सावध ऐका पुढल्या हाका...

    29-May-2023
Total Views | 177
Editorial on Muslim islam in japan

नुकताच जपानमधील एका मंदिरात अल्ला हा एकमेव ईश्वर असल्याचा दावा करीत एका धर्मांधाने अक्षरश: धुडगूस घातला. यानिमित्ताने पुन्हा एकदा जपानसारख्या प्राचीन संस्कृती-परंपरा अद्याप जोपासणार्‍या देशातही इस्लामी कट्टरपंथीयांनी शिरकाव केल्याचे अधोरेखित होते. त्यामुळे युरोपीय देशांप्रमाणे आता जपानमधील वाढते इस्लामीकरण हा चिंतेचा विषय ठरला असून, हे धोक्याचे संकेत जपानसह बिगर-मुस्लीम देशांनी वेळीच ओळखण्याची गरज आहे.

समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ ‘व्हायरल’ होत असून, त्यात एक व्यक्ती पूजास्थळाची तोडफोड करताना दिसून येते. हा व्हिडिओ जपानमधील कोबे शहरातील तारुमी वॉर्डमधील आहे. जिथे मामाडो बाल्डे याने मिझुओका हाचिमन मंदिराची तोडफोड केली. बाल्डे हा मूळचा पश्चिम गांबिया प्रजासत्ताकमधील मुस्लीमधर्मीय असून, तो जपानमध्ये स्थलांतरित झाला. पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून, त्याने मंदिरातील दानपेटीही फोडली होती. अल्ला हा एकमेव ईश्वर असल्याचा दावा करणार्‍या एका मुस्लिमाला मंदिरात नमाज पढू न दिल्याने त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले. शिंतो तीर्थे ही उपासनेसाठीची पवित्र ठिकाणे मानली जातात. तसेच, शिंतो देवतांची ‘कामी’ ही निवासस्थाने असल्याचे मानले जाते.

‘कामी’चे प्रतिनिधित्व करणारे पवित्र लेख मंदिरातील सर्वांत आतल्या दालनात ठेवलेले असतात. ते कोणालाही सहज दिसू शकणार नाही, अशा ठिकाणी जतन केलेले असतात. धर्मांध बाल्डे याने यावेळी अन्य एका महिला भाविकालाही धमकावले असल्याचे अन्य एका व्हिडिओतही दिसून येते. इस्लाममध्ये अल्ला हा एकमेव ईश्नर आहे. त्यामुळे येथे कोणतीही प्रार्थना करू नका, असे सांगताना बाल्डे दिसून येतो. चयावर मंदिराचे मुख्य पुजारी मिझुओका हाचिमन श्राईन म्हणतात, “हा सर्व प्रकार निराशाजनक आहे, इतकेच मी सांगू शकतो.” यानिमित्ताने पुन्हा एकदा जपानमधील वाढत्या इस्लामीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

मे २०२२ नुसार जपानची लोकसंख्या १२.५ दशलक्ष इतकी आहे. येथील तरुण विवाह करण्याऐवजी नोकरी-व्यवसायाकडे अधिक लक्ष देत असल्याने, जपानची लोकसंख्या न्यून होत आहे. भविष्यात जपानमध्ये युवकांच्या संख्येत घट होण्याची भीती असल्याने तेथील सरकार विदेशी कामगार तसेच विद्यार्थी यांना तेथे येण्यासाठी आकर्षित करत आहे. याच स्थितीचा लाभ उठवत विदेशी मुस्लीम नागरिक तसेच विद्यार्थी जपानमध्ये पोहोचले असून, ते चक्क स्थानिकांच्या धर्मांतराचा प्रयत्न करत आहेत. अन्य देशांमधील मुलींना तेथे आणून त्यांना तेथे वसवण्यासाठीही ते प्रयत्नशील दिसतात. ‘बीप्पू मुस्लीम असोसिएशन’चे प्रमुख अब्बास खान यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. मूळचे पाकिस्तानमधील अब्बास खान हे २००१ मध्ये विद्यार्थी म्हणून सर्वप्रथम जपानमध्ये आले आणि आता ते तेथे इस्लामचा प्रसार करत आहेत.

मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे स्थानिक जपानी बौद्ध नागरिकांमध्ये मात्र संतप्त पडसाद उमटले आहेत. स्थानिक बौद्ध बांधवांकडून मुस्लिमांना मदरसे तसेच दफनभूमी देण्यासही विरोध केला जातो. विदेशी नागरिकांना काम करण्याची तसेच राहण्याची परवानगी दिली पाहिजे, असा मतप्रवाह असला तरी स्थानिक जपानी संस्कृतीचा सन्मान त्यांनी केलाच पाहिजे, अशी तेथील नागरिकांची भावना. तेव्हा असा हा चिमुकला जपान देश सध्या दुहेरी संकटाशी झुंजत आहे. एकीकडे लोकसंख्येतील घट आणि दुसरीकडे रोडावलेला जन्मदर. त्यात आता जपानमध्ये मोठ्या प्रमाणात होणारा धर्मांतराचा विषयही चिंतेचा ठरला आहे. जपानमध्ये नागरिकांच्या धर्मानुसार नोंदी ठेवल्या जात नसल्याने, तेथील मुस्लिमांची नेमकी संख्या किती आहे, या प्रश्नाचे उत्तर मिळणे अवघड होते. तथापि, एका अंदाजानुसार, जपानमधील ९० टक्के मुस्लीम बाहेरचे आहेत. मूळ जपानी मुस्लीम फक्त दहा टक्के आहेत. यामध्येही मोठ्या संख्येने जपानी महिला आहेत.

ज्यांनी परदेशी मुस्लिमांशी लग्न करून इस्लामचा स्वीकार केला. जपानमध्ये राहणार्‍या मुस्लिमांमध्ये इंडोनेशियन मुस्लिमांची संख्या सर्वाधिक. त्यानंतर बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुस्लीम आहेत. जपानमध्ये मुस्लिमांचे आगमन १८ व्या शतकात झाले असल्याचे मानले जाते. परंतु, मागील दशकात मुस्लिमांची लोकसंख्या जपानमध्ये दुप्पट झाल्याचा दावा एका संकेतस्थळाने केला आहे. त्यानुसार २०१० मध्ये जपानमधील मुस्लिमांची संख्या केवळ एक लाख दहा इतकी होती, ती आता २ लाख, ३० हजार इतकी झाली आहे. १९८२ मध्ये जपानमध्ये केवळ ३० हजार इतकेच मुस्लीम होते. दोन दशकांहून अधिक काळ मुस्लीम आणि जपानी नागरिक आणि जपानी धर्मांतरितांच्या विवाहांमध्ये वाढ झाल्याने पर्यायी तेथील मुस्लीम लोकसंख्याही वाढीस लागली. जपानमध्ये ६० ते ८० एकल मजली मशिदी असून, जवळपास १०० सदनिकांमध्ये तसेच घरांमध्ये सामूहिक नमाज अदा केला जातो.

एकटा जपानच नव्हे, तर जगभरात इस्लामच्या अनुयायांची संख्या वाढत असून, एका वृत्तानुसार इंग्लंडमध्ये गेल्या दहा वर्षांत मुस्लिमांची संख्या तब्बल ४४ टक्के इतकी वाढली आहे. आता तिथे मुस्लिमांची लोकसंख्या ६.५ टक्के इतकी झाली आहे. युरोपातील अन्य देशांतही मुस्लिमांची संख्या वाढलेली दिसते. युरोप खंडात सर्वत्र इस्लामने हातपाय पसरले आहेत. शरणार्थी म्हणून आलेले धर्मांध मुस्लीम आता युरोपात राजरोसपणे हिंसाचारात सहभागी दिसतात. धार्मिक दहशतवाद तिथे बोकाळला आहे. फ्रान्समध्ये त्याचा अनुभव तेथील जनतेने घेतला. या पार्श्वभूमीवर भारतीयांनीही काळजी घेण्याची गरज अधोरेखित होते. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, २०५० पर्यंत जगातील सर्वाधिक मुस्लीम भारतात असतील. हिंदू समुदाय जगात तिसर्‍या क्रमांकावर असेल. एकूण १.४ अब्ज (१४.९ टक्के) हिंदू असतील, तर ख्रिश्चन धर्मीय २.९ अब्ज (३१ टक्के) जगातील सर्वांत मोठा धर्म असेल, तर मुस्लीम त्याहून केवळ एक टक्का इतकेच कमी म्हणजेच २.८ अब्ज असतील. लोकसंख्यावाढीचा हाच दर कायम राहिल्यास २०७० मध्ये ख्रिस्ती धर्माला मागे टाकून मुस्लीम धर्म जगातील सर्वात मोठा धर्म ठरेल, असा तर्कही यातून समोर आला आहे.

तसेच भारताला २०४७ पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे ‘पीएफआय’चे जिहादी मनसुबे समोर आले आहेतच. तेव्हा, इस्लामीकरणाचा हा वाढता वेग नियंत्रित करण्याची गरज म्हणून दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसते. जगभरातील सर्वेक्षणांचे आकडेही तेच सांगत आहेत. भारतात समान नागरी कायदा राबवण्याची गरज का आहे, याचे उत्तर या प्रश्नातच दडले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121