अंग तापवणारा तापाचा दाह

    08-May-2023
Total Views | 157
fever


मनुष्याच्या शरीराचे तापमान हे ९८ डिग्री फॅरनहाईटच्या आसपास असते. बाहेरील तापमान कमी असो वा जास्त असो, शरीराचे तापमान व्यवस्थित ठेवण्याची सुंदर रचना मानवी शरीरात आहे. तापाची इतरही अनेक कारणे आहेत. तेव्हा, सध्या घराबाहेर उन्हाचा ताप आणि घरातही या अशा विचित्र वातावरणामुळे डोके वर काढणारा ताप... अशा या तापाचे स्वरुप, विविध प्रकार यांची माहिती देणारा हा लेख...

आमच्या लहानपणी ‘मलेरिया हेल्थ वर्कर’घरोघरी जाऊन तापाचा सर्वे करत. ताप असणार्‍या व्यक्तीस ‘क्लोरोक्वीन’च्या गोळ्या देत. गरज पडल्यास त्याचे रक्त मलेरिया तपासणीसाठी घेतले जाई. महानगरपालिकेच्या दवाखान्यात देखील मोफत औषधे दिली जात. अगदी केस पेपर नोंदणीचेदेखील पैसे घेतले जात नव्हते. याच तापाची ‘ट्रिटमेंट’ हळूहळू महागडी होऊ लागली. भरमसाठ, महागड्या चाचण्या करण्यात येऊ लागल्या. अनेक रुग्णांना तापासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करून ताप गरम पडेल, अशी हॉस्पिटलची बिले येऊ लागली. कोरोना महामारीने तर तापाचे सर्व संदर्भच बदलून टाकले. या काळात ताप आला, तर तो फक्त कोरोनाचाच असेल, असा समज करून देण्यात प्रसार माध्यमे यशस्वी झाली. महागड्या चाचण्या, क्वॉरनटाईन, बेड्सची कमतरता, ऑक्सिजन व औषधांचा तुडवडा या सर्व समस्या आरोग्य खात्यासमोर उभ्या राहिल्या. सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध नव्हते, तर कॉर्पोरेटहॉस्पिटलची बिले पाच ते दहा लाखांच्या घरात येऊ लागली. एवढा खर्च करूनही अनेक रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागले. अनेकांचा अकाली मृत्यूने गाठले, तर अनेक घरातील कर्ता पुरुष नाहिसा झाला.

 
आज परिस्थिती अशी आहे की, ताप आल्यास नागरिक डॉक्टरकडे जाण्यास घाबरू लागले आहेत. आजार काय निघेल, खर्च किती येईल, या चिंतेने ते डॉक्टरकडे जाणे टाळू लागले. घरगुती उपाय करणे, तापाची गोळी घेणे यावर सामान्य जनता जास्त भिस्त ठेवू लागली. सरकारी रुग्णालयातील गर्दी, तेथे रुग्णांना केली जाणारी दमदाटी यामुळे रुग्ण सरकारी रुग्णालयात जाणे टाळू लागले. खासगी रुग्णालयात उपचार महागडे झाले. या सर्वांवर उपाय काय?ताप येऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे सर्वांत हिताचे आहे. नियमित दिनचर्या, सकाळी लवकर उठणे, सूर्यनमस्कार, योग, ध्यानधारणा, विपश्यना, ब्रह्मविद्या, चालणे यापैकी एखादातरी व्यायाम प्रकार करावा. आहाराच्या वेळा नियमित असाव्या. तेलकट, मसालेदार, मांसाहार शक्यतो टाळावा. बाहेरचे अन्न शक्यतो टाळावे. अतिरिक्त ताणतणाव कमी करावा आणि साधे सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. या सर्व गोष्टी आपल्याला तापापासून दूर ठेवतील. यातूनही जर ताप आलाच, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्या व त्याप्रमाणे तापावर उपचार करावा.

तापाचेही अनेक प्रकार आहेत. मलेरियासारख्या तापामध्ये थंडी भरून ताप येतो व तो थोड्या वेळापुरता असतो. टायफाईडचा ताप हा दिवसभर राहतो. टिबीचा ताप हा कमी प्रमाणात असतो. पण, त्याच्याबरोबर खोकला येणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, थुंकीमधून रक्त जाणे इत्यादी लक्षणेदेखील दिसतात. कावीळझाल्यास ताप येतो. त्याचबरोबर उलट्या होणे, भूक कमी होणे, पोटात दुखणे, लघवी हळदीसारखी पिवळी होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. न्यूमोनियासारख्या आजारात फणफणून ताप येतो. त्याचबरोबर खोकला, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे इत्यादी लक्षणे दिसतात. तापामध्ये आकडी येणे यास ‘ताप डोक्यामध्ये गेला’ असे म्हणतात. ‘मेनिनजायटिस’, ‘एनसेफालायटिस’, ‘ब्रेन ट्यूमर’, ‘मिरगी’ इत्यादी आजारात रुग्णास आकडी येऊ शकते. अजीर्ण, अपचन होऊन किंवा अमिबियासिसमध्येदेखील ताप येतो. संधीवातासारख्या आजारात सांधेदुखी आणि सांध्यांना सूज येऊन ताप येतो.

 
ताप, सर्दी, खोकला या लक्षणांचे त्रिकूट बर्‍याच वेळा आढळून येते. फॅमिली डॉक्टरकडे येणार्‍या रुग्णांमध्ये या त्रिकूटांचे रुग्ण अधिक असतात. काही रुग्ण आधीच्या आजारातूनउरलेले औषध घेऊन बरे होण्याचा प्रयत्न करतात, तर काही रुग्ण स्वत:च्या मनाने औषधे सुरू करतात. तापाची एखादी गोळी घेऊन बघितली, तर हरकत नाही. पण, काही रुग्ण स्वत:च्या मनानेप्रतिजिविके (अ‍ॅन्टिबायोटिक्स), कफ सिरप व इतर औषधे चालू करतात. या सर्वांनी आजार बळावण्याची शक्यता असते.
सर्दी, खोकला, ताप या त्रिकूटाबरोबर अंग दुखणे, डोके दुखणे, भूक कमी होणे, तोंड येणे इत्यादी लक्षणेदेखील दिसतात. या सर्वांचे मुख्य कारण म्हणजे ऋतूबदलामुळे होणारा विषाणू संसर्ग. बरेचसे विषाणू संसर्ग (वायरस इन्फेक्शन) हे सौम्य स्वरुपाचे व आपोआप बरे होणारे असतात. दोन दिवस आराम केला व पथ्यपाणी सांभाळले, तर डॉक्टरकडे जाण्याची वेळ न येता, ताप बरा होतो. ताप कमी न झाल्यास फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेणे जरुरी आहे. कोरोना महामारीने सर्व वैद्यकीय संदर्भ बदलले. प्रत्येक तापाचा रुग्ण हा संशयित कोरोना रुग्ण म्हणून बघितला जाऊ लागला. ‘एसपीओटू’ ९५ टक्क्यांपेक्षा कमी झालेल्या रुग्णांची व १०० डिग्री फॅरनहाईट ताप असलेल्या रुग्णांची ‘आरटीपीसीआर’ ही महागडी चाचणी करण्यात येऊ लागली. या चाचणीचा रिपोर्ट येण्यास दोन दिवसांचा कालावधी लागे.


चाचणीची विश्वासर्हता बर्‍यापैकी कमी होते. ‘फॉल्स पॉझिटिव्ह’ आणि ‘फॉल्स निगेटिव्ह’रिपोर्टचे प्रमाण बर्‍यापैकी जास्त होते. कोरोना ‘आरटीपीसीआर’ रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आला म्हणजे कोरोनाचा आजार नाही, असे खात्रीदायकरित्या सांगता येत नव्हते. चार दिवसांनी पुन्हा ही चाचणी करण्याचा सल्ला दिला जात होता. हा सर्व कारभार रुग्णाला हात न लावता होत होता. रुग्णाची मानसिक अवस्था काय झाली असेल, हे पाहण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडे वेळ नव्हता.जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे जगभर कोरोना महामारीचे उपचार केले जात होते. ही मार्गदर्शक तत्वे वारंवार बदलत होती. प्रसारमाध्यमातून फक्त मृत्यूचे आकडे जाहीर केले जायचे. प्रतिबंधासाठी काय उपाययोजना करावी, यासाठी काही विशेष मार्गदर्शन नसायचे. ताप आला म्हणजे आपलापृथ्वीवरील अवतार संपला, असेच बर्‍याच रुग्णांना वाटायचे, त्यामुळे आजही ताप आला, तर रुग्णाच्या मनात धडकी भरते आणि त्याला जुने दिवस आठतात.
 
गेली सात वर्षे मी तापाच्या रुग्णांचे उपचार करण्याची माझी स्वत:ची पद्धत विकसित केली होती. ‘पल्स ऑक्सिमीटर’चा वापर मी गेली सात वर्षे करत होतो. नाडीचे ठोके १०० पेक्षा जास्त, ताप १०० डिग्री फॅरनहाईटपेक्षा जास्त व ‘एसपीओटू’ ९० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास व रुग्णाचा सिक लूक असल्यास अशा रुग्णांना पहिल्या दिवशीच ‘क्लोरोक्वीन’च्या गोळ्या व्यवस्थित डोसमध्ये दिल्या जायच्या. अगदी लहान मुलांनेदेखील त्यांच्या वजनाच्या हिशोबाने ‘क्लोरोक्वीन’चे औषध दिले जायचे. या औषधांबरोबर, तापाची गोळी (पॅरासिटामॉल), सर्दीची गोळी व खोकल्याचे औषध दिले जायचे. वर ‘सिक लूक’चा उल्लेख केला आहे. यास ‘टॉक्सिक लूक’ असेही म्हणतात. याचे अचूक वर्णन करता येणार नाही. पण, ते प्रत्येक डॉक्टरने आपल्या अनुभवाप्रमाणे ठरवायचे असते. या सर्व रुग्णांना ‘क्लोरोक्विन’ दिले जायचे व रुग्णाला दोन दिवस घरीच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जायचा. तापाचा जर पहिला दिवस असेल, तर शक्यतो चाचण्या टाळल्या जायच्या. कारण, पहिल्या दिवसांत केलेल्या चाचण्यात आजाराचे निदान होण्याची शक्यता कमी असते. वरील उपचाराने ९० टक्के रुग्णांचा ताप कमी होऊन जायचा. त्यांची इतर लक्षणे कमी होऊ लागायची. अशा रुग्णांना चाचण्या करण्याची गरज पडायची नाही.


उरलेल्या दहा टक्के रुग्णांना ताप कमी न झाल्यास अशा रुग्णांच्या जुजबी चाचण्या केल्या जायच्या. यात ‘सीबीसी’, ‘ईएसआर’, ‘युरिन’, ‘मलेरिया पॅरासाईट’, ‘सिरम क्रियाटिनीन’, ‘सिरम बिलीरुबिन’, ‘ब्लड शुगर’ या चाचण्यांचा समावेश असायचा. या दहा टक्के रुग्णांपैकी बर्‍याचशा रुग्णांच्या आजाराचे निदान व्हायचे व त्यांच्यावर त्याप्रमाणे इलाज केले जायचे.तापाच्या फारच थोड्या रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याची वेळ यायची. ताप बरा करणे ही एक कला आहे व ती मी बर्‍यापैकी अवगत केली होती. याच पद्धतीचा माझे अनेक विद्यार्थी अवलंब करत होते. अगदी कोरोना महामारीच्या काळातदेखील ऑनलाईनवरून याच पद्धतीने तापावर उपचार केले जायचे व यात बर्‍यापैकी यश येत होते. ‘पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह’ आल्यास अशा रुग्णांना ‘होम क्वारंनटाईन’मध्ये उपचार करण्याचा प्रयत्न केला जायचा. ‘एसपीओटू’ ९०च्या खाली गेल्यास, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा इतर गुंतागुंत आढळल्यास रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला जायचा. त्यातही सरकारी ‘कोविड’ रुग्णालयात बेड मिळावा, यासाठी प्रयत्न केला जायचा. ‘जागतिक आरोग्य संघटने’ने दिलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे आपण उपचार केले, पण त्याची व्यवहारता आपण तपासून नाही पाहिली. म्हणूनच ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

कोरोना महामारीच्या नंतरचा ताप

कोरोना महामारीनंतर लोक तापासाठी डॉक्टरकडे जाण्यास घाबरू लागले. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे हे सामान्य नागरिकांना पटू लागले. आयुर्वेदिक काढा, जीवनशैलीतील बदल यामुळे ताप सहसा येऊ नये, यासाठी प्रयत्न होऊ लागले. ताप आलाच, तर चांगल्या अनुभवी फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने त्यावर उपचार करावा. वर सांगितलेल्या उपचार पद्धतीचा अवलंब करण्यास हरकत नसावी. कारण, मी गेली सात वर्षे याचा अवलंब करत आहे. संशोधन हे फक्त मेडिकल कॉलेजमध्येच होते, हा आपला गोड गैरसमज आहे. ‘ग्रास रुट लेव्हल’वर अनेक गोष्टींवर संशोधन होत असते, पण त्याची दखल घेण्याची आपल्याकडे पद्धत नाही.

ताप आणि आयुर्वेद


मिथ्या आहार आणि मिथ्या विहार यामुळे त्रिदोषमधील समतोल बिघडतो व आजारास सुरुवात होते. पहिले लक्षण हे ताप असू शकते. ‘क्युरीला म्हणून सिरप लहान मुलांना दिले जायचे. यात पिंपळी,सूंठ, हळद इत्यादी घटक होते. आयुर्वेदात आहाराच्या पथ्यास विशेष महत्त्व आहे.

ताप आणि होमियोपॅथी

गेली ३० वर्षे काही ठरावीक लक्षणांवर होमियोपॅथी उपचार लाभदायी असल्याचे जाणवले. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेस येणार्‍या तापासाठी वेगवेगळी होमियोपॅथी औषधे उपलब्ध आहेत आणि ती प्रभावी आहेत. उदा. दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत थंडी भरून ताप आल्यास त्यावर ‘लायकोपोडियम’ औषध प्रभावी आहे. रात्री ९ ते ११ दरम्यान थंडी भरून ताप आल्यास यावर ‘इपिकॅक’ हे औषध प्रभावी आहे. आयुर्वेद, होमियोपॅथी या शाखा अ‍ॅलोपॅथिक पूरक ठरू शकतील. त्यांच्या एकत्रित वापर झाल्यास तो फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. पण, त्या प्रकारचे संशोधन करण्याची आपली मानसिकता नसते.

आपला दवाखाना

कोरोना महामारीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ताप, सर्दी, खोकला या प्राथमिक लक्षणांवर आधी उपचार व्हावेत आणि ते संपूर्ण देशभरात आणि संपूर्ण समाजात व्हावे. आजही ग्रामीण भागात किंवा आदिवासी पाड्यात वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध नाही, ही वस्तुस्थिती आहे. ‘आपला दवाखाना’ ही फारच चांगली संकल्पना आहे. फक्त त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी व तेथे माणुसकी जागावी, ही सदिच्छा!




-डॉ. मिलिंद शेजवळ



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121