महाराष्ट्रातील प्रत्येक उच्च संत अतिकठीण योगसाधना करीत असत. कुंभक प्राणायाम, योगनिद्रा व शवासन साधना पूर्ण झाल्यावर साधक श्वास विरहित अवस्थेत अनेक तास राहू शकतो. त्यामुळे आपल्या जड शरीराबाहेर येऊन स्वतःचे शव स्वतःच पाहू शकतो. ज्याप्रमाणे बर्फ विरघळल्यावर त्याचे रुपांतर पाण्यात होते. पाणी तापवल्यास त्याचे रुपांतर वाफ तयार होते. त्यात पुन्हा अणु-रेणू असतात. या पाण्याच्याच एकापेक्षा एक सूक्ष्म अवस्था आहेत. त्याचप्रकारे शास्त्रात आपली चार शरीरे सांगितली आहेत.
१) जड शरीर २) सूक्ष्म शरीर ३) कारण शरीर आणि ४) महाकारण शरीर. जड शरीराची माया सुटली की, सूक्ष्म शरीर आपोआप विलग होते. या अनुपम अनुभवांचे वर्णन तुकाराम महाराज करतात. ‘आपुले मरण पाहिले म्यां डोळा। तो हा सोहळा अनुपम ॥’ तुकाराम महाराजांचा हा प्रत्यक्ष अनुभव आहे. प्रत्येक श्रेष्ठ संत श्रेष्ठ योगसाधक असतो, तर प्रत्येक श्रेष्ठ योगी, श्रेष्ठ संत असतो. महाराष्ट्रीय संत योग्यांनी हे समीकरण सतत कायम ठेवले आहे. योग व भक्ती एकाच वर्तुळाची दोन टोके आहेत.
वर सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला पूरक, कुंभक व रेचक यांचे प्रमाण १:४:२ असे असावे. पूरकाचा जो कालावधी असेल, तसल्या पूरकाला धरून पलीकडील कुंभक सततच्या सुसह्य अभ्यासाने वाढवित जावे जसे १:४:२, १:५:२, १:६:२, १:७:२, १:८:२ कुंभक कितीही वाढविला तरी पूरक व रेचक यांचे प्रमाण १:२ असेच ठेवीत मधील कुंभकाचे प्रमाण ४, ५, ६, ७, ८ अशा प्रमाणात वाढवावे. अधिक अभ्यासाने पूरक, कुंभक, रेचक यांचे प्रमाण पुढीलप्रमाणे आणखी वाढवावे. जसे १:८:२, १:१२:२, १:१६:२, १:२०:२ इत्यादी. प्रत्येक अभ्यासात पूरक, रेचकाचे प्रमाण १:२ असेच असावे. त्यात वाढ करू नये. अधिक अभ्यास करून पूरक, कुंभक, रेचकाचे प्रमाण पुढीलप्रमाणे करावे १:४:२, १:८:२, १:१६:२, १:२४:२ व १:३६:२. शेवटी पुन्हा १:४:२ प्रमाणाने प्राणायाम पूर्ण करावा. रोज असे पाच प्राणायाम योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करावेत. पहिला व पाचवा प्राणायाम १:४:२ असाच असावा. प्राणायामाचे प्रमाण १:३६:२ असे साधल्यास साधकाला केवळ कुंभक अवस्था साधून आपोआप हंसजय होतो. या अवस्थेत कुंडलिनी कधीच जागृत होऊन जाते. साधक अष्टसिद्धी व समाधी अवस्था प्राप्त करू शकतो, असा साधक केवळ कुंभक साधल्याने श्वासाशिवाय बराच वेळ राहू शकतो. विचारांचा व श्वासाचा फार जवळचा संबंध असतो. विचारांवर नियंत्रण येणे एवढे सोपे नसते म्हणूनच मनाला आधी एकाग्रतेची सवय लावावी लागते. अनेक विचार येत जात असतात. त्याबरोबर आपणही वाहत जातो. श्वास बंद पडला, तर विचार बंद होतात, असे हे परस्पर समीकरण आहे. जप किंवा ध्यानात विचार शांत झाले तरी श्वास बंद पडून कुंभक प्राणायाम आपोआप होतो. मनापासून जप वा नामस्मरणाने देखील ही अवस्था आपोआप येऊ शकते.
कुंडलिनी शक्ती व समुद्र मंथन
रामायणात समुद्रमंथनाची कथा आली आहे. सूर आणि असूर आपापसात भांडून थकले. ब्रह्मदेवांच्या म्हणण्यावरून अमृतप्राप्तीच्या हेतूने त्यांनी समुद्रमंथन करायचे ठरविले. समुद्रमंथन म्हणजे साधनेद्वारे शरीराचे मंथन करून कुंडलिनी जागृत करणे होय. कुंडलिनी जागृतीद्वारे अमृत तत्वाचा लाभ त्यांना होणार होता. पण, सर्वप्रथम त्यांना हलाहल विष प्राप्त झाले. अगदी शेवटी अमृत तत्त्वाचा लाभ झाला. सूर म्हणजे साधकातील उत्तम प्रगतीशील वृत्ती होय, तर असूर म्हणजे आपल्यातील अप्रगत अशी निकृष्ट वृत्ती होत. बर्या वाईट वृत्तींचे युद्ध आपल्यात सतत चाललेलेच असते, तेच हे सुरासुरांचे युद्ध होय. कुंडलिनी जागृती अवस्था म्हणजेच समुद्रमंथन होय. समुद्र म्हणजे शरीर. त्याचे मंथन करण्याकरिता मेरू पर्वत म्हणजे आपला मेरूदंड होय. त्याला लागणारी दोरी म्हणजे शेषनाग होय. साधकातील शेष-सर्प शक्ती अनुभव म्हणजेच शेषनाग होय. या शेषातून प्रथम प्राप्त होते हलाहल म्हणजे भयानक विष! कुंडलिनी जागृत झाल्यावर सर्वप्रथम विष प्राशन केल्यासारखा शरीर दाहाचा अनुभव येतो. त्यालाच रामायणकार ‘हलाहल’ असे म्हणतात. हल म्हणजे नांगर अथवा साधना होय. साधना केल्यानंतरच असला भयानक दाहाचा अनुभव साधकाला येत असतो. समुद्र मंथनातून लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजात, उच्चैःश्रवा, ऐरावत आणि १४ अवस्थारूप रत्ने प्राप्त झाल्यावर शेवटी अमृतकुंभाची म्हणजे अमरत्त्वाची प्राप्ती होत असते. या अमृताची जे प्राप्ती करतील ते अमर होत. देववृत्तींना अमर व दानव वृत्तींना मर्त्य म्हटले आहे. समुद्रमंथन असे आहे. समुद्रमंथन अनाकलनीय इतिहास नसून कुंडलिनी जागृतीची दिव्य साधना होय.
प्राप्त हलाहल भगवान प्राशन करतात, त्यामुळे त्यांचा शुभ्र कंठ नील होतो. म्हणून भगवान शिवाला ‘नीलकंठ’ असे नाव दिले आहे. शिव म्हणजे कल्याणकारक साधक अवस्था! अंतिम कल्याणाकरिता सुरुवातीचे हलाहल विष जो साधक प्राशन करेल, तो भगवान शिव होऊन अमर होईल. आशय असा की, कुंडलिनी जागृत झाल्यावर साधकाच्या सर्वांगाचा जो असह्य दाह होतो ते हलाहल रूप विष प्राशन करणारा श्रेष्ठ साधकच भगवान शिव होतो. साधना शास्त्रात स्पष्ट म्हटलेच आहे, जो शिवाची साधना करेल तो शिवच बनेल, ‘शिवं भूत्वा शिवं यजेत’ । १४ रत्नातील एक रत्न म्हणजे उच्चैःश्रवा होय. या उच्चैश्रवारूप घोड्याला पाच मुखे होती. पंचतत्त्वांचे दिव्य श्रवण म्हणजे हा उच्चैश्रवा होय. त्यानंतर प्राप्त झाला ऐरावत हत्ती! याला म्हणे सात सोंडा होत्या. या सात सोंडा म्हणजे आपली सप्त चक्रांवित हत्तीसारखी बलवान काया होय. याच ऐरावतावर इंद्रियांचा स्वामी इंद्र म्हणजे जीवात्मा स्वार होऊन असूर वृत्तींशी आपल्या वज्र निर्धाररूप वज्राद्वारे युद्ध करतो. त्यानंतर निघतात अश्विनीरूप देवांचे वैद्य. अश्व म्हणजे श्वासविरहित अवस्था. म्हणजेच प्राणायाम सिद्धी होय. ज्याचा प्राणायाम म्हणजे अश्विनी सिद्धी झाली आहे त्याला कोणताच रोग होणार नाही. म्हणजे असला साधक अमर होतो. नंतर प्राप्त होते लक्ष्मी! लक्ष्मी म्हणजे संपत्ती होय. सर्व संपत्तीत श्रेष्ठ संपत्ती अध्यात्म संपत्ती होय. ही संपत्ती ज्याला लाभली तो लक्ष्मीपती विष्णू भगवान होय. विष्णू विश्वाचा पालक, ज्याचे अवतार राम आणि कृष्ण मानले आहेत. राम म्हणजे आत्मानंद तर कृष्ण म्हणजे विश्वातील सर्व दिव्यशक्ती स्वत:त कर्षण करणारा महान साधक योगेश्वर गोपाल कृष्ण होय.
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७