पाकिस्तानचा आणि काश्मीरचा काहीही संबंध नाही. संबंध असलाच तर पाकिस्तान पाक व्याप्त काश्मीरमधून केव्हा माघार घेतो, इतकाच संबंध आहे. त्यामुळेच पाकिस्तानने काश्मीर तसेच ‘जी २०’ परिषदेबाबत काहीही बोलू नये, अशा शब्दांत भारताने पाकला खडसावले आहे. निमित्त होते शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे...
दहशतवादावर बोलून आम्ही मुत्सद्देगिरीत गुण मिळवत नाही आहोत. आम्ही राजकीय आणि मुत्सद्दीपणे पाकिस्तानला जगासमोर उघडे पाडत आहोत. दहशतवादाचा पीडित म्हणून आम्हाला असे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पाकिस्तानची विश्वासार्हता त्याच्या विदेशी चलन साठ्यापेक्षाही वेगाने कमी होत आहे, अशा शब्दात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाक विरोधात टीकास्त्र सोडले. दि. ४ आणि ५ मे रोजी गोव्यात ‘शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन’मधील (एससीओ) देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी गोव्यात दाखल झाले होते. त्यांनी दहशतवादासंबंधी टिप्पणी केल्यानंतर जयशंकर यांनी त्यांना चांगलेच खडसावले. चीन आणि पाकिस्तानसोबत आमचे संबंध सामान्य नाहीत. जोपर्यंत सीमेवरील परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत हे संबंध सामान्य होऊ शकत नाहीत. पाक दहशतवादी कारवाया करत आहे. पाककडून त्याचे समर्थन केले जाते.
आम्हा सर्वांना त्याचा संताप येतो. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांप्रमाणेच जम्मू-काश्मीरमध्येही ‘जी २०’च्या बैठका होत आहेत. पाकचा ‘जी २०’ परिषदेशी काहीच संबंध नाही, श्रीनगरशीही संबंध नाही. काश्मीरवर चर्चा करण्यासाठी फक्त एकच मुद्दा आहे, तो म्हणजे पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरवरील आपला बेकायदेशीर कब्जा कधी सोडतो हाच! ‘३७० कलम’ संदर्भात बिलावल यांनी मत व्यक्त केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना, ‘३७०’ हा इतिहास आहे. झोपेतून जागे व्हा, तर वस्तुस्थिती तुम्हाला लवकर समजेल, अशा शब्दांत उत्तर दिले. बिलावल येथे ‘एससीओ’ सतत सदस्य देशाचे परराष्ट्रमंत्री म्हणून आले होते, या दृष्टीने त्यांच्या उपस्थितीकडे पाहिले पाहिजे. त्यापेक्षा जास्त त्यांना महत्त्व देता कामा नये, अशा शब्दात त्यांनी बिलावल यांना फटकारले. १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच पाकचा कोणी मंत्री अशा प्रकारे भारत दौरा करत होता. बिलावल हे पाकच्या माजी महिला पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे सुपुत्र होत. त्यांनी आजपर्यंत वेळोवेळी भारत विरोधात विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्य वक्तव्ये केलेली आहेत. त्यांचा भारताने त्या त्या वेळी कठोर शब्दात निषेधही केलेला आहे.
‘एससीओ’ बैठकीसाठी भारत दौर्यावर येणारे बिलावल म्हणाले होते की, “आपला दौरा भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी नाही. त्यामुळेच भारताने त्यांना कठोर शब्दात प्रत्त्युत्तर दिले आहे. याच बिलावल यांनी २०१४ मध्ये कश्मीर हा पाकिस्तानचा भाग असून, त्याची एक इंच जमीनही भारताला देणार नाही, असे म्हटले होते. आज काश्मीरमध्ये काय घडते आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. दहशतवादाला प्रोत्साहन देणारा, दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र असलेला पाकिस्तान भिकेला लागला आहे. भारताने दहशतवादाविरोधात ना केवळ कठोर भूमिका घेतली, तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वेळोवेळी सर्वच देशांना त्या विरोधात आवाज उठवणे भाग पाडले. त्याचवेळी पाकमधील दहशतवादांच्या अड्ड्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत त्यांचा पुरता बीमोड केला. भारताने दहशतवादाविरोधात घेतलेली भूमिका पाकची कोंडी करणारी ठरली. २०१४ पूर्वी देशभरात कोठे ना कोठे अतिरेकी हल्ले होत होते. त्याचा केवळ निषेध नवी दिल्ली येथून केला जायचा. फार तर अमेरिकेकडे त्याबाबत तक्रार केली जायची. त्यामुळे पाकचे काहीही अडत नव्हते.
सीमेपलीकडून घुसखोरी होत राहिली, देशभरात निरपराध नागरिक दहशतवादी कारवायांना बळी पडत राहिले. मात्र, २०१४ नंतर हे चित्र बदलले. जम्मू-काश्मीरमध्येच अतिरेक्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घालण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारने सुरक्षा दलांना पूर्णपणे मोकळीक दिल्याने, त्यांचे बांधलेले हात मोकळे झाले. परिणामी, दहशतवादी मोठ्या संख्येने चकमकीत मारले जाऊ लागले. देशात अन्यत्र कोठे एकही बॉम्ब दहशतवादी फोडू शकले नाहीत. हे केंद्रातील सरकारचे मोठे यश ठरले. केंद्राने केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’ हा अतिरेक्यांचे कंबरडे मोडणारा ठरला. अतिरेक्यांचे पाकिस्तानात असलेले तळ आणि या तळांवर भारताने केलेला हल्ला सार्या जगाने पाहिला. म्हणूनच आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकची आर्थिक नाकेबंदी करणे भारताला शक्य झाले.
परिणामी, पाकिस्तान मिळणारी आर्थिक रसद बंद झाली. पाक आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. पाकच्या सर्व सीमा अशांत आहेत. देशात सर्वसामान्य नागरिक अन्नधान्यासाठी वणवण फिरत आहेत, तर बाकी नेते-मंत्री युरोप, अमेरिकेत भिक मागत फिरत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नवे कर्ज देताना पाकसमोर कठोर अटी ठेवलेल्या आहेत. भारताने दहशतवादाविरोधात घेतलेली ठाम भूमिका पाकला एकटे पडणारी ठरली. या बैठकीत भारताने पाकिस्तान चीन दरम्यानच्या तथाकथित कॉरिडोर संदर्भात कठोर भाष्य करत, दहशतवादाला जोडणारी कोणतीही कनेक्टिव्हिटी समर्थनीय ठरू शकत नाही,” असे खडे बोल चीनलाही सुनावले आहेत. तिकडे पाकिस्तानात इम्रान खान यांनी भारताने पाकचा अवमान केला, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे. ‘एससीओ’ बैठकीचा मूळ उद्देश दहशतवादाचा मुकाबला करणे, हाच आहे. भारताने पाक विरोधात भाष्य करत, तो उद्देश साध्य केला, असे निश्चितच म्हणता येते.