अनिल परब १०० नव्हे हजार कोटींचा दावा दाखल करा! कारवाई होणारच! : किरीट सोमय्यांचा दावा
29-May-2023
Total Views | 149
मुंबई : "अनिल परबांनी १०० कोटी सोडा १००० कोटींचा दावा केला तरी कारवाई होणारच", असा दावा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर साई रिसॉर्ट घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल करत त्यांची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात अनिल परबांना जामीन देण्यात आला होता तर त्यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक करण्यात आली असून ते अद्यापही जेलमध्ये आहेत. किरीट सोमय्यांनी म्हटले की, साई रिसॉर्ट प्रकरणी कारवाई थांबविण्याकरिताच अनिल परबांनी कोर्टात याचिका दाखल केली. ईडी, आयकर विभागाने त्यांच्या मालमत्तांवर यापूर्वीच कारवाई केली आहे, असेही सोमय्या म्हणाले.
दरम्यान, अनिल परबांनी केलेल्या टीकेला भाजप नेते किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. " साई रिसॉर्ट घोटाळ्याप्रकरणी कोणतीही माघार घेण्याची किंवा माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तर स्वतः वरील आणि सदानंद कदम यांच्यावरील कारवाई थांबविण्यासाठीच त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. अनिल परबांवर सध्या आयकर विभाग, बेनामी संपत्ती, अनधिकृत बांधकाम, भ्रष्टाचाराप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे सोमय्या म्हणाले. आणि त्यावरील कारवाई होतच राहील, त्यामुळे अनिल परबांनी हजारो कोटींचे दावे केली तरीही कारवाई ही होणारच, असा दावा सोमय्यांनी यावेळी केला.
दरम्यान, राष्ट्रीय हरित लवादाकडे भाजप नेते किरीट सोमय्यांनी साई रिसॉर्ट अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठीची याचिका दाखल केली होती. हा रिसॉर्ट बेकायदेशीर असून त्याचे बांधकाम तोडण्याचे आदेश केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने दिले होते त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने याच्या सुनावणीची गरज नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर या मुद्दयावर उच्च न्यायालयात पुढच्या महिन्यात सुनावणी होणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले.