वृत्तनिवेदक, रेडिओजॉकी म्हणून आपल्या आवाजाने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या रश्मि वारंग यांच्या जीवनप्रवासावरील लेख...
रश्मि चंद्रकांत वारंग यांचा जन्म मुंबईचा. त्यांचे मूळ गाव वेंगुर्ला. रश्मि यांची आई महापालिकेच्या शाळेत शिक्षिका आणि वडील रेशन ऑफिसमध्ये कामाला होते. रश्मि यांचे प्राथमिक शिक्षण अभिनव विद्या मंदिर, बोरिवली येथे झाले. माध्यमिक शिक्षण त्यांनी योजना विद्यालय येथून पूर्ण केले. त्यानंतर रश्मि यांनी रूपारेल महाविद्यालयातून ‘मराठी साहित्य’ या विषयातून पदवी प्राप्त केली, त्यावेळी तर्खडकर सुवर्णपदक रश्मि यांनी मिळवले. तसेच, मुंबई विद्यापीठातून रश्मि यांनी ‘एम.ए’ मराठी केले. त्यावेळी मराठी साहित्यात या विषयातील न. चि. केळकर सुवर्णपदक रश्मि यांनी पटकावले. त्यानंतर २००६ मध्ये मराठी विषयाची ‘नेट’ परीक्षादेखील रश्मि यांनी उत्तीर्ण केली. तसे पाहायला गेले, तर लहानपणापासून रश्मि यांना ‘मराठी’ या विषयात अभिरूची होती. त्यामुळे शालेय जीवनापासून महाविद्यालयीन काळापर्यंत निवेदन, सूत्रसंचालन, बालनाट्य, निबंध, वक्तृत्व, वादविवाद यांसारख्या व्यक्तिमत्त्वाला फुलवणार्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी रश्मि यांना प्राप्त झाली. तसेच, ७२व्या अखिल मराठी साहित्य संमेलनात विद्यार्थी जनसंपर्क प्रतिनिधी म्हणूनदेखील रश्मि यांनी महाविद्यालयीन काळात काम केले.
रश्मि यांच्या या कलाक्षेत्रातील प्रगतीचा चढता आलेख पाहून कुटुंबाने शिक्षणासाठी आणि कलाक्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमासाठी वेळोवेळी सहकार्य केले. त्यामुळेच गेली २२ वर्षे रश्मि ‘एफ.एम.रेन्बो’(१०७.१) आणि ‘एफ.एम. गोल्ड’(१००.१) या वाहिन्यांवर ’रेडिओजॉकी’ म्हणून त्यांना दांडगा अनुभव आहे. लहानपणी आकाशवाणीला बालनाट्यांचे ‘रेकॉर्डिंग’ रश्मि यांनी केले होते. त्यावेळी भविष्यात आपण आकाशवाणीवर ’रेडिओजॉकी’ होईल, असे रश्मि यांना वाटलेदेखील नव्हते. पण, आज एक यशस्वी ’रेडिओजॉकी’ म्हणून रश्मि आकाशवाणीवर काम करत आहेत. रश्मि यांनी ’रेडिओजॉकी’ या क्षेत्राकडे वळण्यापूर्वीच महाराष्ट्र पत्रकार संघातून पत्रकारितेचा अभ्यासक्रम ही द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण केला आहे.
रश्मि या जेव्हा ’रेडिओजॉकी’ म्हणून पहिल्यांदा कामावर रूजू होणार होत्या. त्यादिवशी भल्या पहाटे ३.३० वाजता घरातून त्या बाहेर पडल्या, त्यावेळी त्यांचा भाऊ त्यांना सकाळी सोडायला येईल, असे रश्मि यांना वाटले. पंरतु, घराबाहेर जाताना रश्मि यांचे वडील म्हणाले की, “तुला जर या क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर कुबड्याचा आधार घेणं सोड.” तेव्हापासून आजतागायत रश्मि यांनी हा कानमंत्र लक्षात ठेवला आहे. त्यामुळे आजही एखादी नैराश्मय घटना घडली, तरी त्याचा परिणाम रेडिओवरच्या कार्यक्रमावर होणार नाही, याची दक्षता रश्मि वारंग घेत असतात. त्यामुळे रेडिओवरील कामही माझ्यासाठी ध्यानधारणेसारखे असल्याचे रश्मि आवर्जून सांगतात. आज रश्मि यांचा ‘वंदन’ आणि ‘रेनबो फनडे’ हे दोन कार्यक्रम लोकप्रिय आहेत. रेडिओवर काम करण्याची इच्छा बाळगणार्या तरुण-तरुणीसाठी रश्मि सांगतात की, तोचतोचपणा प्रेक्षकांना निवेदकाच्या आवाजापासून लांब घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे नवा प्रयोग, नवा अनुभव देत सातत्याने नावीन्याचा शोध घेणार्या लोकांचे हे क्षेत्र आहे, अन्यथा आपल्यावर हे क्षेत्र सोडण्याची वेळ येईल.
रश्मि ज्याप्रमाणे ’रेडिओजॉकी’ म्हणून काम करतात, त्याचप्रमाणे ’र्जीी उहळश्रवीशप’ या अनाथ आश्रमाच्या मातृसंस्थेसाठी आणि डेव्हिड ससून बालसुधारगृहातील मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून देखील सामाजिक जबाबदारीने सहभागी होतात. रश्मि या साठ्ये आणि डहाणूकर महाविद्यालय, विलेपार्ले येथे पत्रकारिता आणि जनसंवाद अभ्यासक्रमासाठी अध्यापक म्हणून देखील कार्यरत आहेत. तसेच, भाषांतरकार, जाहिरात लेखन, वृत्तनिवेदक म्हणून ही काम करतात. अलीकडेच रश्मि यांचे ११० मिनिटांचे ’ब्रॅण्ड मंत्र’ हे ऑडिओ बुक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकासाठी लेखन आणि ध्वनिमुद्रण दोन्ही रश्मि यांनी केले आहे. त्याचबरोबर गेली १३ वर्षं संवाद कौशल्य, निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखतीचे तंत्र, रेडिओ करिअर या विषयावर रश्मि मार्गदर्शन करीत आहेत. त्याचबरोबर ‘शब्दसखा’, ‘खाऊच्या शोधकथा’, ‘ब्रॅण्डनामा’, ‘वस्त्रसंस्कृती’ हे सदर सुद्धा रश्मि या वेगवेगळ्या मासिकात लिहित असतात. तसेच एका वृत्तपत्रात पत्रकार म्हणूनही त्यांना कामाचा अनुभव आहे. ‘मुंबई दूरदर्शन सह्याद्री’ वाहिनीवर रश्मि यांनी काही वर्षं ‘आमची माती आमची माणसे’, ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’ या कार्यक्रमांचे निवेदन केले आहे.
रश्मि यांचे ’रेडिओजॉकी’ क्षेत्रात येऊ इच्छिणार्या तरुणांसाठी ’मनस्पर्शी’ हे रेडिओजॉकींचे भावविश्व सांगणारे पुस्तक २०१० मध्ये प्रकाशित झाले आहे. रश्मि यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ’स्वराभिनय पुरस्कार’, भारतीय जनता पक्षातर्फे बोरिवली सन्मान, ‘सह्याद्री’ वाहिनीतर्फे ’महिला गौरव’ पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आले आहे. भविष्यात रश्मि यांना स्वतःचा ‘पॉडकास्ट’ सुरू करायचा आहे. त्यामुळे रश्मि यांना त्यांच्या नवनवीन उपक्रमासाठी आणि भावी आयुष्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने शुभेच्छा!