वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वृक्षलागवडीचा पर्याय हा कधीही फायदेशीर. परंतु, मुंबईसारख्या फारसे मोकळे भूखंड नसलेल्या शहरात वृक्षलागवडीलाही मर्यादा येतात. त्यावरच उपाय म्हणून काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने मियावाकी वनांच्या उभारणीला वेग दिला. तेव्हा, या मियावाकी वनांचे फायदे व मुंबईतील या वनांची सद्यस्थिती याचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबईमध्ये भूखंडाच्या खुल्या क्षेत्रातील पाच टक्के जागेवर मियावाकी वने उभारली जाणार आहेत. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मुंबई पालिकेने हा निर्णय घेतल्याचे समजते. हरितक्षेत्रात वाढ होण्यासाठी पालिका सातत्याने प्रयत्न करीत असते. या प्रयत्नांचा भाग म्हणून पालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल आणि अतिरिक्त पालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार पालिकेने मियावाकी जंगलांच्या लागवडीचा निर्णय घेतला आहे. दहा हजार चौरस मीटरपेक्षा अधिक आकाराच्या भूखंडावर इमारतीचे बांधकाम करताना खुल्या क्षेत्रातील पाच टक्के भागात मियावाकी वने विकसित करणे त्यामुळे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
सामान्य वनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणार्या वनांमधील झाडे अधिक वेगाने वाढतात. पारंपरिक पद्धतीने लावलेले झाड वाढण्यास लागणार्या कालावधीपेक्षा निम्म्या कालावधीत तेवढ्याच उंचीचे झाड मियावाकी पद्धतीने वाढते. साधारणपणे दोन वर्षांत ही वने विकसित होतात. झाडांमधील अंतर कमी असल्यामुळे घनदाट वन तयार होते. मुंबईत काँक्रिटची घरे व रस्ते असल्यामुळे ’काँक्रिटचे जंगल’ अशा शब्दात मुंबईचे वर्णन केले जाते. त्यामुळे त्यात हरित क्षेत्रांची वाढ करण्यासाठी पालिकेने मियावाकी वने विकसित करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. या निर्णयामुळे पर्यावरण संवर्धनास गती मिळेल, असा पालिकेला विश्वास आहे.
‘मियावाकी वने’ या नावाने जलद वनीकरणाची जगप्रसिद्ध जपानी प्रणाली जगात सगळीकडे लोकप्रिय होताना दिसते. या मियावाकी जंगलाचे अनेक फायदे आहेत. जैवविविधतेबरोबर तेथे अनेक प्राणी-पक्ष्यांचा अधिवास असतो. अशा जंगलामुळे वातावरण बदलाचा प्रभावदेखील कमी होतो. वनवासींना अन्नसुरक्षा लाभते. विकासकामासाठी लाकूड मिळते. कृषिक्षेत्रासाठी पाऊस मिळतो. बहुसंख्य पद्धतीत वृक्ष वाढायला २५-३० वर्षे लागतात. कमी वेळात कमी पाण्यात, कमी काळजी घेण्यात ही मियावकी वन पद्धत सगळ्यांना आवडेल, अशी बनत आहे. मातीची वैशिष्ट्ये बघून मुंबईतील मातीत रुजेल व अधिक घट्टपणे मूळ धरेल, अशी झाडे लावणे आवश्यक आहे, असे आवाहन महापालिकेसह पर्यावरणतज्ज्ञांनी केले आहे. मुंबई परिसरात बहावा, तामण, करंज, नागचाफा, सात्वीन, बकुळ, समुद्रफूल, पुत्रजीवी, कडूनिंब, उंबर, कदंब, पिंपळ, वावळ, शिसव, बेहडा, कांचन, वटवृक्ष यांसारखी देशी वृक्षांची लागवड प्राधान्याने करावी.
गेल्या अनेक दशकांत मुंबईसारख्या शहरात हवेचे प्रदूषण दिवसेंदिवस गंभीरपणे वाढलेले दिसते. तीव्र प्रदूषणामुळे अकाली मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. मुंबईकर दिवसाचे २४ तास प्रदूषकांच्या संपर्काबाहेर राहू शकतात. कारण, खुल्या वातावरणात वाढणारी झाडे प्रदूषकांना तोंड देत असतात. म्हणून अशा झाडांच्या संपर्कात राहणे हितकारक ठरते. भारतीय शास्त्रज्ञांनी देखील याविषयी विपुल संशोधन केले आहे. जगभरात साधारण १९७०च्या दशकापासून प्रदूषणाच्या अभ्यासास व १९७८ मध्ये महाराष्ट्रातील शरद चाफेकर आणि सहकार्यांनी प्रदूषणाच्या संशोधनासाठी सुरुवात केली. पुढे बनारस विद्यापीठामधील डॉ. एस. के. सिंग आणि डॉ. डी. के. राव यांनी प्रदूषित हवेच्या संपर्कात येणार्या वनस्पतींचा प्रदूषकांचा भार सहन करणार्या शरीरांतर्गत यंत्रणेचा अभ्यास केला.
प्रदूषित हवेत वाढणार्या वनस्पती प्रदूषकांचा भार सहन करण्यासाठी पानांच्या पेशींमध्ये असलेले ‘अॅस्पॉर्बिक अॅसिड’ (क जीवनसत्व), हरितद्रव्य (क्लोरोफिल), पानांची पाणी धारण करण्याची क्षमता आणि पाण्यातील सामू (पीएच), या चार घटकांमध्ये काही बदल घडवून आणतात, असे संशोधकांच्या लक्षात आले. या घटकांचे विश्लेषण करून त्यांनी एक सूत्र (एअर पोल्युझन टॉलरन्स इंडेक्स) सिद्ध केले. हे त्यांचे सूत्र जगभरात वापरले जात आहे. या घटकांपैकी ‘अॅस्पॉर्बिक अॅसिड’ हा एक प्रभावी घटक आहे आणि तो प्रतिअॅसिडीकारक असल्याने ओझोनसारख्या प्रबळ ऑक्सिडीकारक प्रदूषकांना निष्प्रभ करू शकते. शिवाय प्रकाशसंश्लेषण क्रियेतही मोलाची भूमिका बजावते व ‘सल्फर डायॉक्साईड’सारख्या घातक प्रदूषकांनाही निष्प्रभ करते.
वृक्षांची जंगले वायूप्रदूषण कमी करतात.
जागतिक तापमान वाढ वा वातावरणात प्रतिकूल बदल होणे ही हल्ली नित्याची बाब झाली आहे व त्यामुळे लोकांच्या स्वास्थ्यावर फार मोठे परिणाम होऊन अकाली मृत्यूंचे प्रमाण वाढीस लागले आहे. या गोष्टींशी लढण्याकरिता व पर्यावरणाचे आच्छादन टिकविण्यासाठी व संवर्धन होण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. हवा प्रदूषण कमी करण्यासाठी, वृक्षारोपणातून आपण ते मिळवू शकतो. या अशा संशोधनातून आता हे फायदे फळाला आले आहेत.
वृक्षांकडून आता हवा स्वच्छ होऊ शकते व ती हवेतील अपायकारक व विषारी वायूरुपातील सूक्ष्म कण शोषून घेतले जाऊन पर्यावरणाचा धोका कमी होतो. नायट्रोजन ऑक्साईड, अमोनिया आणि सल्फरडाय ऑक्साईड इत्यादी विषारी द्रव्ये वृक्षाच्या पानामधून, खोडामधून व मुळामधून शोषली जातात व त्यातून वृक्षाच्या भोवती असलेली सूक्ष्म वातावरणातील स्थानिक हवा शुद्ध बनते हे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. वृक्ष सभोवतालच्या वातावरणातील विषारी प्रदूषकांना पण शोषून घेतात आणि हवेत शुद्ध प्राणवायूचा पुरवठा करतात. ४० हजार किमी प्रवास करणार्या मोटारगाडीने जेवढा कार्बनमोनॉक्साईड हवेत निर्माण होतो, तेवढ्या गॅसच्या घनफळाचे शोषण एक एकरातील परिपक्व वृक्षे करू शकतात, असेही अभ्यासाअंती समोर आले आहे. या गोष्टींचा आपण वृक्षांची निर्मिती करून व त्यांचे संगोपन करून फायदा उठवला पाहिजे.
औद्योगिक निर्मिती क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणात हवेत अपायकारक प्रदूषके निर्माण होतात, सूर्यकिरणांमुळे जी उष्णता निर्माण होते, ती पृथ्वीच्या पृष्ठभागांवर पडते, ती हवेतील हरितगृह उपद्रवी वायूमध्ये अडवली जाते. या कार्यप्रक्रियेला हरितगृह वायू निर्मिती होणे, असे म्हणतात. या क्रियेमुळे पृथ्वीवरच्या तापमानात वाढ होते. (ग्लोबल वॉर्मिंग) यातल्या फक्त दीड अंश सेल्सिअस तापमान वाढीतून ध्रुवावरील बर्फ वितळणे, क्लेशकारक दुष्काळ होणे, समुद्राची पातळी वाढणे आणि अनेक मुख्य पेशी मधमाशा, देवमासा वा हत्ती इत्यादींवर घाला पडू शकतो. आपण ‘ग्लोबल वॉर्मिंग’ मुळे कमी परिणाम होणारे पाम ऑईल, केळी वा कॉफी असे पदार्थ वापरू शकतो.
अनेक ठिकाणी मियावाकी वने बहरणार
मुंबई महापालिका १४ ठिकाणी शहरी मियावाकी वनात ८० हजार, ४०० झाडांची लागवड करणार आहे. सुमारे ६४ मिनी जंगलात दि. २६ जानेवारी, २०२० पासून चार लाख झाडे लावली गेली आहेत. मुंबई पालिकेने प्राधान्याने अंजन, बेल, आवळा, गुंज, अर्जून, सोनचाफा झाडे मियावाकी पद्धतीने ‘बेस्ट’ वसाहत, चांदिवली उद्यानात ही वने लावली गेली आहेत. जोगेश्वरीच्या महाकाली गुहेकडे तीन लाख झाडे लावण्याचे प्रयोजन आहे. मुंबई पालिकेच्या २०१८ मधील शिरगणतीनुसार, मुंबईत २९ लाख ७५ हजार २३८ झाडे होती. अनुजा संघवी, डायरेक्टर ‘एमराल्ड फाऊंडेशन’कडून ही मियावाकीवने लावली गेली आहेत. मियावाकी तंत्रज्ञानाने वृक्षसंपदा बहरली जाते व दीड ते दोन फूट अंतराने ती वाढवली आहेत. वाढती वृक्षतोड व पर्यावरणहानीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने शहरात अधिकाधिक हिरवळ फुलवण्याचा निर्धार केला आहे. तसेच, पालिकेने पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करताना मियावाकी जंगले वाढविण्यासाठी ६० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यात चार लाख रोपांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे. गेल्या दीड वर्षांत मियावाकी वनाकरिता दीड लाख रोपांची लागवड करण्यात आली आहेत. पालिकेने उर्वरित २० ठिकाणे निश्चित केली आहेत. सामाजिक संस्थाही मियावाकी वनांमधून मोठा भार फुलविणार आहेत. पालिकेने अर्थसंकल्पात १२ कोटींची तरतूद केली आहे. तसेच, काही बड्या कंपन्या व विकासकांनी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. कमी काळात वेगवान वाढीसाठी अंधेरी-वर्सोवा परिसरात साडेसात हजार देशी रोपांची लागवड केली आहे.
मुंबईला जागतिक वृक्षनगरी म्हणून सलग दुसर्यांदा बहुमान
नुकताच दुसर्यांदा हा बहुमान प्राप्त करताना मुंबईने पाच निकषांची पूर्तता केली आहे. मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी महापालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांवर आता त्यांनी जागतिक मोहोर उमटवली आहे.
मुंबईत विविध ठिकाणी मियावाकी वने
मियावाकी वनांची निर्मिती करण्यासाठी पुढे दिलेल्या १०० भूखडांची नावे येतात. वांद्रे किल्ला, आनंदीबाई सुर्वे उद्यान, कुर्ला, चांदिवली, वरळी किल्ला, शंकरराव नरम पथ इत्यादी ठिकाणी मियावाके वने बनविण्यासाठी देशी झाडांची रोपटी आणली आहेत ती अशी- वड, पिंपळ, बांबू, रिठा, चिंच, जांभूळ, बदाम. मियावाकी वनांकरिता एक चौरस मीटरमध्ये तीन ते पाच रोपटी लावली जातात. ही झाडे तीन वर्षांत १०-१२ फुटांहून जास्त उंचीची झाडे वाढतात. जोगेश्वरी ‘वेअरहाऊस’ कंपनी (२३०० चौ.मी. भूखंडावर ४० विविध पेशींची सात हजार रोपटी), भांडुप कॉप्लेक्समध्ये (१२०० चौ.मी.मध्ये ४० विविध पेशींची तीन हजार रोपटी), अंबरनाथच्या १०० चौ.मी भूखंडावर (४० विविध पेशींची ३२० रोपटी), आयएनएस हमला (२५०० चौ.मी भूखंडावर ४० विविध पेशींची १५ हजार रोपटी). या मियावाकी तत्वज्ञानाने १०० वर्षांच्या पारंपरिक वाढीऐवजी दहा वर्षांत दहापट दाटीची संख्येने दहापट वाढ आणि ३० पटींनी कार्बनडाय ऑक्साईड कमी करणारी व ध्वनीप्रदूषण व धुळीचे प्रदूषण कमी करणारी वने निर्माण होऊ शकतील.