मराठमोळ्या उद्योजकाचा ‘अरुणोदय’

    28-May-2023   
Total Views |
Article On Entrepreneur Arun Sawant

कुटुंबीयांचे पाठबळ आणि प्रामाणिकपणा यांच्या जोरावर उद्योजक अरुण सावंत या मराठी माणसाने व्यवसायात पाऊल टाकले. खरंतर त्यांच्या कुटुंबात कोणतीच उद्योजकतेची पाश्वर्र्भूमी नव्हती. पण, तरीही त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांच्या व्यवसायाचा वारसा त्यांची दोन्ही मुले आज सक्षमतेने पुढे घेऊन जात आहे त्यांचे समाधान अरुण यांच्या चेहर्‍यावर दिसते. या यशस्वी उद्योजकांच्या वाटचालीविषयी जाणून घेऊया.

अरुण सावंत यांचे बालपण हे मुंबईत गेले. त्यांचे वडील पोलीस असल्याने त्यांची सातत्याने बदली होत असे. त्यामुळे अरुण यांचे बालपणही वेगवेगळ्या ठिकाणी गेले. त्यांनी ‘बी.कॉम’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ नोकरी केली. पण, नोकरीत त्यांचे मन रमत नव्हते. त्यांनी एक टेम्पो विकत घेतला. त्या टेम्पोने त्यांना १८ वर्षांपर्यंत साथ दिली. टेम्पो चालवित असताना शिक्षणाची साथ असल्याने त्यांनी ‘केमिकल टेड्रिंग’ व्यवसाय आत्मसात केला. १९८६ नंतर त्यांचे व्यवसायातील एक एक पाऊल यशस्वीपणे पडत होते. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. १९९३ मध्ये ‘एमआयडीसी’मध्ये अंबरनाथला प्लॉट त्यांनी विकत घेतला. दि. १३ मे, १९९६ ला त्यांनी ‘अमोनिया’ची कंपनी सुरू केली. त्यावेळी अरुण यांना त्यांचे मोठे बंधू भाऊ महादेव सावंत व मित्र नंदकुमार यांची खूप मोलाची साथ लाभली.

मुख्यत: विजय नायर यांचे ही मोलाचे सहकार्य मिळाले. अरुण यांना आशिष आणि यज्ञेश ही दोन मुले आहेत. त्यांची दोन्ही मुले त्यांच्याच व्यवसायाचा वारसा तेवढ्याच सक्षमतेने पुढे नेत आहेत. अरुण यांची दोन्ही मुले मदतीला येईपर्यंत त्यांनी दोन कंपन्याची उभारणी केली. आशिषने २००६ मध्ये तर यज्ञेशने २००८ साली कंपनी जॉईन केली. वडिलांच्या आदर्शावर पाऊल ठेवत त्यांनी उभ्या केलेल्या व्यवसायाची धुरा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न अरुण यांची दोन्ही मुले करीत आहेत. अरुण यांचा मोठा मुलगा आशिष यांनी केमिकल इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा व एक्सपोर्टमध्ये कोर्स करून केळकर महाविद्यालयामधून ‘एम.बीए’ केले आहे व लहान मुलगा यज्ञेश सावंत याने ‘बी.सी.ए’ नंतर ‘एम.बीए’ केले. तसेच कंपनी जाईंन केल्यानंतर त्यांनी व्यवसायाशी संबंधित अनेक अभ्यासक्रमदेखील केले आहेत.

अरुण यांचा मूळ स्वभाव हा शांत आहे. त्यामुळे त्यांचा कोणाशीच वाद नाही. त्यांचे काम करण्याचे वेळापत्रक ही ठरलेले असते. त्याप्रमाणे सायंकाळी ७ वाजता ते घरी येतात. आजपर्यंत कधी ही देणेकरी त्यांच्या दाराशी आल्याचे आठवत नाही. शून्यातून विश्व निर्माण करीत अरुण यांनी दोन कंपन्या स्थापन केल्या. अरुण आणि त्यांची मुले यांच्या एकदम मैत्रीचे संबंध आहेत. त्यांनी मुलांना व्यवहार करण्यासाठी पूर्णपणे मोकळीक दिली आहे. मुलांच्या व्यवहारात ते कुठलीही ढवळाढवळ करीत नाही. अरुण यांच्या पत्नी अश्विनी यांचा स्वभाव व्यवहारी असल्याने कुठेही निर्थक खर्च नाही. स्वत:चे स्टेट्स सांभाळण्यासाठी निरर्थक खर्च ही नाही. पण कोणालाही मदत करण्यासाठी त्या नेहमीच तत्पर असतात.

विजय नायर व त्यांचे मॅनेजर यांनी २७ वर्षे अत्यंत मेहनतीने इमानदारीने कंपनीसाठी स्वत:ला झोकून देऊन काम केले आहे. त्याचबरोबर संजय यादव, भगवान पाटील, दीपक सावंत, नागेश सावंत, मच्छींद्र गोसावे, राजेश बोराडे, चालक सुभाष भोर यांनीदेखील कंपनीसाठी परिश्रम घेतले. अरुण यांच्या कंपनीत एकत्रित जवळपास १५० कर्मचारी आहेत. हे कर्मचारीच त्यांच्या कंपनीचे प्रमुख घटक आहेत, असे अरुण अभिमानाने सांगतात.  अरुण यांनी रियल इस्टेट आणि बांधकाम व्यवसायामध्येदेखील आपले पाऊल टाकले आहे. त्यासाठी मुख्यत्वे संतोष कदम, उमेश जयस्वाल, राहुल जाधव, मयूर पाटील, सागर कांबळे, मधुरा, अमिता शर्मा, सुजाता दळवी, लक्ष्मी नायर व सर्व स्टाफ यांचे सहकार्य लाभत आहे. अरुण आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे कंपनीकडे बारकाईने लक्ष असते.

एवढेच नव्हे, तर ते कंपनीतील कर्मचारी व त्यांच्या परिवारातील सुखदुःख याकडेही बारकाईने लक्ष देत असतात. त्यांच्या दोन्ही कंपनी जरी लहान असल्या तरी आपल्या स्टाफची ते काळजी घेत असतात. दोन्ही कंपनीतील सर्व स्टाफला एक वेळचे जेवण आणि सायंकाळाचा अल्पोपहार कंपनीमध्येच दिला जातो. अरुण यांनी ‘कोविड’ काळात वैद्यकीय सेवा क्षेत्रात ही पाऊल टाकले आहे. अंबरनाथ येथे त्यांचे विजय मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आहे. हे रुग्णालय त्यांची सून डॉ. अश्विनी सांभाळत आहे. रुग्णालयातील रुग्णांनाही ते फळांचे वाटप करीत असतात.

‘कोविड’ काळात रुग्णांसाठी त्यांनी दिलेला मदतीचा हात हा सर्वांनाच आठवणीत राहण्यासारखा आहे. अरुण हे कोणालाही मदत करायला कधीही मागे पुढे बघत नाही. अंबरनाथ ‘एमआयडीसी’कडे जाताना रस्त्यावर एक खड्डा पडला होता. त्यांचा वाहनचालकांना त्रास होत होता. तसेच, अपघात होण्याची शक्यता होती म्हणून तो खड्डा बुजविण्यासाठी अरुण यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या कंपनीच्या ‘सीएसआर’ फंडाच्या माध्यमातूनदेखील अनेक समाजपयोगी कामे त्यांनी केली आहेत. अशा या यशस्वी उद्योजकाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.