कलिंगड आणि पिंपळाच्या पानावर कोरून कलाकृती साकारण्याची किमया शेफ वैभव भुंडेरे यांनी साधली आहे. त्यांच्या कलाकृतीचे सोशल मीडियावर कौतुक होतेच पण ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनीदेखील त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. जाणून घेऊया या वैभवची किमयागिरी.
कर्जत तालुक्यातील पोशिर या गावात वैभवचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण श्रमजीवी जनता विद्यामंदिर पोशिर येथे झाले. कजर्तमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथून त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेचच अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये त्यांनी ‘इंटर्नशिप’ करण्यास सुरुवात केली. सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मरीन ड्राईव्ह येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी स्वीकारली. वैभवचे वडील रघुनाथ हे शेतीसोबतच आपला सोनाराचा व्यवसाय ही सांभाळतात तर आई शीतल या गृहिणी आहेत. वैभवला एक मोठा भाऊ आणि एक लहान बहीण आहे. वैभवला लहानपणापासूनच खाद्यपदार्थ बनविण्याची आवड आहे. वैभव उत्तम चित्रे ही रेखाटत असतो. पण वैभवने आपल्या उत्कृष्ट चित्रकलेकडे कधी करियरच्या दृष्टिकोनातून पाहिले नाही. वैभवच्या आई-वडिलांनी त्याला तुझ्या आवडीच्या क्षेत्रात करियर कर, अशी मुभा दिली होती. वैभवने खाद्यपदार्थ बनविण्याची आवड असल्यामुळे हॉटेल मॅनेजमेंट करण्याचा निर्णय घेतला. वैभवने सहावीला असताना सर्वप्रथम घरात पदार्थ तयार केला होता. ‘इंटर्नशिप’ करीत असतानाच एका शेफकडून त्याने ‘फ्रूट कार्व्हिंग’चे धडे घेतले आहे. कलिंगडावर कलाकृती साकरत असताना आता तो पिंपळाच्या पानावरही कलाकृती साकारू लागला आहे. त्यांच्या कलाकृतीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
वैभव पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करीत असतानादेखील त्यांनी आपला छंद जोपासला. वैभवने आतापर्यंत कलिंगडावर कोरून ४० ते ५० कलाकृती तयार केल्या आहेत. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे, महानायक अमिताभ बच्चन, सुपरस्टार रजनिकांत, युवराज सिंग अशा अनेक दिग्गजांच्या कलाकृती साकारल्या आहेत. तसेच, महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्यांनी भगवान शंकराची आणि शिवजयंतीच्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांची कलाकृती साकारली आहे. ‘लॉकडाऊन’ काळात कलिंगड सहज उपलब्ध होत नसल्याने त्याने पिंपळाच्या पानाच्या माध्यमातून कलाकृती साकारण्यास सुरुवात केली. पिंपळाच्या पानावर कोरून त्यापासून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, गणराय, विठ्ठल रखुमाई, भगवान शंकर, हनुमान, हुतात्मा भगतसिंग, सचिन तेंडुलकर, दि. बा. पाटील, अमित ठाकरे अशा अनेक कलाकृती बनवल्या आहेत. लहानपणापासून चित्रकलेची आवड असल्याने कलिंगड आणि पिंपळाच्या पानावर कलाकृती साकारणे सहज शक्य होते. या कलाकृती फेसबुक आणि यु ट्युबवर शेअर केल्यानंतर लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कलाकृतीचे लोक कौतुक करीत आहेत.
वैभवने ताज सॅट्स फ्लाईट किचन, ताज लँड्स एंड बांद्रा, इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राईव्ह, इंडिगो, वेस्टिन पुणे यांसारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये काम केले आहे. ‘वैभव फ्रूट कार्व्हिंग’ या हॉटेलमध्ये काम करीत असतानाच बघून-बघून शिकला आहे. त्यांचा कोणताही अभ्यासक्रम शिकला नाही. पण यासंदर्भात कोर्स करण्याचा त्याचा मानस आहे. त्यामुळे अजून ‘अॅडवान्स’ गोष्टी करता येतील. ही कला अधिक फुलण्यास त्यांची मदत होईल. लग्नसराईत ‘फ्रूट कार्व्हिंग’केले जाते. कधीकधी वधूवराचा चेहरा ही काढला जातो, तर कधी त्यांची नावे कोरली जातात. काही जण कलाकृती तयार करतानाच व्हिडिओदेखील तयार करतात. ‘फ्रूट कार्व्हिंग’ हे गाजर, टोमॅटो, काकडी, भोपळा, बीट, सफरचंद, टरबूज यावर ही करता येते. कार्व्हिंग सुरीच्या साहाय्याने ही कलाकृती साकारता येते. कलिंगडावर कलाकृती तयार करण्यास तीन ते चार तास लागतात, तर पिंपळाच्या पानावर कलाकृती तयार करण्यासाठी पाच ते सहा तास लागतात. वैभवने वेगवेगळ्या प्रकारच्या एक हजार ते १२०० कलाकृती तयार केल्या आहेत. ‘लॉकडाऊन’पासून वैभव सध्या घरीच असल्याने कलाकृती तयार करण्याचे काम करीत आहेत. वैभवला दुबई, कॅनडा येथून देखील कलाकृती बनवून देण्यासाठी ऑर्डर येत असतात. वैभव त्यांच्या ऑर्डरप्रमाणे कलाकृती बनवून कुरियर किंवा इंडियन पोस्टद्वारे पाठवून देतो. सोशल मीडियामुळे आपली कला सर्वत्र पोहोचत असल्याचे वैभव सांगतात.
‘फ्रूट कार्व्हिंग’ला भारतात फारशी मागणी नाही. फ्रूट वर कलाकृती तयार केल्यास ती दोन दिवसच टिकून राहते. शिवाय फ्रूट वाया जातात. त्यामुळे लोकांचा कल पिंपळ पानावर कलाकृती करून घेण्याकडे जास्त असतो. परदेशात मात्र ‘फ्रूट कार्व्हिंग’ला चांगली मागणी आहे. पिंपळपानावर कलाकृती साकारणार्या किमयागार वैभवला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.