सत्तेचा सोपान दूरच!

    31-May-2023   
Total Views |
Swarajya Sanghatana Sambhaji Raje

राजकारणात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला राजकीय महत्त्वाकांक्षा असण्यात काही गैर नाहीच. किंबहुना, राजकीय महत्त्वाकांक्षा नसलेल्या नेत्यांविषयी कधी फारशी चर्चाही होत नसते आणि त्यांची कुणी दखलही घेत नाही. परंतु, अतिमहत्त्वाकांक्षा असलेल्या नेत्यांनाही फारसं कुणी गांभीर्याने घेत नाही. धर्मकर्म संयोगाने एखादे पद मिळण्यापलीकडे या मंडळींना काही मिळत नाही आणि काही न मिळण्याच्या वैफल्यातून मग ते उलटसुलट राजकीय गणिते जुळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. अशीच काहीशी स्थिती माजी खासदार आणि ‘स्वराज्य’ संघटनेचे सर्वेसर्वा संभाजी छत्रपती यांची. आधी २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोल्हापूर लोकसभेची निवडणूक लढवलेल्या संभाजीराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने राज्यसभेची खासदारी देऊ केल्यावर संभाजीराजेंनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांचे कौतुक करायला सुरुवात केली. मात्र, कायम गोंधळलेल्या आणि कुठल्याही भूमिकेवर ठाम न राहण्याचा इतिहास असलेल्या संभाजीराजेंनी काही काळानंतर भाजपवर टीका करायला सुरुवात केली. खासदारकीची पुढची टर्म मिळणार नाही, हे लक्षात आल्यावर गेल्यावर्षी संभाजीराजेंनी राज्यसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांकडे पाठिंबाही मागितला. मात्र, त्यांच्या धरसोड वृत्ती आणि कुठल्याही एका पक्षाशी जुळवून न घेण्याच्या भूमिकेमुळे, छत्रपतींचा वारसा असलेले संभाजीराजे एकाकी पडले आणि सरतेशेवटी त्यांच्यावर माघार घेण्याची नामुष्की ओढवली. आता त्यांनी ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना केली असून, २०२४ मध्ये होणार्‍या सगळ्या निवडणुका लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात त्यांनी पक्षाचे मुख्य कार्यालयही नुकतेच उघडले असून, राज्यभरात संघटनेचे जाळे विणण्याचे मनसुबे आखले आहेत. मराठा आरक्षणामुळे पाठीशी असलेला थोडासा जनाधार आणि छत्रपतींचे वारस ही दोन बलस्थाने सोडता, संभाजीराजेंकडे कुठलाही मुद्दा नाही. मुळातच लोकांमधून जिंकायच्या निवडणुकांचा शष्प अनुभव पाठीशी नसलेले संभाजीराजे वर्षभरात संघटना बांधून संघटनेला सत्तेच्या सोपानापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होतील का? हा प्रश्न संभाजीराजे यांनी स्वतःलाविचारणे क्रमप्राप्त ठरते.

नामकरणाचा ‘मास्टरस्ट्रोक’!

राज्यातील फडणवीस-शिंदे सरकारतर्फे धनगर समाजाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची घोषणा काल करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘अहिल्यादेवी नगर’ असे करणार असल्याचे फडणवीस-शिंदेंकडून अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी चौंडी येथे पार पडलेल्या विराट कार्यक्रमात जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षांची मागणी पूर्णत्वास आल्यामुळे धनगर समाजात आनंदाचे वातावरण निार्मण झाले आहे. राज्यातील धनगर समाजाचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला आरक्षण प्रश्न कायदेशीर बाबींमध्ये अडकला असून, त्यावर कधी तोडगा निघेल, ते पाहावे लागले. या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना युतीने लक्षावधी धनगर बांधवांची अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराची जुनी मागणी एका फटक्यात मंजूर केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडीत अहिल्यादेवींच्या जयंतीच्या औचित्यावर जाहीर करण्यात आलेला हा निर्णय येत्या काळातील राजकीय समीकरणे बदलण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावणार हे नक्की. अहमदनगर, पुणे, बारामती, माढा आणि सोलापूरसह लगतच्या भागात धनगर मतांचे प्राबल्य पाहता, या भागात ताकदवान असलेल्या भाजपला या निर्णयामुळे मोठा फायदा होऊ शकतो. धनगर समाजाची निर्णायक मते, सुप्रिया सुळेंच्या बारामती लोकसभेसह पवारांनी प्रतिनिधित्व केलेल्या माढ्यातही परिणामकारक ठरतात, हा इतिहास आहे. वर्षानुवर्षे सत्तेत असूनही धनगर समाजाला पुरेसे राजकीय प्रतिनिधित्व आणि आवश्यक असलेले आरक्षण देण्यात कुचराई केल्याच्या आरोपामुळे पवारांवर धनगर समाजाची प्रचंड नाराजी होती आणि ती आजही कायम आहे. रोहित पवार प्रतिनिधित्व करत असलेल्या कर्जत-जामखेडच्या भूमीत हा निर्णय जाहीर झाल्याने त्याचा फायदा युतीला आणि फटका पवारांना बसणार, यात शंका नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी केलेली ही घोषणा ‘मास्टरस्ट्रोक’ ठरणार आणि त्याचे दूरगामी परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार, हे निश्चित!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.