नाट्य ‘प्रमोद’

    31-May-2023   
Total Views |
Article On Pramod Vitthal Shelar

नुकतेच व्यावसायिक राज्यनाट्य स्पर्धेत विजयी ठरलेल्या ‘सफरचंद’ या नाटकात अभिनय करणार्‍या आणि प्रायोगिक नाटकासाठी झटणार्‍या अवलिया प्रमोद शेलार यांचा जीवनप्रवास उलगडणारा हा लेख...

प्रमोद विठ्ठल शेलार यांचा जन्म मुंबईतील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे मूळ गाव सांगवे, ता. संगमेश्वर. त्यांची आई शाळांना घरगुती खाद्यपदार्थ पुरवायची, तर वडील नट्स आणि बोल्ड बनणार्‍या ग्राईंडर मशीनवर काम करायचे. तसेच, मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रॅाजेक्टरवर फिल्म दाखवणे, साऊंड सिस्टम भाड्याने देण्याचे कामही शेलार यांचे वडील करत. घरात फिल्मच्या अनेक रिल्स असल्याने चित्रपट पाहणे आणि चित्रपटातील गाणी पाठांतर करणे हा प्रमोद यांचा लहानपणीचा आवडता छंद. त्यामुळेच पुढील काळात ते नाटक, चित्रपटांकडे ओढले गेले. प्रमोद यांचे प्राथमिक शिक्षण पालिकेच्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण एन. डी. भुता हायस्कूलमधून झाले.

त्यानंतर चिनाई कॅालेजमधून शेलार यांनी वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ‘जेसी कॉलेज ऑफ लॉ’मध्ये वकिलीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला. पण, नाटकाच्या आवडीने त्यांनी दोन वर्षांतच वकिलीच्या अभ्यासक्रमाला रामराम ठोकला. त्यानंतर ‘कम्प्युटर प्रोग्रामिंग’चे शिक्षण घेऊन एक वर्ष नोकरी केली. पण, शेवटी नाटकवेडापायी कुटुंबाची कुठलीच पार्श्वभूमी नसताना, घरच्यांचा विरोध पत्करत प्रमोद नाट्यकलेत सक्रिय झाले. मधल्या काळात त्यांच्या वडिलांचा व्यवसाय आणि कामही ठप्प झाले. त्यावेळीही घरच्यांनी नोकरीचा प्रस्ताव प्रमोद यांच्यापुढे ठेवला.पण, नाटकाचं जादूई जग त्यांना खुणावत असल्याने त्यांनी नोकरीला साफ नकार दिला.

१९८८ साली कनिष्ठ महाविद्यालयात असतानाच सगीर अहमद चौधरी या गुरूमित्राने प्रमोद यांना यांना नाटकाची खरी ओळख करून दिली. त्यानंतर संदीप सावंत, विठ्ठल जाधव, प्रकाश बुद्धीसागर, सव्यसाची देब बर्मन या गुरूवर्यांकडून प्रमोद यांनी यांनी अभिनयाचे धडे घेतले. शाळेत असताना शालेय स्पर्धांसाठी एक शिक्षिका नाटक बसवत होत्या. त्यावेळी सहज प्रमोद त्या नाटकाच्या तालमीत सहभागी झाले. पण, पुढे जाऊन याच नाटकाच्या तालमीतून एक कसलेला अभिनेता तयार होईल, याची कल्पना त्यावेळी कुणालाच नव्हती. महाविद्यालयात असताना १९९१ साली ‘चाणक्य’ मालिकेतून प्रमोद यांनी टीव्ही जगतात पाऊल टाकले. त्यानंतर १९९३ साली त्यांनी चिनाई महाविद्यालयातून एकांकिका दिग्दर्शित करायला सुरुवात केली. त्यानंतर ’ऑल द बेस्ट’ या नाटकाचे ५०० प्रयोग त्यांनी केले. तसेच, १९९७ साली ’बॅाम्बे मेरी जान’ हे पहिलं व्यावसायिक नाटकही त्यांनी दिग्दर्शित केले.

प्रमोद शेलार हे १९९३ पासून जवळजवळ २०१२ पर्यंत आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते. त्या कालावधीत २०० हून अधिक एकांकिका त्यांनी दिग्दर्शित केल्या. साठे महाविद्यालय, डहाणूकर महाविद्यालय, पोदार महाविद्यालय, सीकेटी कॉलेज, एन. एम कॉलेज या मुंबईतील प्रतिष्ठित महाविद्यालयांसह मुंबई विद्यापीठ तसेच भवानीपूर कॉलेज, कोलकाता अशा महाविद्यालयांत ही त्यांनी दिग्दर्शकाची भूमिका बजावली. त्यावेळी ‘आयएनटी’, ‘ईप्टा’सारख्या अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये त्यांना परितोषिके मिळाली. आज चिपळूण, दापोली येथील महाविद्यालयातील शेलार यांचे अनेक विद्यार्थी मालिका, चित्रपटांत दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. त्यामुळेच गावखेड्यांत जाऊन नाट्य चळवळ जीवंत ठेवणार्‍यांमध्ये प्रमोद शेलार हे नाव आदराने घेतले जाते.

मात्र, २०१२ नंतर शेलार यांनी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये दिग्दर्शन करणे सोडून दिले आणि प्रायोगिक नाटकात तसेच हौशी राज्यनाट्य स्पर्धांमध्ये दिग्दर्शक, अभिनेता म्हणून काम करायला सुरुवात केली. हौशी राज्यनाट्य स्पर्धांमध्ये सहावेळा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून परितोषिक त्यांना मिळाले आहे. तसेच, त्यांनी दिग्दर्शित आणि अभिनित ’भेटी लागे जीवा’ या व्यावसायिक नाटकाला ‘झी गौरव’ पुरस्करात साहाय्यक अभिनेता म्हणून नामांकन मिळाले होते. ‘महानदीच्या तीरावर’, ‘शमिताभ’, ‘हेमोलिम्फ’ या चित्रपटात अभिनेता म्हणून तसेच ‘पिकोलो’ आणि ‘तालुका मावळ’ या चित्रपटाचे कथा लेखक म्हणून शेलारांनी काम केले आहे. तसेच, नऊ देशांच्या ‘सार्क फेस्टिवल’मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेली ’दस्तक’ या एकांकिकेने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

‘दार उघड बये’, ‘आस्था’, ‘साहारा’, ‘सीआयडी’ या मालिकेत अभिनयही शेलार यांनी केला. तसेच, नुकतेच व्यावसायिक राज्यनाट्य स्पर्धेत विजयी ठरलेल्या ’सफरचंद’ नाटकात शेलार अभिनय करत आहेत.त्याचबरोबर त्यांनी लिहिलेले ’शुद्धता गॅरेंटेड’ हे नाटकदेखील रंगभूमीवर गाजत आहे. गेली ३५ वर्षं शेलार हिंदी, उर्दू, इंग्रजी आणि गुजराती नाटकांत अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. त्यामुळेच प्रायोगिक रंगभूमीवरील उत्कृष्ट कामासाठी शेलार यांना कलाश्रम आणि नाट्य परिषद, बोरिवली शाखेचा पुरस्कारदेखील मिळाला आहे. त्यामुळे “कला क्षेत्रात येणार्‍यांनी स्पर्धेत टिकून राहिले पाहिजे. त्यासाठी स्वतःवर मेहनत घेतली पाहिजे,” असे शेलार सांगतात. विशेष म्हणजे, भारतातील पहिलं ‘डिजिटल’ नाटकदेखील २०१६ साली शेलार यांनी दिग्दर्शित केले होते. त्यात लाईव्ह कलाकार आणि व्हर्च्युअल प्रक्षेक अशी सांगड त्यांनी घातली होती. पण, काही कारणामुळे बंद पडलेले हेच नाटक नव्याने रंगभूमीवर आणण्याचा शेलार यांचा मानस आहे. तरी त्यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुप्रिम मस्कर

इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. सध्या साठ्ये महाविद्यालयात 'एमएसीजे'च्या प्रथम वर्षात शिकत आहेत. मुंबई विद्यापीठातून 'लोककला' या विषयात पदविका पूर्ण केली आहे. वक्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धांमध्ये अनेक परितोषिके प्राप्त.