भारतीय विमान वाहतूक क्षेत्रासाठी मे महिन्याचा पहिला आठवडा ‘गो फर्स्ट’च्या दिवाळखोरीची वाईट बातमी घेऊन आला. आधी ‘गो एअर’ म्हणून ओळखल्या जाणार्या ‘गो फर्स्ट’ची सगळी उड्डाणे रद्द झाली आणि विमाने जमिनीवर स्थिरावली. खरंतर अशा प्रकारे विमान कंपन्यांनी दिवाळखोरी जाहीर करणे, विमान कंपन्याच बंद पडण्याचे प्रकार भारतात यापूर्वीही घडले आहेत. परंतु, त्या प्रत्येक प्रकरणातून खासगी विमान कंपन्या खरंच धडा घेतात का आणि घेतलाच तर मग अशी स्थिती का निर्माण होते, असे प्रश्न उपस्थित होतात. तेव्हा आजच्या या लेखात ‘गो फर्स्ट’ला दिवाळखोरी का जाहीर करावी लागली आणि यानिमित्ताने भारतीय विमान कंपन्यांना भेडसावणारी आव्हाने, यांचा सविस्तर उहापोह करणारा हा लेख...
१९९१-९२ पर्यंत म्हणजे भारताने अर्थव्यवस्था खुली करेपर्यंत भारतात प्रवासी वाहतूक करणार्या विमान कंपनीची मक्तेदारी होती व ही कंपनी सरकारी मालकीची होती. सरकारी मालकीची असलेली ‘एअर इंडिया’ची विमान परदेशात जात, तर तिची उपकंपनी असलेल्या ‘इंडियन एअर लाईन्स’ या कंपनीची विमाने देशांतर्गत प्रवाशांना सेवा पुरवित, असे भारताने अर्थव्यवस्था खुली केल्यानंतर व ‘मुक्त आकाश धोरण’ (ओपन स्काय पॉलिसी) स्वीकारल्यानंतर भारतात बर्याच खासगी प्रवासी वाहतूक करणार्या कंपन्या अस्तित्वात आल्या. त्या म्हणजे ‘सहारा एअरलाईन्स’, ‘दमनीया एअरवेज’, ‘मोदीलुफा’, ‘ईस्ट अॅण्ड वेस्ट’, ‘जेट एअरवेज’, ‘किंग फिशर’ वगैरे वगैरे. पण, यातील एकही कंपनी आता कार्यरत नसून या सर्व कंपन्या बंद पडल्या. त्यामुळे भारतात ‘मुक्त आकाश धोरण’ हवे तसे यशस्वी झाले नाही, हे मान्य करावे लागेल.
३० वर्षांत २७ कंपन्या बंद!
भारताने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारुन आता ३० वर्षे झाली. या कालावधीत सुरू झालेल्या प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांपैकी २७ कंपन्या बंद पडल्या. १९९४ मध्ये खासगी विमान कंपन्यांचा उदय होत गेला. या कंपन्यांनी वेगाने भारतीय आकाशात आपले स्थान निर्माण केले. ‘परवडणार्या दरातील विमानप्रवास’ ही संकल्पना याच काळातील. मात्र, यातील अनेक विमान कंपन्या अल्पजीवी ठरल्या. १९९४ पासून किमान २७ विमान कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला. नोव्हेंबर १९९६ मध्ये ‘ईस्ट वेस्ट ट्रॅव्हल्स अॅण्ड ट्रेड लिंक लिमिटेड’ ही कंपनी बंद पडली. या कंपनीच्या प्रमुखाचा खून झाला होता. याचवर्षी ‘मोदीलुफ्त’ ही कंपनी बंद पडली. १९९७ मध्ये ‘खेमका समूहा’ची ‘एनईपीसी मायकॉन लिमिटेड’ आणि ‘स्कायलाईन एनईपीसी लिमिटेड’ (पूर्वाश्रमीची) ‘दमानिया एअरवेज’ या कंपन्या बंद पडल्या. ‘दमानिया समूहा’ने मुंबई-गोवा सागरी प्रवासी वाहतुकीसाठी ‘कॅटेमरान शिप’ ही सुरू केली होती. ही कंपनीदेखील अल्पजीवी ठरली. २००० मध्ये ‘लुफ्तान्झा कार्गो इंडिया’ ही कंपनी बंद पडली. २००८ मध्ये ‘एअर डेक्कन’ ही कंपनी ‘किंग फिशर एअरलाईन्स’ने ताब्यात घेतील. पण, कालांतराने ‘किंग फिशर’ कंपनीच बंद पडली. ‘किंग फिशर’ कंपनीचा सर्वेसर्वा भारतीय कायद्यांना हुलकावणी देत परदेशात वास्तव्यास आहे. त्यानंतर ‘जॅगसन एअरलाईन्स’ही कंपनी बंद पडली. नंतर ‘एमडी एलआर एअरलाईन्स’ आर्थिक संकटात सापडली.
२०१० मध्ये ‘पॅरामाडन्ट एअरवेज,’ २०११ मध्ये ‘आर्यन कार्गो एक्सप्रेस,’ २०१२ मध्ये ‘किंग फिशर एअरलाईन्स’, २०१४ मध्ये ‘डेक्कन कार्गो अॅण्ड एक्सप्रेस लॉजिस्टिक’ अशा या कंपन्या एकामागून एक बंद पडल्या. २०१७ मध्ये ‘एअर कार्निव्हल’, ‘एअर पेगॅसस’, ‘रेलिगेअर एव्हिएशन,’ ‘एअर कोस्टा’ व ‘क्विक जेट कार्गो एअरलाईन्स’ या कंपन्या बंद पडल्या. २०१९ मध्ये ‘जेट लाईट’ (पूर्वीची सहारा एअरलाईन्स) कंपनीने कामकाज थांबविले. (सहाराचा सर्वेसर्वो कित्येक वर्षे जेलची हवा खाऊन आला.) दिवाळखोरीची प्रक्रिया झाल्यावर ‘जेट एअरवेज’ला ‘जालना काठरॉक कन्सोर्शियस’ हा नवा मालक मिळाला. २०२० मध्ये ‘जेक्सस एअर सर्व्हिसेस’ची ‘झूम एअर’, ‘डेक्कन चार्टर्ड प्रा.लिमि’ आणि ‘एअर ओडिशा प्रवासी’ या विमान वाहतूक करणार्या कंपन्या बंद पडल्या. २०२२ मध्ये हे ‘रिटेज एव्हिएशन प्रा.लि.मि’ ही कंपनी बंद पडली, तर २०२३ मध्ये ‘गो फर्स्ट’ आर्थिक संकटात आली. या कंपन्यांचे आर्थिक गणित न जुळल्यामुळे या कंपन्या अडचणीत आल्या व यामुळे या कंपन्यांनी ज्या बँकांकडून कर्जे घेतली होती, त्या बँका अडचणीत आल्या. त्याचे थकित/बुडित कर्जांचे प्रमाण वाढले. कित्येकांचे रोजगार जाऊन ते बेरोजगार झाले. गेल्या मंगळवारी वाडिया समूहाच्या ‘गो फर्स्ट’ने दिवाळखोरी जाहीर केल्यामुळे ‘गो फर्स्ट’ चे २५० कर्मचारी संकटात सापडले आहेत.
‘गो फर्स्ट’ ही वाडिया समूहाची कंपनी असून वाडिया हा मोठा उद्योग समूह आहे. ‘बॉम्बे डाईंग’, ‘ब्रिटानिया बिस्किट’ वगैरे वाडिया समूहाच्याच कंपन्या आहेत. दिवाळखोरीत निघालेल्या ‘गो फर्स्ट’चे मुंबईतील २५० हून अधिक कर्मचारी संकटात सापडले आहेत. यात जवळजवळ १२० वैज्ञानिक व इंजिनिअर यांचा समावेश आहे, तर ३० हून अधिक उड्डाणांचा हा लेख लिहिपर्यंत खोळंबा झाला आहे. ’गो फर्स्ट’चा मुख्य तळ मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. यात ५४ विमानांचा समावेश आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या असल्याने विमानसेवेच्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. ‘गो फर्स्ट’ची काही तिकिटे सर्व विमानसेवांमध्ये सर्वांत कमी होती. त्यामुळे अनेक पर्यटक प्रवाशांनी बुकिंग केलेले आहे. मात्र, त्यांना आता विमाने रद्द झाल्याचे एसएमएस येत आहेत. प्रामुख्याने मुंबई-दिल्ली, मुंबई-जम्मू, मुंबई-दिल्ली-लेह व मुंबई-श्रीनगर या विमानांचा समावेश आहे.
कर्मचार्यांची काळजी घेण्यास कटिबद्ध
सदोष इंजिनामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत असला तरी कर्मचार्यांचे हित जपण्यास व त्यांची काळजी घेण्यास कंपनी कटिबद्ध आहे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, अशी ग्वाही ‘गो फर्स्ट’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौशिक खोना यांनी गेल्या बुधवारी कर्मचार्यांना दिली. सध्याची परिस्थिती अत्यंत काळजीपूर्वक हाताळली जात असून, सर्व कर्मचार्यांची काळजी कंपनी घेईल, असे आश्वासनही खोना यांनी दिले. मागील १२ महिन्यांहून अधिक काळ कंपनीने ‘प्रॅट अॅण्ड व्हिट’ने या इंजिने पुरविण्याच्या कंपनीला अतिरिक्त इंजिने, पुर्नजुळणी झालेली इंजिने देण्याची वारंवार विनंती केली होती. परंतु, ‘प्रॅट अॅण्ड व्हिट’ने कंपनीने दाद दिली नाही. शेवटी ‘गो फर्स्ट’ने लवादाकडे धाव घेतली. या परिस्थितीत स्वत:हून दिवाळखोरी घोषित करण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय कंपनी व्यवस्थापनासमोर उरला नव्हता. भारतीय दिवाळखोरी प्रतिबंधक कायद्याच्या ‘कलम १०’ अंतर्गत अंतरिम साहाय्य मंजूर झाले की, कंपनी चांगल्या स्थितीत येईल, जेणेकरून कर्मचार्यांना दिलासा मिळेल, असाही आशावाद खोना यांनी व्यक्त केला.
इंजिने पुरविणार्या कंपनीची भूमिका
‘गो फर्स्ट’ या विमान कंपनीने गेल्या मंगळवारी स्वयंघोषित दिवाळखोरी जाहीर करताच ‘प्रॅट अॅण्ड व्हिट’ने कंपनीकडून पुरविण्यात आलेली इंजिने सदोष असल्याची टीका केली होती. हा आरोप गांभीर्याने घेत ‘प्रॅट अॅण्ड व्हिट’ने कंपनीने लवादाच्या निर्णयाचा मान ठेवून इंजिनांचा पुरवठा करायला प्राधान्य देत असल्याचे बुधवारी जाहीर केले.या सर्व प्रकरणाचा आढावा घेऊन ‘प्रॅट अॅण्ह व्हिट’ने कंपनीने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. कंपनी आपल्या सर्व विमान कंपन्यांच्या यशस्वितेसाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे या कंपन्यांना इंजिनांचा पुरवठा वेळेत करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. ‘गो फर्स्ट’संदर्भात लवादाच्या निर्णयाचा कंपनी मान ठेवत असून, सर्व प्रकारच्या पूर्तता केल्या जात आहेत. हे निवेदन आशावादी असून यातून ‘गो फर्स्ट’ दिवाळखोरीतून बाहेर येऊ शकेल. देशात ‘उडान’सारखी योजना केंद्र सरकार सर्वसामान्यांना विमान प्रवासाचा आनंद घेता यावा, यासाठी प्रयत्न करीत आहे. असे असताना छोट्या परवडणार्या दरांत नागरी विमान सेवा देणार्या खासगी कंपन्या कार्यरत राहणे गरजेचे आहे. आता भारतात सरकारी मालकीची एकही प्रवासी वाहतूक कंपनी नसून सर्व खासगी कंपन्याच आहेत.
आर्थिक संकटात सापडलेल्या व सरकारी मालकीच्या असलेल्या ‘एअर इंडिया’ची नाजूक झालेली आर्थिक स्थिती सावरण्यासाठी योग्य वेळी ही कंपनी ‘टाटा समूहा’ने ताब्यात घेऊन, केंद्र सरकारची आर्थिक पत राखली. ‘टाटा समूहा’ने ‘एअर इंडिया’ व ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ या दोन कंपन्या आपल्या ताब्यात घेतल्या. याशिवाय ‘टाटा समूहा’ची सिंगापूर येथील एका कंपनीसमवेत संयुक्त प्रकल्पात ‘एअर विस्तारा’ ही प्रवासी वाहतूक करणारी विमान कंपनी कार्यरत आहे.‘गो फर्स्ट’च्या दिवाळखोरीमुळे विमानांच्या तिकिटांचे दर वाढणार आहेत. ‘गो फर्स्ट’चे अगोदर नाव ‘गो एअर’ होते. दरम्यान, या परवडणार्या दरांत सेवा देणार्या नागरी विमान कंपनीने गेल्या मंगळवारी स्वत:हून दिवाळखोरी जाहीर केली. ‘गो फर्स्ट’ गेल्या १७ वर्षांपासून कार्यरत आहे. स्वयंघोषित दिवाळखोरी जाहीर केल्यानंतर या दिवाळखोरीचा अर्ज ‘गो फर्स्ट’ने राष्ट्रीय कंपनी विधी लवादा (एनसीएलटी)कडे केला आहे. यामध्ये ‘प्रॅट अॅण्ड व्हिट’ने या कंपनीने पुरविलेल्या इंजिनांच्या ‘गीअर्ड टर्बोफॅन’मध्ये सातत्याने दोष निर्माण होत राहिल्यामुळे कशा प्रकारे आर्थिक फटका बसला आहे, ते विस्ताराने नमूद केले आहे.
कंपनीच्या प्रवर्तकांनी (वाडिया उद्योग समूहाने) कंपनीमध्ये गेल्या तीन वर्षांत ३ हजार, २०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, यापैकी मागील दोन वर्षांत २ हजार, ४०० कोटी रुपये गुुंतविले गेले आहेत. यावर्षी एप्रिल महिन्यात २९० कोटी रुपये गुंतविण्यात आले. यमुळे १७ वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या या विमान कंपनीमध्ये प्रवर्तकांची एकूण गुंतवणूक ६ हजार, ५०० कोटी रुपयांची आहे. इंजिनांच्या अकार्यक्षमतेमुळे कंपनीला १०० टक्के कामकाज तोटा आणि अतिरिक्त खर्चापायी कंपनीला १० हजार, ८०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.ऐन सुट्टीच्या काळात विमानांचे आरक्षण करून निर्धास्त राहिल्या ‘गो फर्स्ट’च्या प्रवाशांना, या कंपनीने सर्वच उड्डाणे रद्द केल्यामुळे मोठा धक्का बसला. आर्थिक स्थिती सावरण्यासाठी केलेले प्रयत्न तोकडे पडल्याने आणि प्राथमिक भागविक्री (आयपीओ) आणण्याच्या तयारीत असताना, आर्थिक डोलारा सांभाळण्याची अधिकांश जबाबदारी प्रवर्तकांवर टाकल्याने ‘गो फर्स्ट’ या परवडणार्या दरांमध्ये नागरी विमानसेवा देणार्या कंपनीला ही दिवाळखोरी जाहीर करावी लागली. वाडिया समूहाने २००५ मध्ये ‘गो एअर’ या परवडणार्या दरांमध्ये विमानसेवा देणार्या कंपनीची सुरुवात केली. २०१७ मध्ये तिचे ‘गो एअर’ हे नाव बदलून, ‘गो फर्स्ट’ हे नाव केले. ‘गो एअर’ ही २०१३ पर्यंत देशातील पाचव्या क्रमाकांची नागरी विमान वाहतूक कंपनी होती. गेल्या सहा वर्षांत कंपनीची आर्थिक स्थिती खालावत गेली. ‘प्रॅट अॅण्ड व्हिट’ने ही कंपनी वेळेवर बिल चुकते करीत नाही, असे म्हटले आहे.
आता सर्व उड्डाणे अचानक रद्द केल्यामुळे, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) ‘गो फर्स्ट’ला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. ‘डीजीसीए’च्या नियमावलीनुसार, कोणतेही उड्डाण रद्द करण्यापूर्वी ठरलेल्या कालावधीत प्रवाशांना आणि ‘डीजीसीए’ला माहिती देणे गरजेचे असते. ‘गो फर्स्ट’ने यापैकी काहीही केले नसल्यामुळे, ‘डीजीसीए’नेही ही बाब नियमांची पूर्तता न करणे, या अंतर्गत नोंदवली आहे. या संदर्भात कंपनीवर कारवाई का करू नये, असा प्रश्न विचारला आहे.विमान कंपनी चालविण्यासाठी प्रवर्तकांची खंबीर साथ आवश्यक असते. त्याचप्रमाणे भांडवल बाजारात उतरुन गुंतवणूकदारांचा विश्वास कमावणेही आवश्यक असते. ‘परवडणार्या दरात विमासेवा देतो,’ असे सांगून लोकप्रियता मिळविण्याच्या मोहात दैनंदिन, नैमित्तिक व अनिवार्य या तीन प्रकाराच्या खर्चांसाठी योग्य तरतूद करण्यात अपयश आल्यास काय होते, याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘गो फर्स्ट.’ मुंबई-सिंधुदुर्ग (विमानतळ - चिपी) सेवा देणारी ‘अलायन्स एअरलाईन्स’ ही एकमेव कंपनी असून, या कंपनीची सेवा पूर्णत: निकृष्ट आहे. विमाने कधी वेळेवर सुटत नाहीत.
बर्याच वेळा रद्दही केली जातात. दिवसातून चिपीला मुंबईहून एकच विमान जाते व परत येते बर्याच वेळा हे रद्द केले जातात. परिणामी, प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे ‘गो फर्स्ट’नंतर ‘अलायन्स एअरलाईन्स’ जर आर्थिक अडचणीत आली, तर सिंधुदुर्ग येेथे विमानाने जाणारे अनिहीतच होतील.चिपी विमानतळावरून काही अंतरावर गोवा राज्यातील मोपा (महाराष्ट्राच्या सीमेवर) येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास देणारी विमानसेवा सुरू ठेवण्यापेक्षा हा विमानतळच बंद करावा, असे काहींचे मत आहे. कारण, सिंधुदुर्गवासीयांना ‘मोपा’ विमानतळ सोयीस्कर होऊ शकेल किंवा मुंबई-चिपी-मोपा अशी विमानसेवा सुरू करावी. भारतात विमानाने प्रवास करणार्यांची कमतरता नसून, दर्जेदार विमानसेवा मिळण्याची कमतरता आहे. भारतातील विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे होत आहेत. मुंबई विमानतळ तर जगातील एक सर्वोकृष्ट विमानतळ आहे. तसा विमान प्रवासही उच्च दर्जेदार व्हावायस हवा, हीच अपेक्षा.