स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात प्रथमच साजरी झाली सावरकर जयंती
28-May-2023
Total Views | 58
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त होते, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन महाराष्ट्र सदनात प्रथमच आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती कार्यक्रमात काढले. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती पहिल्यांदाच महाराष्ट्र सदन येथे साजरी होत आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची, गौरवाची तसेच आनंदाची बाब आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान व त्याग आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे साहित्यिक तसेच समाजसुधारक होते.
त्यांचे तैलचित्र संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत आहे, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. या नवीन वास्तूच्या माध्यमातून लोकशाही अधिक बळकट व वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.