ज्ञानवापीप्रकरणी सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी होणार
वाराणसी जिल्हा न्यायालयाचे निर्देश
23-May-2023
Total Views | 56
नवी दिल्ली : वाराणसी जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयाने मंगळवारी ज्ञानवापी वादाशी संबंधित आठ खटल्यांवर एकत्रित सुनावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरण पुढील सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे. ज्ञानवापी वादाशी संबंधित अशी सात प्रकरणे आहेत, जी समान स्वरूपाची आहेत. परंतु त्यांच्यावर वेगवेगळ्या न्यायालयात सुरू आहेत. अशा स्थितीत या सातही जणांची सुनावणी एकत्र करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका ज्ञानवापी शृंगारगौरी प्रकरणातील चार महिला याचिकाकर्त्यांनी वाराणसी जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात केली होती. त्यावर २२ मे रोजी सुनावणी होऊन निकाल राखून ठेवण्यात आला होता.
23 May, 2023 | 17:3
वाराणसी जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी हिंदू याचिकाकर्त्यांची विनंती मान्य केली आहे. विविध न्यायालयात सुरू असलेल्या आठ खटल्यांना एकत्रित करण्याचे आदेश त्यांनी दिले असून याप्रकरणी आता पुढील सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे. चार महिला याचिकाकर्त्यांतर्फे वकील सुभाष नंदन चतुर्वेदी आणि सुधीर त्रिपाठी यांनी युक्तीवाद केला होता. सातही प्रकरणे समान स्वरूपाची आहेत, सर्व खटल्यांचा क्रमांक आणि उद्देशही एक आहे. अशा स्थितीत वेळेची बचत आणि न्यायालयाची सोय लक्षात घेऊन सर्व प्रकरणांची एकत्रित सुनावणी करणे योग्य असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याचवेळी अन्य याचिकाकर्त्या राखी सिंह यांच्यावतीने वकील शिवम गौर, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावतीने वकील रमेश उपाध्याय, अंजुमन इंतेजामिया मशीद समितीच्या वतीने रईस अहमद यांनी सुनावणी एकत्र घेऊ नये असा युक्तिवाद केला होता.