मुंबई : मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पुनर्विकास प्रकल्पांना मागील काही दिवसांपासून वेग मिळाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून चारकोप येथील 'राकेश' गृहनिर्माण संस्थेचा स्वयंपुनर्विकास सोहळा शनिवार, दि. २७ मे रोजी पार पडला. या स्वयंपुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. ''चारकोप, गोराई हे स्वयंपुनर्विकासाचे हब म्हणून पुढे येत असून आपल्याला स्वयंपुनर्विकासाचा नवा आदर्श घालून द्यायचा आहे,'' असे दरेकर यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले.
या स्वयंपुनर्विकास भूमिपूजन कार्यक्रमाला स्थानिक भाजप खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, माजी नगरसेविका संध्या दोशी, आर्किटेक हर्षद मोरे, व्यंकटेश कामत, ऍड. अखिलेश चौबे, नगरसेवक श्रीकांत कवठणकर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दरेकर म्हणाले की, ''कुठलाही राजकीय किंवा सरकारचा आश्रय नसताना मी गेल्या १५ ते २० वर्षांपासून इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न हाती घेऊन एक चळवळ उभी केली आहे. इमारत पुनर्विकासात नेमक्या कुठल्या अडचणी आहेत ? याचा मी सातत्याने पाठपुरावा केला. या कामासाठी आम्ही मुंबई बँकेच्या माध्यमातून धोरण आखले आणि गेल्या काही वर्षात आम्ही मुंबई बँकेच्या माध्यमातून हजारो कोटींच्या मदतीतून अनेक बँकांना सहकार्य केले आहे. राज्य बँकेच्या सहकार्याने आम्ही हे कार्य सुरु ठेवले असून अनेक प्रकल्पांना सहकार्य करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यतील आनंदाचे पर्व सुरु झाले आहे,'' अशी भावना प्रवीण दरेकर यांनी यावेळी व्यक्त केली. हे सर्व करत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला राजाश्रय दिल्याचा उल्लेख करत दरेकरांनी फडणवीसांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
दरेकर पुढे म्हणाले की, हे अभियान ज्यावेळी मी यशवंतराव प्रतिष्ठानला सुरु केले. हा लोकांच्या हिताचा कसा विषय आहे हे पटवून दिल्यानंतर फडणवीस यांनी जीआर काढला होता. मात्र सरकार बदलले, अडीच वर्ष जीआर तसाच राहिला. त्यानंतर फडणवीस आणि मी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची भेट घेत हा विषय त्यांना समजावून सांगितला. आम्ही रिअल इस्टेट आणि बिल्डरला पैसे देत नाही. आम्ही पैसे जी सहकारी संस्था आमची सभासद आहे त्या सभासद संस्थेला पैसे देतो कुठलाही फायदा मिळवण्याचा उद्देश नसतो. जवळपास पाऊणतास शक्तिकांत दास यांनी तो विषय समजून घेतला. आज आरबीआयने देशपातळीवर स्वयंपुनर्विकासाला बँकांनी कर्ज द्यावे असे धोरण बनवले असल्याची माहिती यावेळी दरेकरांनी दिली.
''स्वयंपुनर्विकास एक चळवळ म्हणून उभी राहिली असून यात राज्य सरकारही सहभागी आहे. राज्यात आपले सरकार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पूर्ण कल्पना आहे. राज्य सरकार या विषयात सक्रियपणे काम करत असून 'स्वयंपुनर्विकास महामंडळ स्थापन करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे दरेकर यांनी यावेळी नमूद केले.
गृहनिर्माण प्रकल्पांसंदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक
''मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांच्या पुनर्विकासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. सरकारकडे आम्ही पाठपुरावा करत असून या संदर्भात सोमवार, दि. २९ मे रोजी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात्त आले आहे. सहकारी गृहनिर्माण परिषदेत केलेल्या घोषणांचे शासन निर्णय काढण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून या विषयाचा एकूण आढावा घेण्यासाठी सोमवारी ही बैठक होईल,'' अशी माहिती दरेकर यांनी यावेळी दिली.