‘इसिस’चे वास्तव

    06-May-2023
Total Views | 252
The reality of ISIS
क्रूरपणे हिंसा करून ‘इसिस’ने त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले. कारण, अशीच हिंसा पसरवून त्यांना त्यांचे इस्लामिक राज्य जगावर प्रस्थापित करायचे आहे. लोकशाही व्यवस्थेवर त्यांचा विश्वास नाही. लहान मुले-स्त्रिया यांना बंदी बनवणे, ठार करणे, काफिरांचे गळे कापणे, लहान मुलांना दहशतवादाचे प्रशिक्षण देणे, त्यांना शस्त्रे देऊन त्यांना हत्या करायला लावणे, अशा अनेक राक्षसी बाबी ‘इसिस’शी जोडलेल्या आहेत. भारतात सुद्धा त्यांच्या छुप्या कारवाया काही प्रमाणात चालल्या होत्या. पण, सुरक्षा यंत्रणांनी वेळीच त्यावर कारवाई करुन त्यांना आळा घातला. महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या क्रूर धोरणाला सामान्य भारतीय इस्लामी जनतेचा पाठिंबा नाही. भारतातील सर्वसमावेशक संस्कृती आणि भारतीय इस्लाम यांनी अशा हिंसक संघटनेला कधीही साथ दिली नाही. ‘द केरला स्टोरी’च्या निमित्ताने भारतातील ‘इसिस’ची पाळेमुळे आणि वास्तव सविस्तर मांडणारा हा लेख...


'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया’ म्हणजेच ‘इसिस’ यालाच ‘आयएसआयएस’ किंवा ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड लेवांत’ म्हणूनही ओळखले जाते. ही दहशतवादी संघटना आहे. तिची स्थापना अबू मुसाब अल झरकावी याने १९९९ मध्ये केली होती. पण, तिचा प्रभाव ठळकपणे दिसू लागला तो २०१४ मध्ये. या धर्मांधांना संपूर्ण जगात इस्लामिक राजवट आणून त्यांच्या कायद्यांची प्रस्थापना करायची आहे. लोकशाहीसारख्या व्यवस्थेवर त्यांचा मुळी विश्वासच नाही. त्यांनी २०१४ ला आक्रमक धोरण स्वीकारले. इराक आणि सीरियाचा एकेक प्रांत आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. त्यांनी इराकच्या सैनिकांना हरवून मोसूल प्रांत ताब्यात घेतला. तसेच तेथील सिंजर प्रांत ताब्यात घेत हजारो याझिदी स्त्रिया, पुरुष आणि मुलांचे हत्याकांड केले. काहींचे अपहरण केले.

‘आरबीएसएस’ - इस्लामी युवकांचा ‘इसिस’ला प्रतिकार


‘इस्लामिक स्टेट’च्या स्वप्नाला वास्तवात आणताना २०१४ मध्ये सीरियामधील राक्का हे शहर काबीज केले. ‘इसिस’ची २०१४ ते २०१७ पर्यंतची राजधानी होती. या शहरातील नागरिकांचे जीवन पार बदलून गेले. आपले राज्य येते आहे असे वाटत असताना सामान्य नागरिकांचे सर्व स्वातंत्र्य संपले. दिवसाढवळ्या भर रस्त्यात इस्लामच्या नावाखाली दिवसागणिक या ठिकाणी सामान्य नागरिकांच्या हत्या होऊ लागल्या. मानवी अधिकार पायदळी तुडवले गेले. याला विरोध करण्यासाठी स्थानिक इस्लामिक युवकांचा एक गट या तथाकथित ‘इस्लामिक स्टेट’च्या विरोधात उभा राहिला. यातूनच सुरू झाले ‘आरबीएसएस’ म्हणजेच ‘राक्का बीइंग स्लॉटर्ड सायलेंटली!’ ‘आरबीएसएस’ हे एक फेसबुक पेज...एक चळवळ...एक सिटीझन जर्नालिझम. ‘इसिस’ने टीव्ही, मोबाईल ही संपर्काची साधने वापरण्यावर बंदी घातलेली होती. मोबाईल सापडला तर त्या व्यक्तीला ठार मारले जात होते. अशा परिस्थितीत ‘इस्लामिक स्टेट’चे अत्याचार राक्कामधून थेट जागाच्या कानाकोपर्‍यात पोहोचले ते या ‘आरबीएसएस’मुळे..!


 हे युवक मोबाईलवर या अत्याचाराचे थेट व्हिडिओ आणि फोटो टाकू लागले. स्वत:चा जीव धोक्यात घालून, लपूनछपून हे काम उत्स्फूर्तपणे १७ युवक करू लागले. यामुळे लगेचच या युवकांना ‘काफीर’ ठरवून, पकडून ठार करायला ‘इसिस’ने सुरुवात केली. मग काही जण सीरियाबाहेरून आपले नाव बदलवून हे फेसबुक पेज, ही चळवळ चालवत आहेत. ‘इस्लामिक स्टेट’च्या नावाखाली निरपराध जनतेची हत्या, महिलांवर अत्याचार आणि लहान मुलांचे शोषण केले जाते आहे. हे सत्य यातून जगाला समजले. पण, या युवकांना स्वत:च्या कुटुंबातील सदस्यांच्या/ मित्रांच्या हत्येचा भयानक व्हिडिओ बघावा लागला. ‘इसिस’ने तर राक्कामधील संपर्काची साधने, टीव्ही, वर्तमानपत्रे आणखीन कठोरपणे बंद केली. ‘आरबीएसएस’च्या सदस्यांना जीव मुठीत घेऊन जगात फिरावे लागले. एकाला तर तुर्कीमध्ये गाठून ठार केले गेले. मग, इस्लामिक राज्याची स्थापना करणारे जे काहींसाठी हुतात्मे आहेत, तर तेच काहींसाठी क्रूर दहशतवादीही आहेतच. जगातील केवळ काही भागांत आपला प्रभाव असणार्‍या ‘इसिस’ला काही सगळी इस्लामी जनता पाठिंबा देत नाही. ‘इसिस’च्या अत्याचारांना विरोध करणारा मोठा इस्लामी समाज आहे. त्याचे भारतातील प्रमाण सुद्धा मोठे आहे.


The reality of ISIS


‘इसिस’ची भयानक योजना

पुढील पिढ्यांनी फक्त इस्लामी कायदे शिकावे यासाठी ‘इसिस’ने प्रयत्न केले. स्वातंत्र्य, समता तसेच न्याय ही लोकशाही मूल्ये निषिद्ध मानली.त्यासाठी आधुनिक साधनांवर बंदी घातली. लहान मुलांना आपल्याच पालकांनी विरोध केल्यास त्यांची हत्या करायला शिकवले गेले. साधारणपणे २०१४ मध्ये जेव्हा ‘इसिस’ने सीरियामधील अल बुकामल या भागावर कब्जा केला, तेव्हा तेथील सगळ्या शाळासुद्धा त्यांच्या ताब्यात आल्या. लहान मुलांना मग मूलतत्त्ववादी प्रशिक्षण मिळू लागले. पुस्तकांमध्ये शस्त्रास्त्रांची चित्रे आली. गणिताच्या पुस्तकात बेरजा-वजाबाक्या शिकण्यासाठी पेन, पक्षी, फळे, फुले यांच्या जागी बंदुका-रणगाड्यांची चित्रे आली. अबू शहेद हे त्या भागातील रहिवासी होते. त्यांनी त्यांचा अनुभव कथन केला आहे. त्यांची पत्नी उम शाहेद म्हणते की, ‘इसिस’ने ताबा घेतल्यावर त्यांचा ११ वर्षे वयाचा मुलगा पार बदलला. जणू तिच्यावर हा लहान हेर सतत पाळत ठेवत असे. त्याच्या सहवासात त्यांना असह्य होत असे. ‘युनिसेफ’ने जेव्हा या भागात सेवाकार्य चालू केले, तेव्हा या सगळ्या गोष्टी स्पष्ट होत गेल्या. ‘इसिस’चे अनेक व्हिडिओ आहेत. दि. ३ मे २०१६ ला ‘इसिस’चा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला. १२ वर्षांपेक्षा लहान असणारी मुले यात आहेत. सैनिकी वेशातील ही मुले सामूहिक गीत सादर करतात आणि ते करताना हसत हसत स्वत: भोवती बॉम्बचा बेल्ट बांधतात. शस्त्रांचे प्रशिक्षण घेतात. त्या गाण्याचा अर्थ- आमच्यासाठी तुमचे जीवन हे पवित्रच नाही मुळी. तुमच्या गुन्ह्यासाठी तुमचे रक्त नक्कीच वाहणार... हा बाल व्हिडिओ पाहताना थरकाप उडाल्याशिवाय राहात नाही.

‘इसिस’चा प्रभाव आणि विचारधारा

दि. २९ जून २०१४ मध्ये ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेची भर पडली होती. ‘इस्लामिक स्टेट’ स्थापन करण्याचे आवाहन केले गेले. त्यासाठी इराक आणि सीरियामध्ये इस्लामिक जनतेने मदतीसाठी यावे, यासाठी भावनिक साद घातलेली होती. शिवाय त्यांचे काळे झेंडे आणि अतिशय क्रूरपणे केल्या जाणार्‍या हत्या यांचे व्हिडिओ ऑनलाईन पसरू लागले होते. तालिबानचा प्रभाव ओसरायला लागला होता. ‘इसिस’ने प्रभाव वाढवला. अनेक जण इस्लामिक राजवट स्थापन करण्यासाठी त्यांना येऊन मिळू लागले. ‘इस्लामिक स्टेट’चे स्वप्न आणि वास्तविक परिस्थिती यात खूप अंतर होते. ज्या महिला स्वेच्छेने तिथे गेल्या, त्यांना अत्याचाराला बळी पडावे लागले. त्यांना ‘इसिस’च्या सैनिकांची वासना भागवण्यासाठी वापरले गेले. अनेक मुलींना ‘सेक्स स्लेव्ह’ बनवण्यात आले. अनेक पुरुषांना हुतात्मा होण्याची स्वप्न दाखवून युद्धात जीव गमवावा लागला.

पुढे दि. २७ ऑक्टोबर २०१९ ला ‘इसिस’चा स्वयंघोषित खलिफा अबू बकर अल बगदादी ठार झाला. सीरियाच्या ईशान्य भागातील इदलीब या भागात बगदादी लपलेला होता. अमेरिकन फौजा जवळ येताच त्याने स्वत:ला बॉम्बच्या जाकेटद्वारे उडवून दिले. साधारणपणे, दि. ३० नोव्हेंबर २०१९ ला पाकिस्तानच्या ‘न्यूज वीक’चे सल्लगार संपादक खालीद अहमद यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, बगदादीला पूर्ण खात्री होती की, कायमस्वरूपी जिहादला पर्याय नाही. त्याने आपल्या अनुयायांना गैरमुस्लीम लोकांच्या कत्तली आणि त्यांच्या स्त्रियांवर अत्याचार करण्याचे स्वतंत्र्य दिलेले होते. त्यांनी याझिदी स्त्रियांना मोठ्या प्रमाणात उपभोगाचे साधन बनवले. जगभरातून पाच हजार सैनिक आणि त्यांना साथ देणार्‍या स्त्रिया त्याच्या जवळ होत्या. विशेष म्हणजे, यातील बहुतांश जण हे स्वत:च्या मर्जीने तयार झालेले होते.

आपली विचारधारा अशा पद्धतीने ‘इसिस’ने पसरवली होती की, लोकशाहीत राहणारे सुशिक्षित लोकसुद्धा त्यांना स्वत:हून जाऊन मिळाले होते. ‘इस्लामिक स्टेट’साठी आपले सर्वस्व द्यायला तयार झाले होते. वास्तविक काही स्वप्न ही फार आकर्षक असतात. त्यांच्या पूर्ततेचा विचार वास्तवाचे भान सोडायला भाग पाडतो. ‘इसिस’साठी आपले सोन्यासारखे आयुष्य कायमचे संपवून अनेक पुरुष-महिला त्यांना सामील झाल्या, ही वस्तुस्थिती आहे. ‘इसिस’च्या विचारधारेला बुद्धिभेद जमला होता, हे वास्तव आहे.

‘इसिस’ आणि भारत

२०१६ साली ‘नॅशनल इन्व्हेस्टीगेटिंग एजन्सी’ची (एनआयए) कुन्नूरच्या कनकमला येथे धाड पडली. त्यात देशाविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी ‘अल झारूर खालेफा’ गट बनवणारे आणि ‘इसिस’ने भारावलेले काही जण सापडले. हे सगळे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे (पीएफआय) सदस्य होते. नंतर दोनच महिन्यांत २२ जण ‘इसिस’ला जाऊन मिळण्यासाठी कायमचे लुप्त झाले. हेच ‘इसिस’चे केरळमधील पहिले मॉड्युल!

‘इसिस’ने भारावलेली संघटना ‘पीएफआय’ आणि मूलतत्त्ववादाने नासलेले केरळ...! २०१६ साली ‘इसिस’ला मिळणारा पाठिंबा पाहून ‘ऑपरेशन पिजन’ चालवले होते. यात तरुणांवर लक्ष ठेवणे, त्यांनी सोशल मीडियावर टाकलेला मजकूर यावर लक्ष ठेवणे असे कार्य जाणीवपूर्वक केले. केरळच्या कुन्नूर, मलप्पुरम आणि कासारगोड यातून साधारणपणे ३०० ते ३५० जणांना पोलिसांनी हेरले. त्यांना पालक आणि इस्लामी धर्मगुरू यांच्या मदतीने दहशतवादी मार्गावरून जाण्यापासून परावृत्त केले गेले.‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’च्या २०१९च्या दहशतवादावरील अहवालात म्हटले आहे की, ‘इसिस’ला जाऊन मिळण्यासाठी प्रयत्न करणार्‍या तरुणांची संख्या केरळमध्ये झपाट्याने वाढत आहेत. साधारणपणे देशातील १८० ते २०० पैकी ४० केसेस एकट्या केरळच्या आहेत. मातृभाषेतून ऑनलाईन प्रचारातून ‘इसिस’साठी पाठिंबा मिळवला गेला. उत्तर केरळमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या जास्त आहे. त्यांना ‘माप्पिला’ किंवा ‘मोपला’ असे म्हटले जाते. ‘इस्लामिक स्टेट’ला जाऊन मिळण्यासाठी गेलेले केरळचे सर्वाधिक तरुण माप्पिला मुस्लीम होते. या पार्श्वभूमीवर ‘पीएफआय’च्या कारवाया भावी काळातील संकटांची नांदी ठरू शकते.

‘इसिस’चे मुखपत्र ‘व्हॉईस ऑफ हिंद’ असून त्यात त्यांची भूमिका मांडली जाते. नोव्हेंबर २०२१ मध्ये यातील एका अंकाच्या मुखपृष्ठावर भगवान महादेवाच्या मोठ्या मूर्तीची मान छाटलेला फोटो प्रकाशित केला गेला. मानेच्या जागी ‘इसिस’चा काळा झेंडा रोवलेला दाखवला गेला. तसेच त्याखाली छपले होते, “इटस टाईम टू ब्रेक दि फॉल्स गॉडस.” हा महादेवाचा फोटो कर्नाटकच्या मुरुडेश्वर येथील असून संगणकीय तंत्रज्ञान वापरून त्याला विद्रूप केले होते आणि सोशल मीडियावर टाकले होते. इसिस-खुरासन प्रांत म्हणजेच अफगाणिस्तान, मध्य आशियातून सक्रिय असलेला हा गट असून त्यांनी याच मासिकाच्या मुखपृष्ठावर एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापला होता. या मासिकाने बाबरी पतनाचा बदला घेण्याची धमकी दिली होती. नागरिकत्त्व कायद्याच्या आणि ‘एनआरसी’च्या विरोधात सुद्धा अंक काढलेले होते. एकूणच भारतातील लोकशाहीला सुद्धा विरोध केलेला होता. उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथून दि. १९ ऑक्टोबर २०२२ ला भारतातील ‘व्हॉईस ऑफ हिंद’चे मॉड्युल - ‘व्हॉईस ऑफ खुरासन’ - हे राष्ट्रीय तपास यंत्रणेने उद्ध्वस्त केले. तसेच काही काळापूर्वी अगदी २०१६ मध्ये तर ‘इसिस’ने भारतातील नक्षलवादी संघटनांशी हातमिळवणी केली होती. त्यासाठी ‘जुनून-उल-खलिफा-फील हिंद’ ही संघटना काम करत होती, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हटले होते.

‘इसिस’ अनेक देशांत सक्रिय आहे. अनेक दहशतवादी कारवाया त्याच्याद्वारे चालू असतात. श्रीलंकेत दि. २१ एप्रिल २०१९ रोजी इस्टरच्या रविवारी तीन मोठे चर्च आणि तीन मोठे हॉटेल्स यावर आत्मघातकी हल्ले केले गेले होते. त्यात आठ दहशतवादी आणि एक महिला सामील होती. हल्ल्यानंतर जेव्हा पोलिसांनी एका घरावर छापा टाकला, तेव्हा फातिमा इब्राहिम या गर्भवती महिलेने घरातच बॉम्बस्फोट घडवून आणला. त्यात तिची तीन मुले आणि तीन पोलीस सगळे ठार झाले. ‘नॅशनल तोहित जमात’ या संघटनेने हे दहशतवादी हल्ले घडवले होते. नंतर त्याची जबाबदारी ‘इसिस’ने स्वीकारल्याचे वृत्त होते.
 
 
सद्यस्थिती

नुकतेच एप्रिल २०२३ मध्ये इराक-सीरिया येथे अमेरिकेच्या सैनिकांनी ‘इसिस’च्या काहींना ठार केले, तर काही जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त अमेरिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर आहे, तर नुकतेच दि. ५ मे रोजी बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे ‘इसिस’च्या सात संशयित दहशतवाद्यांना हल्ला करण्याच्या आधीच अटक केली गेली. त्यातील चार जण चेचन्याचे आहेत. जगभरात ‘इसिस’च्या कारवाया चालूच आहेत. काही स्वखुशीने, तर काही फसवणूक होऊन ‘इसिस’ला जाऊन मिळत आहेत.
एकूणच दहशतवाद हा आधी विचारधारा आणि नंतर प्रत्येक्ष कृतीत येतो. ही एक प्रक्रिया असते. ‘इसिस’वर बंदी घालणे म्हणजे त्याच्या कृतीवर बंदी घालणे आहे. पण, त्यांच्या हिंसक विचारधारेला थांबवण्यासाठी सुशिक्षित बुद्धिवादी आणि खरा इस्लाम जाणणारे युवक हवे आहेत. दहशतवादी संघटना आपला एक मोहरा बनवून वापर तर करून घेत नाही ना, याची जाणीव असणारा सजग युवकांचा प्रभाव वाढणे गरजेचे आहे.

सुदैवाने भारतीय संस्कृती आणि लोकशाही दृढ असून ‘इसिस’ला इथे कधीही पाठिंबा मिळणार नाही. अफगाणिस्तानचे ‘अल-कायदा’, तालिबान असो की इराक-सीरियाचे ‘इसिस’ असो भारतीय इस्लामिक जनता आपले वेगळेपण कायम जपून आहे. ‘मुस्लीम ब्रदरहूड’ ही संकल्पना जगभरात आकर्षक वाटत असली तरीही भारतीय समाज यासाठी हिंसेला कधीही स्वीकारणार नाही, हे वास्तव आहे....



-रुपाली कुळकर्णी-भुसारी

(लेखिका ‘एकता’ मासिकाच्या कार्यकारी संपादक आहेत.)


 
अग्रलेख
जरुर वाचा

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121