ऑस्ट्रेलियातील हिंदू मंदिरांवरील हल्ले स्विकारार्ह नाहीत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनासोबत द्विपक्षीय चर्चा
24-May-2023
Total Views | 59
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत स्विकारार्ह नाहीत. त्याद्वारे भारत – ऑस्ट्रेलियाच्या संबंधांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या फुटीरतावाद्यांविरोधात कारवाई करण्यात येण्याचे आश्वासन ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी दिला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीज यांची भेट घेतली. भेटीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि मी यापूर्वी मंदिरांवर होणारे हल्ले आणि ऑस्ट्रेलियातील फुटीरतावादी घटकांच्या कारवायांवर चर्चा केली आहे. आम्ही आजही या विषयावर चर्चा केली. ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी अशी तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी कारवाई केला असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
उभय नेत्यांनी मार्च २०२३ मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेचे स्मरण केले आणि बहुआयामी भारत-ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक व्यापक आणि बळकट करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, नवी आणि नवीकरणीय ऊर्जा, हरित हायड्रोजन, महत्त्वपूर्ण खनिजे, शिक्षण, स्थलांतर आणि गतिशीलता आणि दोन्ही देशांच्या लोकांमधील संबंध या क्षेत्रातल्या सहकार्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
त्याचप्रमाणे उभय नेत्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी व्यवस्था (एमएमपीए ) वर स्वाक्षरी करण्यात आल्याचे स्वागत केले. त्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया हायड्रोजन कृती दलाच्या संदर्भ अटींना अंतिम रूप देण्यात आल्याचे स्वागत केले. हे कृती दल हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर्स, फ्युएल सेल्सवर लक्ष केंद्रित करून तसेच पायाभूत सुविधा आणि मानके व नियमांच्या सहाय्याने स्वच्छ हायड्रोजनचे उत्पादन आणि वापराला गती देण्याबाबत सूचना करणार आहे.