अन्नदाता, पोषणकर्ता...

    24-May-2023   
Total Views |
article on Ram Naam

या जगाचा अन्नदाता, पालनपोषणकर्ता जो परमेश्वर त्याचे नाव मुखाने घेऊन त्याच्यासंबंधी कृतज्ञता व्यक्त करावी. भगवंताचे रामाचे नाव आदराने कृतज्ञापूर्वक भावाने घेण्यासाठी काही पैसे खर्च करावे लागत नाही. ते फुकाचे आहे. म्हणजे अक्षरश: फुकट आहे. फक्त तेथे अतीव आदर व कृतज्ञताभाव यांची आवश्यकता असते.

विश्वात अनेक प्रकारचे प्राणी असले तरी परमेश्वराची अनुभूती अर्थात भगवंताची प्राप्ती ही मानवी जीवनातच शक्य आहे. तथापि, रोजच्या आयुष्यातील प्रापंचिक व्याप कटकटी, स्वार्थमूलकता, द्वेष, मत्सर, गर्विष्ठपणा, मोह इत्यादी अडथळे पार करीत परमेश्वरप्राप्तीच्या ध्येयाची आठवण राहावी, यासाठी सतत नामस्मरणाचा अभ्यास करावा लागतो. स्वामी सांगतात की, साधकाला रामनामाचा ध्यास लागता पाहिजे. त्याला नामाचा छंद लागला पाहिजे. रामनामाची सवय लागली, तर आपल्या ध्येयाचा विसर पडत नाही. ध्येयाकडे वाटचाल होऊ लागते. रामनामाचा, नामस्मरणाचा अभ्यास नसेल, तर स्वार्थादी अवगुणांच्या प्रभावाने एक तर मन अशांत राहाते किंवा अत्यंत गर्विष्ठ बनून उत्शृंखल होते.

अशांत, गर्विष्ठ, उत्शृंखल मन प्रगतीच्या वाटा अडवून टाकते. परमार्थ काय किंवा प्रपंच काय, ध्येयाने झपाटून गेल्याशिवाय ते साध्य करता येत नाही. मागील श्लोक क्र. ९२ मध्ये समर्थ सांगतात की, अती आदरपूर्वक रामनामाचा घोष करावा, रामनामाचा बाबतीत आपण भगवान महादेवांचा आदर्श ठेवावा. कारण, शंकरांना जणू रामनामाचे वेड लागले आहे ते सतत रामनामाचा जप करीत असतात. शंकरांचा आदर्श समोर ठेवला, तर शिवशंभूंचा थोडा तरी गुणस्पर्श आपल्याला होईल आणि त्याने आपले काम भागेल. तथापि, भोवतालच्या भौतिक वातावरणात आपण आकंठ बुडालेलो असतो. त्यामुळे परमेश्वर प्राप्तीच्या ध्येयाचा विसर पडतो, रामनामही दूर राहाते.

भौतिकतेच्या पसार्‍यात विवेकाने पुढील विचार केला तरी आपण भगवंताच्या विचारापर्यंत पोहोचू शकतो. हे विश्व बघताना, अनुभवताना सहजच मनात विचार येतो की, या विश्वाचा निर्माता कोण आहे? सर्व प्राणिमात्र अन्नावर जगत असतात. त्यांचा अन्नदाता कोण? तुमच्या उद्धाराची काळजी करणारा कोण आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधत जावे, तर अंतिमत: भगवंतापर्यंत जावे लागते. अन्न पिकवणारा, त्यासाठी मेहनत घेणारा, शेतकरी असला तरी पेरलेली बी मातीपाण्याच्या सान्निध्यातून विकसित करून त्याचेच रोपटे होणे व त्याला अनेक बिया असलेले कणिस तयार करून प्राणिमात्रांच्या अन्नाची सोय करणारी कोणीतरी शक्ती अद्भुत कार्य करीत असते. तिला ‘भगवंत’ हे नाव आपण देतो. त्या भगवंताचे नामस्मरण केले, तर हे मना, त्यात तुझे काय खर्च होणार आहे? असे स्वामींनी पुढील श्लोकात विचारले आहे. त्या आशयाचा तो श्लोक असा आहे-

जगीं पाहतां देव हा अन्नदाता।
तथा लागली तत्त्वता सार चिंता।
तयाचे मुखीं नाम घेता फुकाचे।
मना सांग पां रे तुझें काय वेचे॥ ९३॥

परमेश्वर जेव्हा जीव जन्माला घालतो, तेव्हा त्याच्या पालनपोषणाची, अन्नपाण्याची व्यवस्था अगोदर करून ठेवतो. पण, सामान्य माणसाच्या हे लक्षात येत नाही. विवेकाच्या साहाय्याने नीट विचार केल्यावर समजले की, जगाचा अन्नदाता परमेश्वर आहे आणि सर्व जीवांची काळजी घेणाराही तोच आहे. प्राणी जन्माला आल्यावर असाहाय्य स्थितीत असतो. त्या जीवाची भूक शमवण्यासाठी तसेच त्याचे पोषणभरण व्हावे, म्हणून परमेश्वर बाळासाठी आईच्या स्तनांतून दुधाची सोय करतो. मनुष्यप्राण्याव्यतिरिक्त इतर प्राण्यांची पिल्लेही जन्मत्तः असाहाय्यच असतात. अशावेळी प्राण्यांच्या मादीच्या ठिकाणी दुधाची निर्मिती करणारा परमेश्वर असतो. इतकेच नव्हे, तर परमेश्वर मातेच्या ठिकाणी दुधाची निर्मिती करून थांबत नाही, तर मातेच्या अंत:करणात बालकाविषयी प्रेम, वात्सल्य, माया निर्माण करतो. म्हणून आई मोठ्या प्रेमाने, वात्सल्याने बाळाला छातीशी धरून त्याला दूध पाजते.

आता जगातील मानवजातीसाठी, प्राण्यांसाठी त्यांच्या अन्नधान्याची सोय भगवंत निसर्गद्वारा करीत असतो. धरती, मातीतील विशिष्ट गुण व पर्जन्य यांच्या साहाय्याने परमेश्वर अन्नधान्य, भाज्या, फळे यांची निर्मिती करीत असतो. परमेश्वर मानवी जीवाला काही कमी पडू देत नाही. अर्थात, माणसाला त्यासाठी कष्ट करावे लागतात. परंतु, काही माणसे स्वार्थी हेतूने वागू लागतात. तेव्हा, अन्नधान्याचेही गैरव्यवहार होऊ लागतात आणि काहींना अन्न मिळेनासे होते. या मानवनिर्मित आपत्ती दूर केल्यास परमेश्वराचा आठव ठेवून कष्टाने जगणार्‍याला देहापुरते अन्न मिळण्याची सोय परमेश्वराने केलेली असते. सर्व माणसे समजून- उमजून राहिली, तर कोणताही प्राणी उपाशी राहणार नाही, अशी व्यवस्था परमेश्वराने करून ठेवलेली असते. परंतु, काही माणसे स्वार्थी हेतूने आपली अक्कलहुशारी चालवून ईश्वरीय व्यवस्थेत ढवळाढवळ करू पाहतात. यासाठी सर्व धर्मात दानाचे महत्त्व सांगितले आहे.

त्यात गरिबाला दिलेल्या अन्नदानाला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. भुकेल्या माणसाला अन्न दिल्याने जे पुण्य प्राप्त होते, त्याचे शास्त्रात वर्णन केलेले आढळले. थोडक्यात, या जगाचा अन्नदाता, पालनपोषणकर्ता जो परमेश्वर त्याचे नाव मुखाने घेऊन त्याच्यासंबंधी कृतज्ञता व्यक्त करावी. भगवंताचे रामाचे नाव आदराने कृतज्ञापूर्वक भावाने घेण्यासाठी काही पैसे खर्च करावे लागत नाही. ते फुकाचे आहे. म्हणजे अक्षरश: फुकट आहे. फक्त तेथे अतीव आदर व कृतज्ञताभाव यांची आवश्यकता असते. श्लोकाच्या शेवटच्या ओळीत समर्थ मनाला विचारतात की, हे मना! भरणपोषणाची सोय करणार्‍या मला सांभाळणार्‍या त्या परमेश्वराचे फुकटचे नाव मी आदरपूर्वक घेतले, तर त्यात तुझे काय खर्च होणार आहे? (मना सांग पां रे तुझे कोयर वेचे?) मनाशी संवाद करता करता समर्थ या ठिकाणी मनाशी किंचित तुटकपणे बोलून नामस्मरणाला त्याला अनुकूल करून घेत आहेत. ती भाषा जरी बाजूला ठेवली तरी रामनाम घेणे, नामस्मरण करणे हे त्या ईश्वरीसत्तेच्या जाणिवेचे मुखावाटे झालेले द़ृश्यस्वरुप मानायला हरकत नाही.

मनाला थोडे तुटकपणे, ‘मना सांग पां रे तुझे काय वेचे’ असे सांगण्यासाठी आणखी एक उद्देश असावा. तो असा की, मन हे अतिशय चंचल आहे आणि मानवी जीवनाचे खरे स्वरुप आत्मरुप आहे. मनाला आवर न घालता त्याला चंचलपणे वावरू दिले, तर मनाचे चांचल्य मानवी जीवनात उतरून मानवी जीवन अशांत झाल्याने अवगुणांचे कोठार होईल. आपले खरे स्वरुप आत्मरुप असल्याने मनाला त्याची जाणीव असावी, यासाठी कधी कधी मनाशी असे तुटकपणे बोलावे लागते. आत्मसत्तेवर परमेश्वरी सत्तेवर भरवसा ठेवून जगणार्‍याला नामस्मरण करून त्या सत्तेची जाणीव ठेवणार्‍याला काही कमी पडत नाही, असा एकंदर भावार्थ स्वामींच्या सांगण्याचा आहे. रामनाम, नामस्मरण हे प्रत्येकाने घेतले पाहिजे, असे नुसते सांगून चालत नाही. त्यासाठी निरनिराळे दाखले देऊन स्वामींनी लोकांना रामनामाचे महत्त्व पटवून दिले आहे. तो भाग पुढील श्लोकांतून सांगितला असल्याने यथावकाश पाहता येेईल.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..