गणपतीसाठी रेल्वे बुकींग करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! "तिकीटविक्रीचं रॅकेट!"
- कोकणातल्या चाकरमान्यांसाठी अजित पवारांनी घेतला पुढाकार!
24-May-2023
Total Views | 119
मुंबई : गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण अवघ्या एका मिनिटात फुल्ल झाल्याने चाकरमान्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान आता या चाकरमान्यांसाठी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पुढाकार घेतला आहे. रेल्वे तिकीटांच्या आरक्षणाची दलाली करणाऱ्या रॅकेटची चौकशी करा, अशी मागणी अजित पवारांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्राव्दारे केली आहे. तसंच गणेशोत्सव काळात अतिरिक्त गाड्या सोडण्याचीही मागणी केली आहे.
अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे या दोघांनाही या संदर्भात पत्र लिहिलं आहे. "गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आणि विशेषत: कोकणवासीयांच्या अस्मितेचा, श्रद्धेचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. गणेशोत्सवाची वाट प्रत्येक मराठी माणूस वर्षभर बघत असतो. कामानिमित्त जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असला, कितीही अडचणी असल्या तरी कोकणातील चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जातोच. त्याची तयारी व नियोजन प्रत्येक कोकणवासीय चाकरमानी अगदी वर्षभरापासून करत असतो."
"गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं आरक्षण अवघ्या एका मिनिटात फुल्ल होत आहे. रेल्वे अधिकारी आणि तिकिटांच्या दलालांमधल्या अभद्र युतीमुळेच हे होत असावं. सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जात असतात, त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येनं रेल्वेच्या तिकिटांचं आरक्षण करुन चढ्या दरानं त्यांची विक्री करण्याचं रॅकेट सुरु आहे. यामध्ये कोणा-कोणाचे हितसंबध गुंतले आहेत, या गैरप्रकारात कोण-कोण सामील आहे, याची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. या तिकीटाच्या आरक्षणांची मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेनं चौकशी करावी. अशा रेल्वे दलालांवर नियंत्रण ठेवावं." असं अजित पवार म्हणाले आहेत.