मुंबई : “रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणारच,” असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. राज्याची राजकीय परिस्थिती आणि 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका आदींवर राणे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी ओंकार देशमुख यांच्याशी आपल्या खास शैलीत साधलेला हा विशेष संवाद...
भाजप-शिवसेना युतीचे सरकार आणि तीन पक्षांची महाविकास आघाडी यांच्यात सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. तुमच्या दृष्टीने सध्याची महाराष्ट्राची राजकीय स्थिती काय आहे?
राज्याच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेतला, तर विरोधक जे वातावरण निर्माण करू पाहत आहेत, त्यामागे सत्ता गेल्यामुळे आलेले नैराश्य आणि कमी होत जाणारा लोकांचा पाठिंबा, झालेले खच्चीकरण यामुळे महाविकास आघाडीकडून बेछूट आरोप करून सरकारला बदनाम केले जात आहे. आपले राजकीय मूल्य किती? आपल्या पक्षाचे बळ किती राहिले आहे? याचा अंदाज न घेता विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. आज देशात भाजपचे 302 खासदार आहेत, तर राज्यात शिवसेना-भाजपचे बहुमताचे सुरक्षित सरकार असून, हे सरकार 2024 पर्यंत आपला कार्यकाळ पूर्ण होणार हा विश्वास आहे. सरकारच्या स्थिरतेविषयी टीकाटिप्पणी करणारी मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत. मुळात सरकार आणि फडणवीस, शिंदेंवर आरोप करणार्यांचे आपल्या मतदारसंघात आणि एकूण महाराष्ट्रात काम किती आहे, याचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे. सर्वसामान्यांना दिलासा देणारे कोणते काम या मंडळींनी केले याचे उत्तर त्यांनी द्यावे. त्यामुळे या सगळ्या वातावरणाचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते, की 2024 मध्ये भाजप पुन्हा एकदा केंद्रात विक्रमी बहुमताने सत्ता स्थापन करणार आहे आणि त्याच धर्तीवर भाजप शिवसेना महाराष्ट्रातही 170 पेक्षा अधिक आमदार निवडून आणून बहुमताचे सरकार स्थापन करेन यात शंकाच नाही. महाविकास आघाडीत आतापासूनच लोकसभेच्या जागावाटपावरून वाद सुरु झाले असून त्यांची अवस्था म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी झाली आहे.
मुंबई महापालिकेबाबत तुमचा अंदाज काय?
- मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप कुठल्याही परिस्थितीत जिंकणार हे नक्की आहे. आज उद्धव ठाकरेंच्या सेनेचे अस्तित्व काय आहे हे आम्ही त्यांना दाखवून देणार आहोत. उद्धव ठाकरेंकडे विकासात्मक बाबींविषयी बोलायला काहीही नाही. जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईची गेल्या 25 वर्षांत त्यांनी किती दुरावस्था केली हे आपण पाहात आहोत. शिवसेनेच्या राजवटीत मुंबईतून मराठी माणूस कुठे फेकला गेला याचा विचार आपण केला पाहिजे. आताची शिवसेना केवळ ‘मातोश्री’साठी असून त्यात कार्यकर्त्यांना कुठलेही स्थान राहिलेले नाही. येत्या काळात पदांसाठी ठाकरे गटात वाद होणार आणि त्यातून मोठी बंडखोरी होणार हे निश्चित आहे.
प्रश्न : एका बाजूला ऐक्याची घोषणा करणार्या महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद दिवसेंदिवस अधिक स्पष्टपणे चव्हाट्यावर येत आहेत. शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रातून उद्धव ठाकरेंच्या क्षमतेवर उपस्थित केलेले प्रश्नचिन्ह त्याचाच एक भाग होता. तर दुसरीकडे फडणवीस, शिंदे एकत्रितपणे राज्यात सरकारचा गाडा हाकत आहेत. त्यामुळे विखुरलेले विरोधक विरुद्ध एकजूट असे भाजप शिवसेनेचे सरकार असे चित्र राज्यात निर्माण झाले आहे का?
उत्तर : होय मी सहमत आहे. भाजप आणि शिवसेनेचे सरकार विरुद्ध विखुरलेली महाविकास आघाडी हे चित्र राज्यात निर्माण झाले आहे. शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरेंविषयी कुठलाही आरोप केला नसून वास्तविकता लिहिली आहे. ज्या व्यक्तीला राज्यातील प्रशासन कसे चालते याची माहिती असते तो व्यक्ती अडीच वर्षे घरात बसला नसता. अडीच वर्षात ठाकरे केवळ दोन तास मंत्रालयात बसले हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. पायाभूत सुविधा, शिक्षण, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचाराशिवाय ठाकरेंना काहीही करता आले नाही.
प्रश्न : कोकणात प्रकल्प येणार म्हणजे वाद होणार हे नक्की आहे बारसू रिफायनरी प्रकल्पावरून असाच वाद सुरू आहे. राज्य आणि केंद्र सरकार प्रकल्पाच्या पाठीशी उभे आहे तर मुख्यमंत्री असताना प्रकल्पाला समर्थन देणारे उद्धव ठाकरे आता उघडपणे या प्रकल्पाला विरोध करत त्यांनी थेट यु टर्न घेतला आहे. बारसूच्या आडून नक्की काय राजकारण काय सुरू आहे ?
उत्तर : उद्धव ठाकरेंनी सरळमार्ग कधीच स्वीकारला नाही, ते कायमच यु टर्न घेत आलेले आहेत आणि आजही ते यु टर्न घेऊनच काम करत आहेत. जेव्हा कोकणात प्रकल्प येतो तेव्हा त्याला विरोध करणारे लोक कोकणातील नसून बाहेरची मंडळीच प्रकल्पांना विरोध करतात हा इतिहास आहेत. काही कोकणातील माणसांना हाताशी धरून बाहेरची मंडळी प्रकल्पांना विरोध करण्यासाठी पुढे येतात. आज उद्धव ठाकरे प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेत आहेत, पण त्यांचा कोकणाशी काही संबंध आहे का? शिवसेनेचे नेतृत्व हाती घेतल्यापासून आणि राज्याचे मुख्यमंत्री पद हाताळताना अडीच वर्षे ठाकरेंनी कोकणाला काय दिले? याचे उत्तर द्यावे. शाळा कॉलेज रुग्णालय किंवा कोकणचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी ठाकरेंनी कुठले योगदान दिले? हा माझा सवाल आहे. बारसू प्रकल्पावरूनही ठाकरेंनी काही उद्योजकांकडून सुपारी घेतली असून त्यांच्या सांगण्यावरूनच ठाकरे बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करत आहेत. उद्योजकांनी सुपारी दिल्यानंतरच ठाकरे हेलिकॉप्टर घेऊन बारसुत गेले. त्या प्रकल्पात नेमक्या हानिकारक गोष्टी कुठल्या हे एकदा ठाकरेंनी सांगावे.
कॅलिफोर्नियासारख्या प्रगत ठिकाणी आज अनेक रिफायनरी प्रकल्प आहेत, मात्र तेथील पर्यावरणाला काहीही हानी पोहोचलेली नाही. कोकणचा कॅलिफोर्निया करू म्हणणार्यांनी कोकणसाठी काय केलं? कोकणवासीयांसाठी राबवलेली कुठली एक योजना ठाकरेंनी सांगावी. कोकणाविषयी बोलण्याचा त्यांना काहीही अधिकार राहिलेला नाही. आज त्यांच्या मागे फिरून प्रकल्पाला विरोध करणारी 8 ते 10 मंडळी निवडणुकीपर्यंत त्यांच्या सोबत राहतील आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेही ठाकरेंना सोडून दुसर्या गटात सहभागी होतील हे नक्की आहे. कोकणात प्रकल्पाला विरोध करणारे सत्यजित चव्हाण यांच्यासारख्या मंडळींना कोण विचारतेय? प्रकल्पाला कुणी कितीही विरोध केला तर आम्ही हा प्रकल्प आणणारच कारण या माध्यमातून 2 लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. शेकडो उद्योग, जोडधंदे, त्याला लागणारे उद्योग, नव्या शहरांची निर्मिती, रत्नागिरी जिल्ह्याला होणारे आर्थिक फायदे, राज्याच्या दरडोई उत्पन्नात होणारी वाढ हे सगळे मुद्दे लक्षात घेता हा प्रकल्प होणे गरजेचे असून आम्ही तो करून दाखवणारच.
प्रश्न : महाराष्ट्र पेटवू पण हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी धमकी उद्धव ठाकरेंनी बारसू गावात जाऊन सरकारला दिली आहे. हिंसा भडकवण्याचा प्रयत्न या आंदोलनाच्या माध्यमातून होतोय असं वाटतं का?
उत्तर : मी उद्धव ठाकरेंना 39 वर्षांपासून ओळखतो, ते कधी हिंसा करू शकत नाही. त्यांनी कधी आयुष्यात कुणाच्या कानशिलात देखील मारलेली नाही. ते काय पेटवणार आहेत ? एकनाथ शिंदे भरदिवसा शिवसेनेचे चाळीस आमदार घेऊन गेले तेव्हा हे ‘मातोश्री’त कडी लावून बसले होते. जे स्वतःच्या ताकदीवर 20 पावलं चालू शकत नाहीत, त्यांनी पेटवण्याची भाषा करू नये. ते कधी आणि कुठे काय पेटवणार आहेत याची माहिती त्यांनी मला द्यावी, मी तिथे जाईन. कुठलीही गोष्ट पेटवण्यासाठी जागेवर जावे लागेल काडी पेटवावी लागते ते यांना जमणार नाही. शिवसेना ठाकरे गटातील कुठल्याही नेत्यात माझ्याशी संघर्ष करण्याची क्षमता नाही. ’मातोश्री’ हा वनवे झाला असून त्यात जे कुणी आत जातील ते बाहेर येतच नाहीत. कोकणी माणसाला भडकावून आणि बाहेरचे लोक भाड्याने आणून जर आंदोलनाच्या माध्यमातून प्रकल्पाला विरोध केला तर मी सगळे प्रकार उघडकीस आणल्याशिवाय राहणार नाही.
प्रश्न : जिल्हा प्रशासनाचा दावा आहे की सामाजिक संघटनांच्या नावाखाली विरोध करणारे लोक आमच्याशी चर्चा करायलाच तयार नाहीत. प्रकल्पाला समर्थन देणारी मंडळी आणि विरोध करणारी मंडळी यांच्यात संवाद होत नाही असं चित्र निर्माण झाले आहे. जर दोन्ही गटांमध्ये चर्चाच होणार नसेल तर ही कोंडी फुटणार कशी ?
उत्तर : विरोध करणारी मंडळी कधीही चर्चेसाठी समोर येणार नाहीत कारण त्यांना प्रकल्पाविषयी काहीही माहिती नाही. प्रकल्पाचे फायदे, तोटे याचा कुणाचाच अभ्यास नाही. विरोधी मंडळींशी चर्चा करायला मी खुलेपणाने तयार आहे. रत्नागिरीचे दरडोई उत्पन्न 2 लाख रुपये तर सिंधुदुर्गचे दरडोई उत्पन्न 2 लाख 30 हजार आहे. आम्हाला हे उत्पन्न चार लाखाच्यावर वर घेऊन जायचे आहे. कोकणात येणारी मंडळी आंदोलनासाठी नव्हे तर कोंबडीवडे आणि आंबे खाण्यासाठी येतात यापलीकडे त्यांचा कोकणाशी काहीही संबंध नाही. प्रकल्पाला होणारा विरोधच स्वतःच्या स्वार्थासाठी असून त्याला मराठी भाषेत सुपारी घेऊन काम करणे म्हणतात. संजय राऊतचा कोकणाशी काय संबंध आहे? राऊतांसारखी मंडळी कशाच्या जीवावर कांजूरमध्ये जागा घेतात घरे बांधतात हे उघड होणे गरजेचे आहे. राऊत सध्या जामिनावर बाहेर आहेत आणि जर त्यांचा जामीन रद्द झाला तर त्यांना परत एकदा थंड हवा खाण्यासाठी जेलमध्ये जावे लागेल यात शंका नाही.
प्रश्न : तुम्ही राज्यात उद्योगमंत्री म्हणून काम केलेले आहे आणि आता केंद्रात सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योगमंत्री म्हणून तुम्ही वाटचाल करताय. केंद्रीय मंत्री म्हणून या दोन वर्षांच्या कार्यकाळात तुमच्या खात्याकडून नेमकी कुठली कामे झाली ? येत्या काळाचा तुमचा रोड मॅप काय असणार आहे ?
उत्तर : राज्याचा उद्योगमंत्री आणि देशाचा उद्योगमंत्री असण्यात फरक निश्चित आहे. महाराष्ट्रात असताना केवळ राज्याच्या बाबतीत गुंतवणूक आणि उद्योग विस्तार करण्याचे काम माझ्याकडे होते. तेव्हाही महाराष्टात गुंतवणुकीसह उद्योग आणण्यात आम्हाला निश्चित मोठे यश मिळाले होते. राज्याचे दरडोई उत्पन्न वाढवण्यात आणि महसूल निर्माण करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न मी केला होता. देशात सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योजकता विभागाच्या अंतर्गत माझ्याकडे 6 कोटींहून अधिक उद्योग आणि 11 कोटींहून अधिक रोजगार देण्यात आलेले आहेत. देशाच्या दरडोई उत्पन्न आमचा वाटा 30 टक्के तर निर्यातीत 49 टक्के आहे. यात वाढ करण्याचा आमचा मानस आहे. देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत असून या खात्याच्या माध्यमातून जे-जे काही करणे आम्हाला शक्य आहे ते आम्ही करू. देशाचे उत्पन्न आणि औद्योगिकदृष्ट्या वृद्धिंगत करण्यासाठी करावे लागणारे हर एक प्रयत्न करण्याची आमची तयारी आहे.
प्रश्न : भाजप - शिवसेना विरुद्ध मविआ यांच्यात 2024 मध्ये थेट सामना होईल का ?
उत्तर : भाजपशी सामना करण्याची ताकद कुठल्याही आघाडीत नाही. प्रत्येक निवडणुकीच्या आधी अशा आघाड्या होत असतात, मात्र प्रत्यक्ष निवडणूक होईपर्यंत या आघाड्यांची कशी बिघाडी होते ते आपल्या सर्वांना माहिती आहे. ’एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी या आघाडीची स्थिती आहे, त्यामुळे भाजपला आव्हान देणारा एकही पक्ष आणि आघाडी अस्तित्वात नाही. असलीच तर त्यात बिघाडी झाल्याशिवाय राहणार नाही.
प्रश्न : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या वैधतेवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे मविआतील आमदारांचा मोठा गट युतीसोबत येणार असल्याच्या दाव्यात कितपत तथ्य आहे ?
उत्तर : हा दावा खरा आहे. कारण ठाकरे गटात शिल्लक राहिलेल्या उरल्या-सुरल्या आमदारांना माहिती आहे की कधी हवा येईल आणि आपला पालापाचोळा होऊन आपण उडून जाऊ याची त्यांना शाश्वती आहे. त्यामुळे निवडणुकांच्या पूर्वी आमदारांचा मोठा गट युतीकडे येणार आहे. नाराज आमदारांना भाजप-शिवसेनेत प्रवेश दिला जाऊ शकतो हे निश्चित आहे.
प्रश्न : उद्धव ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे येत्या काळातील राजकीय भवितव्य काय असू शकते ?
उत्तर : मी 39 वर्षे बाळासाहेबांच्या सहवासात शिवसेनेत काम केलेले आहे. बाळासाहेबांनी मला शाखाप्रमुख पदापासून राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंतची पदे दिली होती. बाळासाहेबांनी उभारलेली शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या काळात तयार झालेली शिवसेना यात जमीन आस्मानाचे मोठे अंतर आहे. शिवसैनिकांप्रती काळजी, विश्वास अन प्रेम व्यक्त करण्याची बाळासाहेब ठाकरेंची परंपरा आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत कुठेही दिसत नाही. शिवसैनिकांची दखल न घेणारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. आपल्या विरोधात आवाज उचलणारा प्रत्येक शिवसैनिक गद्दार आणि खोकेवाला अशी भावना जर उद्धव ठाकरेंची असेल तर एकही शिवसैनिक शिवसेनेत राहणार नाही. आज जी मंडळी उद्धव ठाकरेंसोबत आहेत त्यातील अनेक लोक भाजप शिवसेनेच्या वाटेवर असून त्यांच्या याच भाषेला ठाकरे गटाचे लोक वैतागले आहेत. आपल्याला पक्षात जर मान सन्मान मिळत नसेल तर कुठलाही नेता कार्यकर्ता ठाकरे गटात शिल्लक राहणार नाही.
सध्याच्या राजकारणात मान आणि सन्मान मिळण्याची एकमेव जागा म्हणजे भाजप आहे. ज्याप्रकारे शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना भाजपने मान दिला, त्यावरून मान सन्मान देणारा एकमेव पक्ष भाजपच आहे. अन्याय झाल्यावर जहाल प्रतिक्रिया देण्याची मुळ शिवसैनिकांची भावना आता कुणातही राहिलेली नाही. अडीच वर्षात सामान्य शिवसैनिकांना काहीही न देता सगळ्या गोष्टी आदित्य ठाकरे आणि परिवाराशिवाय कुणालाही काहीही मिळालेले नाही. यांच्याच राजवटीत मराठी माणूस मुंबईतून बाहेर फेकला गेला हे वास्तव आहे. अठ्ठावीस वर्षे मुंबईवर सत्ता गाजवणार्या शिवसेनेने मराठी माणसांविषयी बोलू नये. जनतेला नको असलेले संजय राऊतांसारखे नेते आणि कार्यकर्ते आता ठाकरे सेनेत शिल्लक राहिले असून जनतेला त्यांच्याविषयी काहीही आत्मीयता राहिलेली नाही. उद्धव ठाकरेंची शिवसेना अस्ताला जात असून, ठाकरे सेनेचा कधीही उदय होऊ शकणार नाही.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.