‘लव्ह जिहाद’ पीडितांना हवी सहानुभूती

    14-May-2023
Total Views | 153
the karala story

एक चित्रपट समीक्षक, चित्रपट परिनिरीक्षण मंडळाची सदस्य म्हणून गेल्या ५३ वर्षांच्या पत्रकारितेत अक्षरश: शेकडो-हजारो देशीविदेशी चित्रपट पाहून झालेत अन् काल ‘द केरला स्टोरी’ चित्रपट मुंबईतील चेंबूरच्या थिएटरच्या पडद्यावर पाहिला तेव्हा अवाक् व्हायला झालं.

रं तर तो चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा होत आला तरी कामाच्या व्यापातून तो पाहायला जायला उसंतच मिळाली नव्हती. ‘बट थॅन्क्स टू’ दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि त्यांची नादिष्ट समाजसेवी पत्रकार योगिता साळवी चेंबूरमधल्या महिला वाचकांसाठी या चित्रपटाचा एक विशेष खेळ त्यांनी शनिवार, दि. १३ मे रोजी आयोजित केला नि अगत्यपूर्वक निमंत्रित केले म्हणून चांगल्याच्या ओढीने त्या ‘शो’ला आवर्जून जावसं वाटलं. पण गेले नसते, तर मी किती विलक्षण सामाजिक जागृती अनुभवाला आणि उत्कट कलानंदाला मुकले असते, याची जाणीव चित्रपट पाहिल्यावर झाली.या चित्रपटाचे ५०-६० विशेष खेळ आयोजित करण्याची तरुण भारताची धडपड किती रास्त होती हे पटले म्हणून या उपक्रमाला ही जाहीर दाद द्यावीशी वाटत आहे.

उत्कृष्ट चित्रनिर्मिती

प्रथम एक प्रतिपादन करावेसे वाटते, भाजपची पक्षीय हिंदुत्ववादी विचारधारा म्हणून प्रचार करण्यासाठी याचा वापर करत आहे, असा उथळ आरोप केला जात असला तरी ‘द केरला स्टोरी’ तसा अजिबात प्रचारकी चित्रपट नाही. उलटपक्षी उत्कंठावर्धक कथाबांधणी, देशविदेशचे नेत्रदीपक (अन् तरीही ते कथानक पुढे सरकवण्यासाठी अपरिहार्यच असलेले!) उत्कृष्ट छायाचित्रण; नायिकेची प्रमुख भूमिका करणार्‍या अदा शर्मा या नवोदित अभिनेत्रीपासून सर्वच लहान-मोठ्या कलाकारांनी सहजसुलभ वठवलेल्या प्रेक्षकांच्या लक्षात राहतील, अशा भूमिका- असे एखाद्या दर्जेदार चित्रपटाला आवश्यक ठरतात, असे सर्व गुण या ‘द केरला स्टोरी’मध्ये आहेत. त्या दृष्टीने चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक सुदिप्तो सेन व निर्माते विपुल शहा हे नि:संशयपणे अभिनंदनास पात्र आहेत. हा चित्रपट मुस्लिमांविरोधी नसून, हिंदुस्थानी समाजात धार्मिक फाळणीचे विषय पेरण्यात विकृत आनंद मानणार्‍या ‘इसिस’च्याविरोधात हा चित्रपट आहे, हे मनावर ठसते.

जातीय धर्मविद्वेषी दंगली भडकवण्याखेरीज भोळ्याभाबड्या हिंदू तरुणींना (त्यांच्या दृष्टीने ‘काफिर’) बेगडी प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांना गर्भवती करून आपल्याशी निकाह करायला लावण्याच्या इसिसवाल्या मुस्लिमांच्या ‘लव्ह जिहाद’च्या कटू कारस्थानाचा वेध दिग्दर्शकाने, केरळमधील दहशतवाद्यांच्या कार्यपद्धतीच्या सत्याधारित चित्रणातून इतक्या भेदकपणे या घेतला आहे की, चित्रपट संपल्यावर प्रेक्षक कसे सुन्न होत असतात याचा अनुभव चेंबूरमधला चित्रपटाचा खेळ संपल्यावर आला.

कल्पक आयोजन

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या चित्रपटाचे राज्यभरात ५३ खेळ आतापर्यंत आयोजिलेल्या योगिताची कल्पकता आजच्या कार्यक्रमात जाणवली. हा चित्रपट केरळच्या पार्श्वभूमीवर असला तरी, आपल्या आजूबाजूला महाराष्ट्रात नि अगदी मुंबईतही हे असे निकाह प्रेमाच्या नावाखाली लागत असतातच. आमच्यातले संवेदनशील चेंबूरकर नागरिक चेंबूरनिवासी रुपाली चंदनशिवे या १६ वर्षीय कोवळ्या मुलीची, तिच्या मुस्लीम शेजार्‍याने दि. २६ सप्टेंबर, २०२२ला गळा चिरून केलेली क्रूर हत्या आजही विसरू शकत नाहीच. योगिताने या चित्रपट प्रदर्शनानंतर उपस्थित भगिनींशी संवाद साधायला रुपालीची आई वंदना व बहीण करुणा चंदनशिवे यांना आवर्जून निमंत्रित केले होते. लेकीच्या क्रूर हत्येने व्यथित वंदनाबाई पोटतिडकीने जे बोलल्या, ते मनावर कोरले गेलं!

त्या म्हणाल्या, असे प्रकार घडले की, अगदी जवळचे नातेवाईक-शेजारीपाजारी यांना बळीच्या कुटुंबीयांनाच दोषी ठरवून वाळीत टाकावेसे वाटते. हे खरे, तर अत्यंत दुर्दैवी आहे. खरे तर तत्क्षणी त्यांना अतिशय सहानुभूतीची गरज असते. पण उद्या ही दुर्घटना आपल्याही वाट्याला येऊ शकते, याचे भान सुटलेले हे शेजारी नातेवाईक दुरून मजा बघत असतात. आधीच्या दोन बायका नि एक मुलगी पदरात असलेल्या इकबालने रुपालीला नादी लावले. पण, गर्भवती झाल्यावर रुपालीने लग्नाचा लकडा लावल्यावर तिचा गळा चिरून तो फरार झाला. आम्ही कुटुंबीयांनी फिर्याद नोंदवूनही पोलिसांनी गुन्हेगाराला तातडीने अटक करण्याचे टाळून आम्हालाच मनःस्तापदिला. अखेर त्याला अटक झाली. पण आता तो जामिनावर सुटून यायच्या खटपटीत आहे, अशा गुन्हेगाराबाबत पोलीस न्यायालय यांनी कठोर पावले उचलायला नकोत का, असा परखड सवाल व्यथित वंदनाने विचारला.

चेंबूरच्या गौरी शेलार व ज्योती साठे या तरुण कार्यकर्त्यांनीही समवयस्क मुलींना सावधगिरीचा इशारा देऊन ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे ठिकठिकाणी खेळ लावण्याच्या दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपक्रमाचे हार्दिक स्वागत केले. केरळात घडले ते आपल्याकडे थोडेच घडणार आहे, असा विचार करून आपल्याकडच्या तरुण मुलींनी त्यांच्या पालकांनी गाफील राहू नये, असे आवाहन त्यांनी केले. मलाही चार शब्द बोलण्याची विनंती त्यांनी केली म्हणून मीही त्यांना गेल्याच सप्ताहात आपल्याकडील वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवर प्रकाशित झालेल्या पोलीस वृत्तांची आठवण करून दिली. गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रातून दोन-तीन हजार तरुण मुली गूढरित्या बेपत्ता झाल्याचे आणि त्यांचा काहीही ठावठिकाणा लागत नसल्याचे सांगणारी ती बातमी होती.

‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट पाहून सर्वच मुलींच्या पालकांनी सावध व्हावे, अशी अपेक्षा मी व्यक्त केेली. हे चार शब्द संपवताना पुन्हा एकदा मी या विचारप्रवर्तक चित्रपटाच्या दिग्दर्शक निर्मात्यांचे आणि त्याचे ठिकठिकाणी जनजागृतीसाठी मोफत आयोजन करणार्‍या दै. ‘मुंबई तरुण भारत’चे हार्दिक अभिनंदन करते. सामाजिक प्रबोधनाला पर्याय नसतो. ही उमजलेली सक्रिय पत्रकार योगिता साळवी हिचे विशेष अभिनंदन करावेसे वाटते. खरे तर हा चित्रपट सेन्सॉरने प्रौढांसाठी ठेवलेला आहे. पण त्यातील एक दोन शरीर जवळकीचे दृश्य कापून हा चित्रपट ११-१२ वर्षांपासूनच्या मुलींनाही उच्च माध्यमिक शाळांमधून सर्रास दाखवला गेला पाहिजे, असे मत अनेक उपस्थित भगिनींनी व्यक्त केले, त्यांच्याशी मी सहमत आहे. त्यादृष्टीने काय करता येईल याचा फेरविचार व्हावा, अशी जोरदार शिफारस सेन्सॉर बोर्डाला मला कराविशी वाटते.

  नीला उपाध्ये
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121