नवी दिल्ली : हिंदुद्वेषी ट्विटसाठी युक्रेनने माफी मागितली आहे. युक्रेनचे प्रथम उप परराष्ट्र मंत्री एमीन झापरोवा यांनी हिंदूंचे दैवत माता कालीच्या चित्राचा गैरवापर केल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने नुकतेच 'आर्ट वर्क' नावाने माता कालीचे छायाचित्र ट्विट केले होते. यामध्ये युक्रेनच्या हल्ल्यातून उठणारे ढग माता कालीचा घागरा म्हणून दाखवण्यात आले होते.
याबद्दल झापरोवा यांनी दि. २ मे रोजी ट्विट करत लिहले आहे की, युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने हिंदूंची देवता काली मातेच्या चित्राचा गैरवापर केल्याबद्दल आम्हाला खेद वाटतो. युक्रेन आणि तेथील लोक भारतीय संस्कृतीचा मनापासून आदर करतात. तसेच युद्धातील भारताच्या समर्थनाची प्रशंसा करतात. त्याचबरोबर हे चित्र हटवण्यात आले असल्याचे आणि भारत-युक्रेन परस्पर आदर आणि मैत्रीची भावना वाढवण्याचा आमचा निर्धार असल्याचे ही एमीन झापरोवा यांनी सांगितले.
युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने दि.३० एप्रिल रोजी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर दोन फोटो शेअर केले. यातील एका फोटोमध्ये धुराचे लोट दिसत होते. तर, दुसऱ्या फोटोमध्ये धुराच्या ढगांमध्ये जीभ दाखवणारी आणि गळ्यात कवटीची माळ घातलेल्या काली मातेचे आक्षेपार्ह चित्र दाखवले होते. हा फोटो युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने 'वर्क ऑफ आर्ट' या कॅप्शनसह शेअर केला आहे. याद्वारे युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने देवी कालीची तुलना हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मनरोशी केली आणि तिला एका 'अपस्कर्ट मोमेंट'मध्ये दाखवले.
माता कालीचे अपमानास्पद ट्विट समोर आल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी याला कडाडून विरोध केला. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत हँडलने हिंदू धार्मिक श्रद्धांची कशी खिल्ली उडवली हे पाहून सोशल मीडिया वापरकर्ते थक्क झाले. या कृत्याबद्दल त्यांनी युक्रेनने माफी मागावी अशी मागणी केली होती. बाला नावाच्या युजरने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांना टॅग करत ट्विट केले. ते म्हणाले होते, कृपया काली मातेची बदनामी करणाऱ्या या अपमानास्पद पोस्टची नोंद घ्या. तसेच भारताकडे युक्रेन मदत आणि समर्थनाची याचना करेल हे लक्षात ठेवा. त्यामुळेच काही कालावधीने वारंवार विरोध झाल्यानंतर युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने हे ट्विट हटवले.