महानिर्मितीने गाठले १० हजार अधिक मेगावाट वीज उत्पादनाचे लक्ष्य
18-May-2023
Total Views | 67
8
नागपूर : महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांनी राज्यातील विजेच्या मागणीत उन्हाळ्यात अपेक्षित वाढ लक्षात घेऊन "मिशन औष्णिक ८००० मेगावॅट" चे उद्दिष्ट निश्चित करून दिले. राज्यात यावर्षी सर्वोच्च विजेची मागणी एप्रिल महिन्यात २९ हजार मेगावॅटच्या घरात पोहचली तर सध्या २८००० मेगावाटच्या जवळ आहे आणि येत्या काही दिवसांत ती आणखीन वाढेल असा अंदाज आहे. कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीने आपल्या सर्व संसाधनांचे पुरेसे नियोजन केले आहे.
महानिर्मितीने १७ मे २०२३ रोजी रात्री ७.४५ वाजता एकूण १००७० मेगावाटचा पल्ला गाठला असून यापूर्वी १७ मार्च रोजी रात्री ८ वाजता १०१०२ मेगावॅटचा उच्चांक गाठला होता. सध्या महानिर्मितीच्या सर्व संचांतून वीजनिर्मिती सुरू आहे. महानिर्मितीच्या या सर्व सुनियोजित उपाययोजनांमुळे महावितरणला त्यांच्या मागणीनुसार विजेची गरज भागवण्यास मोलाची मदत होत आहे. आणि पर्यायाने महावितरणला बाजारातून महागडी वीज खरेदी करावी लागत नाही, हा वीज ग्राहकांचा फायदा आहे. १० हजार अधिक मेगावाट उत्पादनाचे लक्ष्य गाठल्याने डॉ.पी.अनबलगन यांनी महानिर्मितीच्या सर्व अधिकारी,अभियंते,तंत्रज्ञ,कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.