याने हुकूम दिला. त्या हुकूमात औरंगजेब पुढे म्हणतो, या काफरांना मागे हात बांधून एका एका रांगेत उभे करावे आणि एकेकाचे मुंडके छाटीत जावे.’ ही क्रूरता औरंगजेबाच्या पुढील आयुष्यातही पाहायला मिळते. आजारी बाप जिन्यावरून पडल्याचे निमित्त होऊन मरण पावला की त्याला मारला, हे नक्की सांगता येत नाही. शहाजहानच्या मृत्यूनंतर तेथील सरदारांनी औरंगजेबाचा मोठा भाऊ दाराशुजा याला वारस ठरवून त्याची मिरवणूक काढली. या मिरवणुकीत त्याला सामोरे जाण्याच्या निमित्ताने औरंगजेबाने सख्या भावाला भर चौकात ठार मारले. मिर्झाराजे या अत्यंत विश्वासू व बादशहाशी एकनिष्ठ असलेल्या शूर सरदारास, छत्रपती शिवाजी महाराज आग्राहून सुटून जाण्यासाठी मदत करण्याचा आरोप ठेवून मारण्यात आले. अत्यंत शूर मिर्झाराजेंना औरंगजेबाने बंगालकडे पाठवले व तिकडे मानाची वस्त्रे म्हणून विषारी पोशाख पाठवून ठार केले. छत्रपती संभाजीराजे हाताशी लागल्यावर औरंगजेबाने त्यांना अत्यंत हालहाल करून मारले. अशा कपटी, क्रूर, महाराष्ट्र व हिंदवी स्वराज्यद्वेष्ट्या औरंग्याचा उदो उदो या महाराष्ट्रभूमीत व्हावा, हे अत्यंत लाजीरवाणे!
आता समर्थ रामदास स्वामींचे औरंगजेबाविषयी काय विचार होते, ते पाहणे उचित ठरेल. इ. स. १६३२ ते १६४४ या काळात तीर्थयात्रेतून समर्थांनी पायी फिरून सारा देश न्याहाळला. विचक्षण बुद्धीच्या रामदासांचे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक निरीक्षणाबरोबर राजकीय घडामोडींकडेही लक्ष होते. अन्यायी कसल्याही नीती विचारांची चाड नसलेले म्लेंच्छ राज्य नष्ट व्हावे, यासाठी हिंदूराजाच्या शोधात रामदास देशभर फिरले. अखेरीस शिवाजी महाराजांच्या रुपाने, ज्याच्या गुणमहत्त्वाची कुणाबरोबर तुलना करता येणार नाही, असा हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा सापडला. या राजाला औरंगजेबाकडून धोका आहे, हे ओळखून ‘अखंडचि सावधाना। बहुत काये करावी सूचना।’ असा इशारा दिला होता. महाराज नेहमीच सावध होते. पण, तरीही ‘समस्या सारखा समय येईना’ असे झाल्याने महाराज आग्य्राला बंदिस्त झाले. त्यावेळी समर्थांनी रतनगढ येथे दुर्गादेवीचे अनुष्ठान करून महाराजांच्या सुटकेसाठी दैवी व भौतिक प्रयत्न केले. औरंगजेबाच्या कपटी स्वभावाची पूर्ण जाणीव समर्थांना होती. पुढे आपल्या बुद्धीकौशल्यावर व शौर्यावर महाराज आग्य्राहून निसटले व महाराष्ट्रात सुखरुप पोहोचलो. याचा फार मोठा धसका औरंगजेबाने घेतला होता. हिंदवी स्वराज्य नष्ट करण्याचा त्याचा मनसुबा होता. पण, छत्रपती शिवाजी महाराज जीवंत असेपर्यंत महाराष्ट्रात येण्याचे धाडस त्याने केले नाही.
रामदास स्वामींनी चिंतन करताना या देशाचे एक स्वप्न पाहिले. त्यात म्लेंच्छ राजवटीचा शेवट होऊन हिंदुस्थान बलशाली झाल्याचे पाहिले. त्यात स्वामी म्हणतात, ’बुडाले भेदवाही ते। नए चांडाळ पातकी। गळाले, पठाले, मेले, जाले देशधडी पुढे।’ हे आनंदवनभुवनी प्रकरण लिहीत असताना दुष्ट, पापी औरंगजेब त्यांच्यासमोर असावा. दुष्ट कपटी, कारस्थानी विश्वासघातकी, नीतिन्यायाची चाड नसलेला असे औरंगजेबाचे चित्र समर्थांसमोर होते. त्याने हिंदवी स्वराज्य, हिंदू संस्कृती, हिंदू धर्म नष्ट करण्याचा चंग बांधला होता. त्यामुळे सात्त्विक संतापाने औरंगजेबाचा उल्लेख ते ‘औरंग्या’अशा तुच्छतादर्शक शब्दात करतात.
बुडाला औरंग्या पापी।
म्लेंच्छ संहार जाहला
मोडीली मांडिली क्षेत्रे। आनंदवनभुवनी
संत प्रवृत्तीच्या रामदासांच्या मुखातून ’औरंग्या पापी’ असे उद्गार निघावेत, यातच औरंगजेबाच्या काळ्या कर्तृत्वाचे पुरावे समोर येतात. अशा औरंग्याचे उदात्तीकरण करण्याचा कितीही प्रयत्न झाला, तरी तो व्यर्थ आहे.
नंतर शिवाजी महाराजांच्या अकाली मृत्यूने युवराज संभाजीराजे नव्हे, तर सारा महाराष्ट्र पोरका झाला. पुढे संभाजीराजांनी राजकारणाची सूत्रे हाती घेतली व ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. शिवछत्रपती जीवंत असेपर्यंत महाराष्ट्रभूमीवर पाय ठेवण्याची औरंगजेबाची हिंमत नव्हती, तो आता प्रचंड फौजेनिशी महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन उभा होता. अशावेळी गांगरून न जाण्याचा सल्ला समर्थांनी संभाजीराजांना लिहिलेल्या पत्रातून दिला होता. समर्थ लिहितात, ’अखंड सावधान असावे। दुश्चित कदापि नसावे।’ शिवाजी महाराजांचे गुणविशेष नेहमी आठवून ’आहे तितुके जतन करावे। पुढे आणिक मिळवावे।’ असे पत्रात लिहिले आहे.
’बुडाला औरंग्या पापी’ असे उद्गार कधीही अपशब्द मुखातून न काढणार्या संताचे आहेत. म्लेंच्छांचे राज्य नष्ट होऊन ’महाराष्ट्रधर्म’ हिंदुस्थानभर पसरावा, हे स्वामींचे स्वप्न होते. पण, दैव बलवत्तर म्हणून औरंगजेबाचा नाश लवकर झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांच्या निधनानंतर औरंगजेब मराठ्यांच्या पारिपत्यासाठी महाराष्ट्रात उतरला. एप्रिल १७०० मध्ये त्याने सातारा जिंकले व फतेहउलखानास सज्जनगडाकडे पाठविले. वास्तविक, सज्जनगड हे राजकीय स्थान नसून ते धार्मिक आहे, याची माहिती असूनही तेथे मोर्चेबांधणी केली गेली व स्वतः औरंगजेब त्यात सामील झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून परशुराम प्रतिनिधी व उद्धव गोसावी यांनी गडावरील मूर्ती गुप्तवाटेने वासोटादुर्गावर पोहोचवल्या. सज्जनगड हाती आल्यावर दि. १३ जून, १७०० हा औरंगजेब स्वत: गडवर आला. आल्या आल्या त्याने तेथील मंदिरे उद्ध्वस्त करण्याचा हुकूम दिला. तेथील मारुतीचे मंदिर त्याने पाडले. औरंगजेब स्वतःला ’बुतशिकन’ म्हणजे मूर्तिभंजक म्हणवून घेत असे. समर्थसमाधी भुयारात असल्याने वाचली.
देवळातील मारुतीच्या मूर्तीची विटंबना होताच गडावर प्रचंड पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट होऊन पावसाचा ओर वाढला. तो थांबण्याचे चिन्ह दिसेना. त्याला भिऊन दि. २१ जून, १७०० रोजी औरंगजेबाने गड सोडण्याचा हुकूम दिला. वाटेत उर्वशी उर्फ उरमोडी नदीला अचानक महापूर आला. काहीच पूर्वतयारी नसल्याने सैन्याची वाताहत झाली. कित्येकजण पुरात वाहून गेले. जणू काही सज्जनवासीयांच्या या सज्जनगडावर दुर्जन औरंगजेबाचे वास्तव्य निसर्गाला आवडले नसावे. त्याने उग्र रूप धारण करून गडावरील मारुतीची मूर्ती उद्ध्वस्त करणार्या मूर्तिभंजकास पिटाळून लावले. केवळ दैव बलवत्तर म्हणून उरमोडी नदीच्या महापुरातून औरंगजेब बचावला, अन्यथा ’बुडाला औरंग्या पापी’ हे समर्थ विधान शब्दशः खरे ठरले असते. औरंगजेब महापुरात बुडाला नाही तरी पुढे याच मातीत गाडला गेला. म्हणूनच औरंगजेबाचे उदात्तीकरण कोणतेही महाराष्ट्रीयन मन सहन करणार नाही!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.